नेफ्ताली इस्रायलचे नवे पंतप्रधान, बेंजामिन नेतन्याहू 12 वर्षांनंतर पायउतार

फोटो स्रोत, Reuters
इस्रायली संसदेत नव्या आघाडीच्या बाजूने बहुमत गेल्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपली सत्ता गमावावी लागली आहे. ते गेल्या 12 वर्षांपासून इस्रायलचे पंतप्रधान होते.
नेतन्याहू यांनी शेवटपर्यंत आशा सोडली नाही असं दिसून आलं. त्यांच्या विरोधी आघाडीला 60 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला तर तर नेतन्याहू यांना 59 प्रतिनिधींचा.
नेतन्याहू सरकारमध्ये नसले तरी ते लिकुड पक्षाचे प्रमुख आणि इस्रायली संसदेचे नेते तसंच विरोधी पक्षनेते राहतील.
विशेष म्हणजे नेतन्याहू हे इस्रायलचे आतापर्यंतचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. ते पाच वेळा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. 1996 ते 1999 काळात ते पहिल्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते आणि त्यानंतर 2009 ते 2021 पर्यंत सलग त्यांनी सरकारचं नेतृत्त्व केलं.
पण सध्याच्या अनपेक्षित राजकीय घडामोडींमध्ये विरोधकांच्या आठ पक्षांच्या आघाडीने त्यांना सत्तेपासून दूर केलं. बहुमत गमावल्यानंतर नेतन्याहू यांनी इस्रायलच्या संसदेत आम्ही पुन्हा येऊ, असं सांगितलं.
कोण होणार पंतप्रधान?
यामीना पक्षाचे उजव्या विचारसरणीचे नेते नेफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यांच्या पक्षाचे केवळ सहा खासदार आहेत परंतु नव्या आघाडीने त्यांना आपला नेता म्हणून निवडलं आहे.

फोटो स्रोत, AFP
नेफ्ताली यांना बेंजामिन नेतन्याहू, विरोधी पक्षनेते येर लेपिड यांच्याशी पंतप्रधानपदाची वाटणी करण्याचा प्रस्ताव होता. नेफ्ताली यांनी मध्यममार्गी येर लेपिडसोबत जाण्याचा निर्णय घेतला. खरंतर दोघांच्या विचारधारेत बरंच अंतर आहे.
दोन्ही पक्षांमधील करारानुसार, नेफ्ताली सप्टेंबर 2023 पर्यंत इस्रायलचे पंतप्रधान राहतील आणि त्यानंतर पुढील दोन वर्षं सत्तेची कमान येर लेपिड यांच्या हातात असेल.
49 वर्षीय नेफ्ताली एकेकाळी नेतन्याहू यांचे विश्वासू मानले जात होते. नेतन्याहू यांच्याशी फारकत घेण्यापूर्वी नेफ्ताली 2006 ते 2008 या काळात इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ होते.
नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षातून बाहेर पडल्यानंतर नेफ्ताली उजव्या विचारसरणीच्या धार्मिक यहूदी होम पार्टीत गेले. 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेफ्ताली यांचा विजय झाला आणि ते इस्रायली संसदेचे सदस्य बनले.
2019 पर्यंत आघाडीच्या प्रत्येक सरकारमध्ये नाफ्ताली मंत्री बनले. 2019 मध्ये नेफ्ताली यांच्या नव्या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. 11 महिन्यांनंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि यामीना पक्षाचे प्रमुख म्हणून नेफ्ताली संसदेत पोहोचले.
नेतन्याहू यांच्यापेक्षा नेफ्ताली अधिक अतिराष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीचे मानले जातात. नेफ्ताली इस्रायलची ज्यू राष्ट्र म्हणून बाजू घेतात. त्याचबरोबर त्यांनी वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि सीरियन गोलान हाइट्स यांनाही ज्यू इतिहासाचा एक भाग असल्याचही वर्णन केलं आहे.
1967 च्या मध्यपूर्वेतील युद्धानंतर या भागांवर इस्रायलचं नियंत्रण आहे. नेफ्ताली पश्चिम किनाऱ्याजवळ ज्यूंच्या वास्तव्याचं समर्थन करतात आणि त्याबद्दल त्यांची भूमिका कायम आक्रमक राहिली आहे.
पण ते गाझावर कोणताही दावा करत नाहीत. 2005 मध्ये इस्रायलने येथून सैन्य मागे घेतले होतं. पश्चिम किनारा आणि पूर्व जेरुसलेममधील 140 वस्त्यांमध्ये सहा लाखाहून जास्त ज्यू राहतात. या वस्त्यांना जवळपास संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय बेकायदेशीर मानतो. पण इस्रायलचा याला नकार आहे.
पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यातील वस्त्या निश्चित करणे हा सर्वांत वादग्रस्त मुद्दा आहे. पॅलेस्टिनी या वस्त्यांमधून ज्यूंना काढून टाकण्याची मागणी करत आहेत आणि पश्चिम किनारा, गाझा सह स्वतंत्र देश ज्याची राजधानी पूर्व जेरुसलेम असेल अशी त्यांची मागणी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








