2020: कोरोना काळात या 5 अब्जाधीशांची संपत्ती भरमसाठ वाढली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेदाक्सियॉन
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
एकीकडे कोरानाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागलं, तर त्याचवेळी दुसरीकडे असे काही उद्योगपती आहेत, ज्यांनी कोरोनाच्या काळात आधीपेक्षा जास्त कमाई केली.
कोरोनामुळे जगभरात जवळपास 16 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. बऱ्याच अडचणींना अनेकांना सामोरं जावं लागलं आणि अजूनही लागत आहे.
मात्र, या काळातही काही अब्जाधीश आणखीच श्रीमंत बनले.

फोटो स्रोत, Getty Images
जगातील 60 टक्क्यांहून अधिक अब्जाधीश 2020 या वर्षात आणखी श्रीमंत झाले आणि त्यातील पाच जणांची एकूण संपत्ती तर 310.5 अब्ज डॉलर झालीय. आपण या पाच जणांबद्दलच जाणून घेणार आहोत.
एलॉन मस्क - टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ
स्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची संपत्ती 2020 या वर्षात 140 अब्ज डॉलरने वाढली. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (21 डिसेंबर) मस्क यांची संपत्ती 1,67,000 दशलक्ष डॉलरवर पोहोचली.
या वाढलेल्या संपत्तीमुळे एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीतही काही पायऱ्या वर चढले. नोव्हेंबर महिन्यातील जगातील श्रीमंतांची यादी पाहिल्यास, एलॉन मस्क हे बिल गेट्स यांना मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या स्थानी मात्र अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस हेच कायम आहेत.

फोटो स्रोत, EPA
फोर्ब्स मासिकाचं म्हणणं आहे की, त्यांनी जेव्हापासून श्रीमंतांची यादी बनवण्याचा उपक्रम सुरू केला, तेव्हापासून आजवर कुणाच्या संपत्तीत एका वर्षात एवढी भरमसाठ वाढ झाल्याचे निदर्शनास आलं नाही.
एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती करते. यंदा या कंपनीच्या कारच्या विक्रीतही विक्रमी वाढ झाली. मस्क यांची दुसरी कंपनी स्पेस एक्सनेही कमालीची प्रगती केली आहे. अंतराळात अॅस्ट्रोनॉट लॉन्च करणारी स्पेस एक्स ही जगातील पहिली खासगी कंपनी आहे.
जेफ बेजोस - अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ
जेफ बेजोस हे 2020 सालाच्या सुरुवातीलाही जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी होते आणि 2020 साल संपत आलं असतानाही पहिल्या स्थानीच आहेत.
जेफ बेजोस केवळ ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनचेच संस्थापक नाहीत, तर अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉशिंग्टन पोस्ट'चेही ते मालक आहेत.

फोटो स्रोत, Reuters
बेजोस यांनी 2020 या वर्षात आपल्या संपत्तीत 72 अब्ज डॉलर अधिकचे जोडले. कोरोना काळात अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केल्याने ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फायदा अमेझॉनला झाला.
काही महिन्यांआधी जेफ बेजोस यांच्या एकूण संपत्तीने 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला होता.
जेफ बेजोस सामाजकार्यातही सहभागी होत असतात. फेब्रुवारीत त्यांनी 10 अब्ज डॉलर एवढी भलीमोठी रक्कम क्लायमेट चेंजबाबतच्या लढ्यासाठी दिली. नोव्हेंबरमध्ये 80 कोटी डॉलर त्यांनी वातावरण बदलाबाबत काम करणाऱ्या संस्थांनादान केले.
जोंग शनशन - नों फू स्प्रिंगचे संस्थापक
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जोंग शनशन यांची एकूण संपत्ती 62.6 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. आताची त्यांची एकूण संपत्ती 69 अब्ज डॉलर एवढी आहे.
जोंग हे सप्टेंबर महिन्यात चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यांची नों फू स्प्रिंग ही कंपनी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर विकण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यातून 1.1 अब्ज डॉलरहून अधिक कमाई कंपनीची झाली.

फोटो स्रोत, Getty Images
नों फू स्प्रिंग कंपनीची स्थापना 1996 साली झाली होती. आशियातील बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातला बराचसा भाग या कंपनीचा आहे. आजच्या घडीला या कंपनीची किंमत 70 अब्ज डॉलर आहे.
66 वर्षीय जोंग शनशन हे कंपनीच्या 84 टक्क्यांहून अधिक भागाचे मालक आहेत, ज्याची किंमत 60 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.
शनशन हे टेनसेंट्सचे पोनी मा आणि अलीबाबचे जॅक मा यांसारख्या अब्जाधीशांनाही मागे टाकत पुढे निघून गेलेत. आजच्या घडीला ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
चीनमध्ये लस निर्माण करणाऱ्या बीजिंग वॉन्टा बायोलॉजिकल फार्मसीची मालकी सुद्धा जोंग शनशन यांच्याकडेच आहे. ही कंपनी कोरोनावर नाकातून घेतला जाणारा स्प्रे तयार करण्याचं काम करतेय. नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चाचणी या स्प्रेची सुरू होती.
बर्नाड आरनॉल्ट - LVMH ग्रुपचे मालक
बर्नाड आरनॉल्ट हे फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि फोर्ब्सने त्यांना श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, तर ब्लूमबर्गने चौथ्या क्रमांकावर स्थान दिला आहे.
लग्जरी वस्तू बनवणाऱ्या LVMH कंपनीचे अरनॉल्ट हे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 146.3 अब्ज डॉलर आहे. त्यांच्यासाठी चालू वर्ष कठीण होतं, मात्र तरीही या वर्षात त्यांच्या संपत्तीत 30 टक्के वाढ झाली.

फोटो स्रोत, Reuters
कोरोनाच्या संकटामुळे LVMH ने टिफनी अँड कंपनीच्या खरेदीची योजना रोखली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये त्यांनी 15.8 अब्ज डॉलरमध्ये या कंपनीची खरेदी केली.
लग्जरी उत्पदनांच्या विक्रीत कोरोनाच्या काळात मोठी घट झाली. मात्र, LVMH कंपनीच्या प्रगतीमुळे अनेकांना धक्काच बसला आहे. दक्षिण कोरिया आणि चीनममध्ये या कंपनीच्या उत्पदनाची मोठी विक्री झाली.
डॅन गिलबर्ट - रॉकेट कंपनीचे अध्यक्ष
58 वर्षीय गिलबर्ट हे NBA क्लीवलँड कॅव्हेलियर्सचे मालक आहेत आणि ऑनलाईन मॉर्टेज कंपनी क्विकन लोन्सचे सहसंस्थापक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, 2020 या वर्षात गिलबर्ट यांच्या एकूण संपत्तीत 28.1 अब्ज डॉलर्सनी वाढ झाली. आता त्यांची एकूण संपत्ती 35.3 अब्ज डॉलर आहे.
क्विकन लोन्सची मूळ कंपनी असलेल्या रॉकेट कंपनीने ऑगस्टमध्ये शेअर आणि इतर वित्तीय साधनांची सार्वजनिक विक्री सुरू केली. गिलबर्ट यांच्याजवळ रॉकेट कंपनीचे 80 टक्क्यांहून अधिक शेअर्सची मालकी आहे. या शेअर्सची किंमत 31 अब्ज डॉलर एवढी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








