गुगलच्या विरोधात कायदेशीर लढाई जिंकणारी 'ही' महिला कोण आहे?

शेनॉन वेट
फोटो कॅप्शन, शेनॉन वेट
    • Author, जेम्स क्लेयटन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकवेळ अशी येते की प्रत्येकाचीच सहनशक्ती संपते. अशी स्थिती एखाद्या क्षुल्लक कारणावरून किंवा मोठ्या घटनेवरून येऊ शकते.

गुगलनं दिलेली पाण्याची बाटली तुटली तेव्हा शेनॉन यांच्यासाठी ही वेळ आली. ज्या डेटा सेंटरमध्ये त्या काम करत होत्या, तिथं खूप गरम होत होतं. त्यामुळे मग त्यांनी कंपनीकडे अजून एक बाटली मागितली, पण गुगलसाठी काम करणाऱ्या कंत्राटदारानं बाटली देण्यास नकार दिला.

यानंतर अनेक घडामोडी घडत गेल्या आणि गुगलला गेल्या आठवड्यात एक घोषणा करावी लागली. गुगलनं एक वक्तव्य प्रसिद्ध करत म्हटलं की, कंपनीच्या कर्माचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असलेलं वातावरण आणि मिळणारं वेतन याविषयी चर्चा करण्याचा अधिकार आहे.

कंपनीला असं निवेदन प्रसिद्ध करावं लागलं, हे थोडं विचित्र वाटतं. पण खरं बघितलं तर शेनॉन आणि कंपनीमध्ये चाललेल्या युद्धाचा हा शेवट आहे.

शेनॉन यांची गोष्ट एवढ्या मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापन पद्धतीविषयी बरंच काही सांगते. कधीकधी कंपनीचं व्यवस्थापन कसं आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जातं, हे यावरून लक्षात येतं

2018मध्ये इतिहास या विषयात पदवी घेतलेल्या शेनॉन यांनी साऊथ कॅरोलिनामधील गुगलच्या डेटा सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी प्रति तास 15 डॉलर (1120 रुपये) मिळायचे.

शेनॉन सांगतात, "मी सर्व्हर ठीक करायचं काम करायचे. यात हार्ड ड्राईव्ह, मदर बोर्ड बदलावा लागत असे. मोठमोठ्या बॅटरी उचलाव्या लागत. हे एक अवघड काम होतं."

गुगलची कार्यालयं रचनात्मक असतात. तिथं कर्मचारी मजाही करू शकतात. तिथं टेबल टेनिसची व्यवस्था असते, मोफत स्नॅक्सही मिळतं. म्यूझिक रुम असतात. असं असलं तरी सगळं काही इतकं मजेशीर नसल्याचं शेनॉन सांगतात.

त्या सांगतात, "जसं चित्रपटांत दाखवलं जातं, तसं ऑफिसमध्ये लोक पूर्ण दिवस गेम नाही खेळत. डेटा सेंटर यापेक्षा पूर्णत: वेगळे असतात."

शेनॉन या गुगलकडे कंत्राटी तत्वावर काम करत होत्या. याचा अर्थ त्या काम गुगलसाठी करत असल्या तरी त्यांना मोडीज नावाच्या एका कंपनीनं नियुक्त केलं होतं. ही कंपनी एडेको नावाच्या एका कंपनीचा भाग आहे, एडेकोच्या इतर अनेक कंपन्या आहेत.

गुगलमध्ये आता अशाप्रकारे कंत्राटी तत्वावर काम करून घेणं सामान्य होत चाललंय. एका रिपोर्टनुसार, गुगलमध्ये निम्मे कर्मचारी असे आहेत जे कंत्राटी तत्वावर काम करतात.

शेनॉन सांगतात, "कोरोना व्हायरस आल्यानंतर काम वाढलं, एका शिफ्टमधील कामात वाढ झाली. यात एक प्रकार लालूच पण होती."

शेनॉन वेट

त्या सांगतात, "मे 2020मध्ये गुगलनं घोषणा की, लोकांच्या विनंतीला मान देत कंपनी कोरोना संकटाचा सामना करेल. प्रत्येक कर्मचारी मग त्यात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचारीही आले, अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस मिळेल, असं कंपनीनं म्हटलं."

पण, जेव्हा बोनस द्यायची वेळ आली तेव्हा मात्र आम्हाला तो मिळाला नसल्याचं ते सांगतात.

यामुळे मग आम्ही चिंतेत होतो, कारण अनेक गोष्टींसाठी आम्हाला पैशांची गरज होती. असं असतानाही वेतनभत्त्यावर चर्चा करू नका, असं कंपनीनं म्हटल्याचं त्या सांगतात.

शेनॉन आणि मॅनेजर यांच्यातील संवाद

शेनॉन यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या मॅनेजरनं मला मेल करून सांगितलं की सहकाऱ्यांबरोबर आपल्या वेतनासंबंधी चर्चा करणं योग्य नाही."

शेवटी शेनॉन यांना बोनस मिळाला. पण तोपर्यंत याप्रकरणी निराशा आल्याचं त्या सांगतात. गुगलमध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळेल, अशी त्यांना आशा होती.

शेनॉन यांच्या लक्षात आलं की, कंपनीत कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांना घेण्याची संस्कृती वाढत चाललीय. त्या सांगतात, कंपनीत असे अनेक कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते कधीच पर्मनंट होणार नाहीत.

व्यवस्थापन प्रणालीच्या वर्तवणुकीमुळे चीड निर्माण झाल्याचं त्या सांगतात.

त्या म्हणतात, "डेटा सेंटरमध्ये खूप गरम होत होतं. गुगलनं आम्हाला एक पाण्याची बाटली दिली, पण त्याचं टोपण माझ्याकडून तुटलं."

असंच शेनॉन यांच्या सहकाऱ्यासोबत झालं आहे. ती एक पर्मनंट कर्मचारी होती. शेनॉन यांच्या मते, "तिला नवी बाटली देण्यात आली पण मला नाकारण्यात आली. त्यानंतर एक वेळ अशी आली की माझा संयम संपला आणि मी घरी आल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट लिहिली."

शेनॉन वेट

त्या सांगतात, "पुढच्या दिवशी मी कामावर गेले तेव्हा मला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावण्यात आलं. तिथं मॅनेजरसहित इतर सगळे जण उपस्थित होते. त्यांनी मला म्हटलं की, तुम्ही फेसबुकवर केलेली पोस्ट ही तुम्ही कंपनीसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन आहे. तुम्ही कंपनीसाठी धोकादायक आहात. मला लगेच माझं सामान आणि लॅपटॉप वापस करण्यास सांगितलं. ते मला कार्यालयाच्या बाहेर घेऊन गेले."

गुगलच्या कर्मचाऱ्यांनी जानेवारी 2021मध्ये अल्फाबेट वर्कर्स युनियन बनवली होती. याला अमेरिकेच्या नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्डानं मान्यता दिलेली नाहीये. बऱ्याचदा या संघटनेला मायनॉरिटी युनियन संबोधलं जातं कारण गुगलमध्ये काम करणारे बरेचसे कर्माचारी या यूनियनचे सदस्य नाहीयेत. पण, शेनॉन या युनियनच्या सदस्य होत्या आणि युनियननं त्यांचं प्रकरण उचलून धरलं.

फेब्रुवारी महिन्यात युनियननं शेनॉन यांच्याकडून अयोग्य श्रम कायद्याअंतर्गत दोन प्रकरणं दाखल केली. यातलं पहिलं प्रकरण युनियनच्या बाजूनं बोलल्यामुळे निलंबित करणं याशी संबंधित होतं. तर दुसरं प्रकरण मॅनेजर सोबतच्या वेतनाशी संबंधित चर्चा या बाबीशी संबंधित होतं.

गेल्या महिन्यात गुगल, मोडीज आणि अल्फाबेट वर्कर्स युनियन यांच्यात करार झाला आणि शेनॉन यांचं निलंबन मागे घेण्यात आलं.

गुगलनं एका दस्तावेजावर हस्ताक्षर केलं. ज्यात म्हटलंय की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपलं वेतन, बोनस आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती यावर चर्चा करण्याचा अधिकार आहे.

गुगल आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेला समझौता
फोटो कॅप्शन, गुगल आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेला करार

हा शेनॉन आणि युनियनसाठी विजय होता. त्या सांगतात, "या ट्रिलियन डॉलर कंपनीच्या वेअरहाऊस आणि डेटा सेंटरमध्ये काम करणारे लोक आपल्या छोटछोट्या अधिकारांपासून वंचित राहिल्यामुळे थकले आहेत. कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांचं ऐकत नाही, असा त्यांना अनुभव येत आहे. आता मात्र आम्ही कंपन्यांना आमचं म्हणणं सांगू."

काही दिवसांपूर्वी अलाबामामध्ये अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी यूनियन बनवण्यासाठी मतदान केलं. कर्मचाऱ्यांनी संघटना बनवू नये, असं कंपनीला वाटतं.

या मतदानाचा निकाल लवकरच येईल. आता हे म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील लढाया आहेत. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना कंपन्या महत्त्व देत नाहीत.

शेनॉन सांगतात, "मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट जी लोकांनी शिकायला पाहिजे ती म्हणजे गुगलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मोठा पगार मिळायला पाहिजे. तसंच गुगलमध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडेही खूप ताकद आहे, ही गोष्टसुद्धा ते शिकू शकतात. इतकी ताकद ज्याचा अंदाजही कंपनीला लावता येत नाही."

गुगलनं काय म्हटलं?

असं असलं तरी गुगलनं याप्रकरणी आपण काही चूक केली, असं स्वीकार केलेलं नाहीये. तसंच कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सहभागीदार (सह-नियोक्ता) आहे, हेसुद्धा कंपनीनं मान्य केलं नाही. बीबीसीनं शेनॉनचं प्रकरण गुगलसमोर मांडलं, तेव्हा कंपनीनं म्हटलं की, याप्रकरणी अधिक काही बोलण्यासारखं आमच्याकडे नाहीये.

एडेक्कोशी संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर दिलं नाही.

शेनॉन आता पुन्हा गुगलच्या डेटासेंटरमध्ये काम करू इच्छित आहे, तसंच इतिहासात पीएचडीही करायची आहे.

एवढ्या मोठ्या कंपनीविरोधातील युद्ध जिंकून त्यांनी इतिहासाच्या पुस्तकांमधील आपली जागा निश्चित केली आहे. एका मोठ्या कंपनीविरोधातील कर्मचाऱ्याचा हा एक दुर्मिळ असा विजय आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)