Eid al-Fitr : रमजान ईद आणि ईद-उल-फित्र म्हणजे काय?

फोटो स्रोत, PA Media
- Author, नबीहा पारकर,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
भारतातील तसंच जगभरातील मुस्लीम नागरिक ईद-उल-फित्रच्या तयारीत आहेत. मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.
ईद-उल-फित्र म्हणजे काय?
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.
ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.
ईद महिना संपल्यानंतर पहिल्यांदा चंद्र दिसतो, त्यावेळी रमजान ईद साजरी होते.
ईद साजरी कशी करतात?
ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात.

फोटो स्रोत, PA Media
ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला जकात असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करण्यास जाते.
नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते.
एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना ईद-मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.
रमजान म्हणजे काय?
रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.
रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.
शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
रमजान काळातील दिनचर्या
रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवळ केलं जातं. यावेळी भरपेट आणि पौष्टिक जेवण केलं जातं. याला सहरी किंवा सहूर असं म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार किंवा फितूर म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
रमजानच्या काळात दान करण्यालाही मुस्लीम धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
संयम, सदाचार यांचं पालन करून अल्लाहसोबतचे संबंध वृद्धींगत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
याशिवाय रमजान महिन्यात तरावीहसुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी मशिदीत करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असं संबोधतात. फक्त रमजान महिन्यातच तरावीह प्रार्थना केली जाते, हे विशेष.
यंदाचा रमजान वेगळा का?
यंदाच्या वर्षी रमजान ईद दुसऱ्यांदा कोरोना साथीच्या काळात आली आहे. म्हणजेच दुसऱ्यांदा वेगळ्या पद्धतीने सण साजरा करावा लागत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी लोक एकत्र येऊन जेवण करतात. यावेळी मित्र-नातेवाईकांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे असं करण्यावर निर्बंध आले आहेत.
अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध असल्यामुळे लोकांना एकमेकांकडे जाणं शक्य नाही. एका ठिकाणी जास्त संख्येने लोक जमा होऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.
त्यामुळे मुस्लीम बांधव आप्तस्वकियांना भेटण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेताना दिसतात. ऑनलाईन स्वरुपात सहरी किंवा इफ्तार साजरी केली जात आहे.
आणखी काय बदललं?
2020 पासून आलेला आणखी एक बदल म्हणजे, एकत्र येण्यावरची निर्बंध. निर्बंधांमुळे मशिदीत जाऊन रात्री तरावीहची प्रार्थना करणं आता शक्य नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मशिदीत भाविकांनी मास्क, फेसशिल्ड यांचा वापर करणं बंधनकारक आहे. नमाज पठणाकरिता अंथरण्याचं कापड स्वतः घेऊन येणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अशी अनेक निर्बंध यावेळी आहेत.
रमजान आणि ईदचे दिवस कसे मोजले जातात?
इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं.
त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. तर रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते.
इस्लामिक कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्रोदयापासून हे दिवस मोजले जातात.
जगभरात इंडोनेशियापासून मोरोक्कोपर्यंत अत्यंत मोठ्या भौगोलिक प्रदेशात मुस्लीम देश पसरलेले आहेत. त्यामुळे या देशांमध्ये होणाऱ्या चंद्रोदयाच्या वेळेत फरक असू शकतो.
त्यामुळे ही वेळ ठरवण्यासाठी सौदी अरेबिया येथील मक्का हे स्थान गृहीत धरण्यात आलेलं आहे. येथे चंद्र दिसल्यापासून इस्लामिक कॅलेंडरमधील एक दिवस ग्राह्य धरला जातो, अशी माहिती लंडनमधील स्कूल ऑफ इस्लामिक स्टडीजमधील प्रा. मुहम्मद आब्देल हलीम सांगतात.
पाश्चिमात्य कॅलेंडरपेक्षा लुनार कॅलेंडरमध्ये 10 दिवस कमी असतात. त्यामुळे रमजान महिना दरवर्षीपेक्षा 10 दिवस लवकर येतो.
रोजा कोण करू शकतो?
मुस्लीम धर्मीयांमध्ये निरोगी असलेल्या व्यक्तीनेच रमजान करावं, अशी सूचना आहे.
लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवासाने त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








