कोरोना साथीच्या काळात अॅमेझॉनची भरभराट... नफा झाला तिप्पट

अॅमेझॉन

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लोक जगभरात घरात अडकून पडले आहेत. अनेक देशांमध्ये परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. अशात जगभरातले लोक अजूनही घरात बसून काम करत आहेत आणि गरजेच्या वस्तू ऑनलाईन मागवत आहेत.

यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत ऑनलाईन रिटेलर कंपनी अॅमेझॉनचा नफा तिपटीने वाढला आहे.

या कंपनीच्या सगळ्या विभागांना, मग ते ऑनलाईन व्हीडिओ स्ट्रीमिंग असो किंवा किराणा माल विकणं, फायदा झालेला आहे.

येत्या काही महिन्यात हा फायदा असाच होत राहील अशा अपेक्षा आहेत.

ही जागतिक साथ म्हणजे अॅमेझॉनसाठी 'सोनेरी दिवस' ठरलेय असंही एका तज्ज्ञाने म्हटलं.

कोव्हिड-19 ची साथ आल्यानंतर वर्षभरात अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेट या सगळ्याच टेक कंपन्यांना भरपूर फायदा झालाय. आता या यादीत अॅमेझॉनचंही नाव आलेलं आहे.

अॅमेझॉनने गेल्या काही वर्षांपासून आपला विस्तार करायला सुरूवात केली होती. त्यांनी स्वयंचलित किराणा दुकानं, ऑनलाईन आरोग्यसेवा सुरू केल्या. इतकंच नाही लंडनमध्ये भाडेतत्त्वावर ब्युटी पार्लर आणि सलून चालवण्याचाही प्रयोग कंपनी करत आहे.

कोरोना काळात इतर उद्योगधंदे ठप्प पडत असताना अॅमेझॉनच्या मुख्य सेवा - ऑनलाईन शॉपिंग आणि सामानाची होम डिलिव्हरी आणि व्हीडिओ स्ट्रिमिंग साईट यांचा व्यवसाय चांगलाच बहरला.

जेफ बेझोस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, येत्या काही दिवसांत जेफ बेझोस अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून पायउतार होतील.

मार्च महिन्याच्या अखेरीस कंपनीचा महसूल 75 अब्ज डॉलर्सवरून 108 अब्ज डॉलर्सवर गेला होता.

कंपनीचा निव्वळ नफा 8.1 अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्यावर्षी हाच नफा 2.5 अब्ज डॉलर्स इतका होता.

ऑनलाईन व्हीडिओ स्ट्रिमिंग सेवा प्राईम व्हीडिओ आणि वेब सर्व्हिस AWS या दोन्ही सेवा अॅमेझॉनच्या 'कुटुंबात आल्याचा अभिमान असल्याचं' कंपनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी म्हटलंय.

"प्राईम व्हीडिओला आता 10 वर्ष पूर्ण होतील. गेल्या वर्षी 17 कोटी 50 लाख प्राईम सदस्यांनी या सेवेचा लाभ घेतला आणि मागच्या तुलनेत व्हीडिओ स्ट्रीमिंगचा वेळ 70 टक्क्यांनी वाढला," असंही बेझोस म्हणाले.

स्थापनेनंतरच्या पहिल्या 15 वर्षांत AWS ने 54 अब्ज डॉलर्सची विक्री करण्याची मजल मारली आहे. या सेवेची स्पर्धा इतर मोठ्या टेक कंपन्यांनी आहे असंही ते म्हणाले.

येत्या काही दिवसात बेझोस अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून पायउतार होतील. पण कार्यकारी अध्यक्ष या पदावर कायम राहतील. त्यांची जागा AWS चे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी घेतील.

हारग्रिव्हस् लॅन्सडाऊनचे विश्लेषक निकोसल हायेट म्हणतात, "अॅमेझॉनची कामगिरी 'उत्तम' आहे तीही अशा पँडेमिकच्या काळात जेव्हा कोणताही व्यवसाय करायला जास्त पैसै खर्च होत आहेत."

अॅमेझॉन

फोटो स्रोत, Reuters

ते पुढे म्हणतात, "जेव्हाही गुंतवणुकीच्या नव्या संधी मिळतील तेव्हा त्यात आधी कमावलेला पैसा ओतण्याची अॅमेझॉनची कार्यपद्धत आहे. पण सध्याच्या काळात आपल्याकडचा ओसंडून वाहणारा पैसा ठेवायला कोणती जागा शोधायची, या चिंतेत ते आहेत."

"अॅमेझॉनचीसाठी हे 'सोनेरी दिवस' असतील. बाहेर सगळं बंद असताना, चैनीची साधनं उपलब्ध नसताना आपल्याकडे असलेला जास्तीचा पैसा खर्च करण्याची अॅमेझॉन ही एकमेव जागा ग्राहकांकडे आहे. AWS ची घरून काम करण्याची सेवा, किंवा इतर सेवा सध्याच्या काळात आवश्यक झाल्या आहेत."

काही देशांच्या मार्केटमध्ये कोरोना साथीचा प्रभाव ओसरत असला तरी कंपनीचा नफा वाढत राहील, असं अॅमेझॉनचं म्हणणं आहे.

अॅमेझॉनने म्हटलंय की ते त्यांच्या अमेरिकेतल्या 5 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार आहेत, ज्याचा खर्च साधारण 1 अब्ज डॉलर्स असेल. कर्मचाऱ्यांना कमी पगार देण्याबद्दल आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण नसल्याबदद्ल बऱ्याच काळापासून अॅमेझॉनवर टीका होतेय.

काही कर्मचाऱ्यांनी असंही म्हटलंय की त्यांच्यावर कामाचा इतका ताण आहे की ते वॉशरूमला जायलाही ब्रेक घेऊ शकत नाहीत. अॅमेझॉन कंपनी त्यांच्या वेअरहाऊसेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसपासून संरक्षण देण्यात कमी पडली, असाही आरोप केला जातोय.

अॅमेझॉन

फोटो स्रोत, Getty Images

अॅमेझॉनने आता आपल्या कर्मचाऱ्याची सुरक्षा आणि आरोग्यासाठी अनेक उपाययोजना आणण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी अमेरिकेतल्या आपल्या 3 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं आहे आणि इतर देशांमधल्या फ्रंटलाईनवर्कर्स लवकरच अशा उपाययोजना करू असं म्हटलं आहे.

अॅमेझॉन आपल्या सेवांचा विस्तार करत राहाणार आहे. नुकतीच त्यांनी अमेरिकेतल्या चार राज्यांमध्ये 'अॅमेझॉन स्काऊट' नावाची सेवा सुरू केली आहे. ही संपूर्ण स्वयंचलितपणे घरपोच वस्तू पोहचवणारी सेवा आहे. यात तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही माणसाच्या मदतीशिवाय वस्तू घरपोच पोहचवल्या जातात.

अॅमेझॉनच्या आणखी काही नव्या सेवांमध्ये प्राईम सदस्यांना औषधं स्वस्त दरात मिळू शकणारी अॅमेझॉन फार्मसी, शॉपिंगची सेवा - अॅमेझॉन वॉर्डरोब, आणि हजारो घरांच्या डिझाइन्समधून गोष्टी निवडण्याचा पर्याय देणाऱ्या डिस्कव्हर रूम सेवांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)