Twitter : एलॉन मस्क यांनी व्यवसायातील यशाबद्दल सांगितलेली 6 गुपितं

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क
    • Author, जस्टीन रौलट
    • Role, बीबीसी न्यूज

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक, इलेक्ट्रिक कारचे प्रणेते, माणसाला अंतराळात न्यायचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे एलॉन मस्क आता ट्विटरचे सर्वेसर्वा असणार आहेत.

एलॉन मस्क तब्बल 44 बिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटरचे सत्ताधीश होतील. बोर्ड ऑफ ट्विटरने याला मंजुरी दिली आहे.

टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या समभागांचं मूल्य वाढलं आणि या कंपनीसह 'स्पेस-एक्स' या कंपनीचेही कर्तेधर्ते असणारे एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती 185 अब्ज डॉलरांपलीकडे आहे.

त्यांच्या यशाचं गुपित काय आहे? काही वर्षांपूर्वी नेमक्या याच प्रश्नावर मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी पार केलेल्या या नवीन मैलाच्या दगडाचं निमित्त साधून या जुन्या मुलाखतीला पुन्हा उजाळा देऊन आम्ही ती आपल्या समोर सादर करतो आहोत. तर व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी एलॉन मस्क यांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्त्वं अशी:

1. हा काही पैशांचा मुद्दा नाही

व्यवसायाविषयीच्या इलॉन मस्क यांच्या दृष्टिकोनामध्ये हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे.

मी 2014 साली त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची कल्पना नसल्याचं म्हटलं होतं.

"कुठेतरी रोख रकमेचा ढिग जमवून ठेवल्यासारखी ही गोष्ट नसते," ते म्हणाले. "टेस्ला, स्पेस-एक्स आणि सोलार-सिटी या कंपन्यांमध्ये माझे काही समभाग आहेत आणि त्याला बाजारपेठेत काही मूल्य आहे, एवढंच हे आहे खरंतर."

"नैतिक आणि चांगल्या रितीने" पैशाचा पाठलाग करण्याला त्यांची काही हरकत नाही, पण व्यक्तीशः त्यांची प्रेरणा अशी नाही, असं ते म्हणाले.

त्यांचा हा दृष्टिकोन अर्थातच परिणामकारक ठरताना दिसतो आहे.

टेस्ला

फोटो स्रोत, Getty Images

'आयर्न मॅन'मधल्या टोनी स्टार्कचं पात्र रंगवताना रॉबर्ट डाउनी ज्युनिअर यांनी वास्तवातल्या मस्क यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतली होती, आणि 2014 साली आमची सदर मुलाखत झाली तेव्हा मस्क यांच्याकडील संपत्ती बहुधा 10 अब्ज डॉलर इतकी होती.

त्यांच्या 'टेस्ला' या इलेक्ट्रिक कार कंपनीने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांचं मूल्य 700 अब्ज डॉलरांवर जाऊन पोचलं. एवढ्या पैशामध्ये फोर्ड, जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन, फिआट ख्रिस्लर या कंपन्या विकत घेता येतील, आणि तरीही काही रक्कम उरेल, त्यात फरारी विकत घेता येईल.

पण लवकरच वयाच्या पन्नाशीत प्रवेश करणार असलेल्या मस्क यांना श्रीमंतीत मृत्यू यावा असं वाटत नाही. आपला बहुतांश पैसा मंगळावर तळ उभारण्यात खर्च होईल आणि या प्रकल्पात त्यांची सर्व संपत्ती संपली, तरी आश्चर्य वाटायला नको, असं ते म्हणाले.

किंबहुना, पैशाचा चांगला वापर करता आला नाही, या अपयशाची खूण म्हणून अब्जावधी डॉलर बँकेतच ठेवलेल्या स्थितीत आपल्याला मृत्यू यावा, असं बिल गेट्स यांच्याप्रमाणे बहुधा मस्क यांनाही वाटत असावं.

आयर्न मॅन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'आयर्न मॅन'मधल्या टोनी स्टार्कचं पात्र रंगवताना रॉबर्ट डाउनी ज्युनिअर यांनी वास्तवातल्या मस्क यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतली होती,.

2. प्रेरणांचा पाठपुरावा करा

मंगळावरच्या तळाचा इलॉन मस्क यांनी केलेला उल्लेख त्यांच्या यशाच्या गुरुकिल्लीचा निदर्शक आहे.

"भविष्यात गोष्टी अधिक चांगल्या असाव्यात, असं आपल्याला वाटतं," ते म्हणाले. "आयुष्य संपन्न करणाऱ्या या नवीन उत्साहवर्धक गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात."

उदाहरणार्थ, स्पेस-एक्स. अमेरिकेचा अंतराळविषयक कार्यक्रम पुरेसा महत्त्वाकांक्षी नसल्याने व्यथित होऊन त्यांनी 'स्पेस-एक्स' कंपनीची स्थापना झाल्याचं त्यांनी मला सांगितलं.

"आपण पृथ्वीपलीकडे जाऊन मंगळावर एखादी व्यक्ती पोचवू, चंद्रावर तळ स्थापन करू, आणि कदाचित अधिक वारंवार अंतराळात जाऊन येऊ, अशी माझी अपेक्षा होती," ते म्हणाले.

पण असं काही घडलं नाही, तेव्हा मस्क यांनी 'मार्स ओयासिस मिशन' ही संकल्पना मांडली. मंगळावर एक छोटे हरितगृह पाठवण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. लोकांना अंतराळाबाबत पुन्हा उत्साह वाटावा आणि 'नासा'ची आर्थिक तरतूद वाढवण्यासाठी अमेरिकी सरकारचं मन वळवावं, असा यामागचा विचार होता.

ही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना मस्क यांच्या लक्षात आलं की "इच्छाशक्तीचा अभाव" ही समस्या नसून "मार्गाचा अभाव" ही समस्या आहे- अंतराळ तंत्रज्ञान गरजेपेक्षा जास्त महागडे होते.

स्पेस-एक्सचं रॉकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्पेस-एक्सचं रॉकेट

ठरलं तर मग! जगातील सर्वांत स्वस्त रॉकेट-लाँचिंगचा व्यवसाय जन्माला आला.

हीच कळीची बाब आहे- पैसा कमावण्याच्या उद्देशाने या व्यवसायाची कल्पना निपजलेली नाही, तर माणसाला मंगळावर उतरवणं ही त्यामागची प्रेरणा आहे.

आपण स्वतःला गुंतवणूकदार नाही तर अभियंता मानतो, असं मस्क यांनी मला सांगितलं. तांत्रिक समस्या सोडवण्याची इच्छा त्यांना उमेद देते, असंही ते म्हणतात.

बँकेतले डॉलर नव्हे, तर तांत्रिक समस्यांची सोडवणूक ही त्यांच्या प्रगतीची मोजपट्टी आहे. आपल्या व्यवसायांनी काही अडथळ्यांवर मात केली, तर तीच समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या इतर सर्वांना त्याची मदत होते, हे त्यांना माहीत आहे आणि ते कायम याच दिशेने जातात.

त्यामुळे टेस्लाची सर्व पेटंट आपण लवकरच खुली करणार आहोत, अशी घोषणा मस्क यांनी आमच्या भेटीच्या थोडं आधी केली होती. पेटंट खुलं झालं तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासाला गती मिळेल, असा त्यांचा उद्देश आहे.

3. मोठा विचार करायला घाबरू नका

इलॉन मस्क यांचे व्यवसाय अत्यंत धाडसी असतात, हीदेखील एक लक्षणीय बाब आहे.

त्यांना कार उद्योगात क्रांती घडवायची आहे, मंगळावर वसाहत वसवायची आहे, पोकळीच्या बोगद्यांमध्ये दृतगती ट्रेनचे मार्ग बांधायचे आहेत, कृत्रिम प्रज्ञा मानवी मेंदूंशी एकात्म करायची आहे आणि सौरऊर्जा व बॅटरी उद्योग भरभराटीला आणायचे आहेत.

इथे एक समान धागा दिसतो. त्यांचे सर्व प्रकल्प 1980 च्या दशकातील मुलांच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या भविष्यवेधी कल्पितकथांसारखे वाटतात.

उदाहरणार्थ, हे पाहा: बोगद्यांसंबंधीच्या त्यांच्या व्यवसायाचं नामकरण 'द बोअरिंग कंपनी' असं करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत लहानपणी वाचलेली पुस्तकं आणि पाहिलेले चित्रपट यातून आपण प्रेरणा घेतली, ही वस्तुस्थिती मस्क यांनी गोपनीय ठेवलेली नाही.

यातून आपण मस्क यांच्या व्यवसायाविषयीच्या तिसऱ्या मार्गदर्शक तत्त्वाकडे येतो: दबून जाऊ नका.

अनेक कंपन्यांच्या सवलतीच्या रचनांमुळे महत्त्वाकांक्षा रोडावते, असं त्यांना वाटतं.

खूप जास्त कंपन्या 'पगारवाढवादी' आहेत, असं ते म्हणाले. "एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही सीईओ पदावर असाल आणि काही मर्यादित सुधारणा करण्याचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलंत, ते गाठण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागला, आणि तरीही ते म्हणावं तसं परिणामकारक ठरलं नाही, तर कोणी तुम्हाला दोष देत नाही," असे ते मला म्हणाले. 'दोष माझा नव्हता, पुरवठादारांची चूक होती,' असं सांगून तुम्ही तो विषय झटकून टाकू शकता.

टेस्लाचा नवा कारखाना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टेस्लाचा नवा कारखाना

पण तुम्ही धाडसी असाल आणि खरोखरच निर्णायक सुधारणा करू धजत असाल, तर हे असं चालत नाही. अशा प्रयत्नांत अपयश आलं, तर तुम्हाला निश्चितपणे नोकरीवरून काढलं जाऊ शकतं, असं मस्क म्हणतात. त्यामुळे बहुतांश कंपन्या त्यांच्या विद्यमान उत्पादनांमध्ये छोट्या सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि पूर्णतः नवीन कल्पना अंमलात आणण्याचं धाडस करत नाहीत.

त्यामुळे "अर्थपूर्ण ठरेल असंच काम" आपण करतो आहोत याची खातरजमा करा, असा सल्ला ते देतात.

"अर्थपूर्ण कामा"च्या मस्क यांनी केलेल्या वैयक्तिक श्रेणीमध्ये दोन गोष्टी ठळकपणे नजरेत भरतात.

एक, जीवाश्म इंधनाचा वापर अधिकाधिक कमी होत जावा, अशी त्यांची इच्छा आहे.

याबद्दल ते असं म्हणतात: "आपण वायू मिळवण्यासाठी अगदी खोलवर खणत चाललो आहोत आणि खोलवर जाणाऱ्या तेलाच्या खाणींचा प्रदेश कॅम्ब्रिअन युगापासून अंधारात राहिलेला आहे. स्पंज हा सर्वांत व्यामिश्र जीव होता त्या काळी हे प्रदेश प्रकाशात होते. तर, ही कृती शहाणपणाची आहे का, याबद्दल खरोखर प्रश्न उपस्थित करायला हवा."

दोन, मंगळावर वसाहत करून आणि "जीवन बहुग्रहीय करून" माणूस प्राणी दीर्घ काळ टिकावा, अशी त्यांची इच्छा आहे.

मी म्हटलं तसं, मोठा विचार करा.

4. जोखीम घेण्याची तयारी ठेवा

हे स्वाभाविक आहे.

आपली कामगिरी चांगली व्हायची असेल तर तेवढी धमक दाखवावी लागते, पण इलॉन मस्क यांनी बहुतेकांहून जास्त जोखमी पत्करल्या आहेत.

२००२ सालापर्यंत त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन कंपन्यांमधील स्वतःचे समभाग विकून टाकले होते. यातली एक होती इंटरनेट सिटी गाईट म्हणून काम करणारी 'झिप-टू' आणि दुसरी होती ऑनलाइन पेमेन्टची सेवा पुरवणारी 'पे-पाल'. तेव्हा त्यांनी नुकताच तिशीत प्रवेश केला होता आणि त्यांच्या बँक-खात्यात जवळपास २० कोटी डॉलर जमा होते.

आपली अर्धी संपत्ती या व्यवस्यांमध्ये गुंतवून उर्वरित अर्धी सोबत ठेवायची, अशी योजना होती, असं ते सांगतात.

पण त्या योजनेनुसार गोष्टी घडल्या नाहीत. मी त्यांना भेटलो तेव्हा ते त्यांच्या व्यावसायिक जीवनातील सर्वांत अंधःकारमय कालखंडातून बाहेर पडत होते.

त्यांच्या नव्या कंपन्यांना सर्व प्रकारच्या भयंकर संकटांना सामोरं जावं लागलं. 'स्पेस-एक्स'ने केलेली पहिली तीन प्रक्षेपणं अपयशी ठरली, आणि टेस्लामध्येही उत्पादनासंदर्भात, पुरवठासाखळीसंदर्भात आणि डिझानबाबत विविध समस्या उद्भवून गेल्या.

मग वित्तीय संकट कोसळलं.

टेस्ला

फोटो स्रोत, Getty Images

यात कठोर निवड करायची होती, असं मस्क म्हणाले. "मी एकतर पैसे स्वतःपाशी ठेवू शकत होतो, पण तसं केलं असतं तर कंपन्या निश्चितपणे मरण पावल्या असत्या, किंवा मग माझ्याकडची उरलीसुरली पुंजी कंपन्यांमध्ये गुंतवून शक्यता तपासयची, असा पर्याय होता."

त्यांनी पैसे कंपन्यांमध्ये ओतायचा पर्याय स्वीकारला.

एका टप्प्यावर ते कर्जात इतके बुडाले होते की, त्यांना दैनंदिन जगण्याचा खर्च भागवण्यासाठी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागले, असं त्यांनी मला सांगितलं.

अशा वेळी दिवाळखोरीची शक्यता त्यांना धास्तावून गेली का?

यावर ते नकारार्थी उत्तर देतात: "कदाचित माझ्या मुलांना सरकारी शाळेत जावं लागलं असतं. पण त्यात काही विशेष नाही. मी स्वतः सरकारी शाळेतच गेलो होतो."

5. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा

आपल्याला यातना होत असताना अनेक तज्ज्ञ व भाष्यकार या परिस्थितीचा आनंद घेत होते, याचा त्यांना खरोखरच धक्का बसला आणि 2014 साली याने ते खूपच नाराज होते.

"उदारमतवाद्यांची परपीडेतून आनंद घ्यायची वृत्ती खूपच अचंबित करणारी होती," मस्क म्हणाले. "टेस्लाच्या मरणासाठी घटका मोजणारे अनेक ब्लॉग चालवले जात होते."

मस्क यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये एक प्रकारचा अहंकार असल्यामुळे कदाचित लोकांना त्यांनी अपयशी ठरावं असं वाटत असेल, अशी शक्यता मी नोंदवली.

त्यांनी ही शक्यता नाकारली. "आपण एखादी गोष्ट निश्चितपणे करू, असं म्हटलं तर त्यात अहंकार असेल, पण आपण एखादी गोष्ट करण्याची इच्छा बाळगतो आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असं म्हणणं काही अहंकारी नसतं, असं मला वाटतं."

यातून आपण मस्क यांच्या व्यावसायिक यशाविषयीच्या पुढच्या धड्यापाशी येतो: टीकाकारांकडे लक्ष देऊ नका.

स्पेस-एक्स व टेस्ला यांची स्थापना झाली तेव्हा या कंपन्या पैसा कमावतील असं आपल्याला वाटत नसल्याचं मस्क मला म्हणाले. वास्तविक इतरही कोणाला असं वाटत नव्हतं.

पण त्यांनी अनिष्टसूचक टीकाकारांकडे दुर्लक्ष केलं आणि पुढचं पाऊल टाकलं.

का? तर, हा माणूस किती पैसे कमावले यावरून यश जोखत नाही, तर किती महत्त्वाच्या समस्या आपण सोडवल्या त्या आधारे यशाचं मोजमाप करतो, हे लक्षात ठेवा.

हे किती मुक्तिदायी असेल! आपली मोठी आर्थिक जोखीम फोल गेल्यामुळे आपण मूर्ख ठरलो तरी त्यांना फिकीर वाटत नाही, ते महत्त्वाच्या संकल्पनांचा पाठपुरावा करण्याचीच फिकीर करतात.

यामुळे निर्णय घेणं खूपच सोपं होतं, कारण ते त्यांना खरोखरच अर्थपूर्ण वाटणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

आणि ते जे काही करतात ते बाजारपेठेलाही आवडताना दिसतं.

ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेमधील गुंतवणूक क्षेत्रातील मॉर्गन स्टॅन्ले या बँकेने 'स्पेस-एक्स'चे मूल्यांकन 100 अब्ज डॉलर इतके केले होते.

या कंपनीने अंतराळ प्रवासाच्या अर्थकारणात परिवर्तन घडवलं, पण आपल्या कंपनीने अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमाला नवसंजीवनी पुरवली याचा मस्क यांना सर्वाधिक अभिमान वाटतो.

गेल्या वर्षी त्यांच्या 'क्र्यू ड्रॅगन' यानांमधून सहा अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने झेपावले. 2011 साली अंतराळ यानं सेवेतून काढून टाकण्यात आल्यापासून अमेरिकेच्या भूमीवरून अशी मोहीम पहिल्यांदाच राबवली गेली.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क

6. आनंद लुटा

या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरलं, शिवाय सोबतीला थोडं नशीब असेल, तर तुम्ही प्रचंड श्रीमंत आणि तितकेच प्रसिद्धही व्हाल. मग तुम्ही तुमच्या कोशातून बाहेर यायचा प्रयत्न करू शकाल.

इलॉन मास्क यांचा आत्यंतिक कामसूपणा सुविख्यात आहे. टेस्ला मॉडेल-३चे उत्पादन योग्य दिशेने जावे यासाठी ते आठवड्याचे 120 तास काम करत होते, असं ते अभिमानाने सांगतात. पण आम्ही भेटलो तेव्हापासून ते जगण्याचा आनंद लुटत असल्याचं दिसतं.

मानहानीचे दावे ठोकून, विमानात मादक पदार्थांचे धूम्रपान करून आणि समाजमाध्यमांवर त्रागा व्यक्त करून त्यांनी अनेक वादांना तोंड फोडलं.

आपण 'टेस्ला' कंपनी खाजगी मालकीची करण्याच्या विचारात आहोत, असं ट्विटरवर जाहीर करून त्यांनी 2018 साली अमेरिकेच्या वित्तनियामक संस्थेसोबतचा वाद ओढवून घेतला. कोव्हिड-19 साथीमुळे सॅन फ्रान्सिस्को बे एरियातील कारखान्यामधलं उत्पादन बंद करणं 'टेस्ला' कंपनीला भाग पडलं, तेव्हा त्यांनी कोरोनाकाळातील टाळेबंदीच्या निर्बंधांचा जोरदार विरोध सुरू केला.

या विषाणूवरून पसरलेली भयग्रस्तता "मूर्खपणा"ची आहे, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं. घरातच राहण्याचे आदेश म्हणजे "सक्तीचा तुरुंगवास" आहे, हे आदेश "फॅसिस्टवादी" आहेत, त्यातून सांविधानिक अधिकारांचा भंग होतो, असंही ते म्हणाले.

उन्हाळ्यामध्ये त्यांनी आपली भौतिक मालमत्ता विकून टाकण्याची योजना जाहीर केली. ही मालमत्ता "आपल्यावरचं ओझं वाढवते" असं कारण त्यांनी दिलं.

यानंतर काहीच दिवसांनी ट्विटवरून त्यांनी जगाला कळवलं की, त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं नामकरण X Æ A-12 Musk असं केलं जाईल.

पण या अनाकलनीय वर्तनाचा परिणाम त्यांच्या व्यवसायांवर झाल्याचं दिसत नाही, आणि त्यांच्यातला उद्योजक आधीसारखाच महत्त्वाकांक्षी आहे.

तीन वर्षांमध्ये 'टेस्ला' कंपनी 25 हजार डॉलरमध्ये मिळणारी, 'अनिवार्य' ठरेल अशी कार बाजारपेठेत आणेल, असा दावा मस्क यांनी सप्टेंबर महिन्यात केला. नंतर लगेच त्यांनी असंही सांगितलं की, कंपनीच्या सर्व नवीन कार पूर्णतः स्वयंचलित असतील.

आणि वर्षअखेरीला, डिसेंबर महिन्यात त्यांना प्रचंड मोठा तडाखा बसला. 'स्पेस-एक्स' कंपनीने स्टारशिप या प्रेक्षपण वाहनाची चाचणी डिसेंबरमध्ये केली. या वाहनातून पहिल्यांदाच मानव मंगळावर जाईल, अशी आशा त्यांना वाटते आहे.

पण हे महाकाय यान उड्डाण केल्यानंतर सहा मिनिटांनी स्फोट होऊन खाली कोसळलं.

इलॉन मस्क यांनी ही चाचणी "विलक्षण" यशस्वी ठरल्याचे कौतुकोद्गार काढले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)