Happy Birthday Google : गेल्या 20 वर्षांत गुगलने असं व्यापलं आपलं विश्व

फोटो स्रोत, Google
- Author, टिम हारफोर्ड
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
"बाबा, मृत्यूनंतर तुमचं काय होणार?"
"मला माहीत नाही, बेटा. याचं नेमकं उत्तर कुणालाच माहीत नाही. तू गुगललाच विचार ना?"
नक्कीच मृत्यूनंतरचं जग आहे की नाही, हे सांगण्याइतपत गुगल बुद्धिमान नाही. पण हुशार आणि मृत्यू या शब्दांपेक्षा आपल्या बोलण्यात गुगल हा शब्द जास्त वेळा येतो, असं ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लँकेस्टरच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
कारण आज जेवण ऑर्डर करण्यापासून सिनेमाची तिकिटं बुक करण्यापर्यंत, रस्ते शोधण्यापासून ते अगदी आपल्या आवडत्या सिंगरची सगळी माहिती मिळवण्यापर्यंतची सगळी कामं गुगलवर करतो.
कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा एक प्रोजेक्ट कसा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक झाला, तोही अगदी दोन दशकांत, हे थक्क करणारं आहे.
गुगलच्या आधीचा काळही आज आठवत नाही, बहुदा आपल्यापैकी अर्ध्याअधिक लोकांनी तर त्या काळी इंटरनेट हाताळलंही नसावं. त्यावेळी इंटरनेटवर गोष्टी शोधण्याचं वेब सर्च तंत्रज्ञान फारच प्राथमिक होतं.
त्यावेळी लायकॉस नावाचं एक सर्च इंजिन प्रसिद्ध होते. त्यात 'कार' हा शब्द सर्च केला की रिझल्टमध्ये कधीकधी अश्लील वेबसाईट यायच्या. कारण त्याकाळी बऱ्याच अश्लील वेबसाईट त्यांच्या बॅकग्राउंडमध्ये जास्त सर्च केले जाणारे शब्द वापरायच्या. त्यामुळे कार हा शब्द लॉयकॉसच्या अल्गोरिदमला अश्लील वेबसाईटमध्ये जास्त दिसायचा आणि त्यातून अशा गफलती व्हायच्या.
आजच्या गुगलच्या काळात हा नक्कीच हास्यास्पद वाटणारा प्रकार आहे. पण गंमत अशी की आजपासून 20 वर्षांपूर्वी लॅरी पेज आणि सरजे ब्रिन हे एखादं चांगलं सर्च इंजिन बनवण्याच्या उद्देशानं काम करत नव्हते. त्यांच्यासाठी तर हा स्टॅनफर्ड विद्यापीठातला केवळ एक अॅकॅडमिक प्रोजेक्ट होता.

फोटो स्रोत, Getty Images
शैक्षणिक क्षेत्रात रिसर्च जर्नल्सना मोठं महत्त्व असतं. त्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनांचा इतर संशोधकांनी किती वेळा संदर्भ दिला, याला मोठं महत्त्व असतं. जितक्या जास्त वेळा एखाद्या संशोधानाचा संदर्भ दिला गेला तितकी त्या संशोधनाची विश्वासार्हता जास्त असते.
पेज आणि ब्रिन यांना उमगलं होतं की वर्ल्ड वाईड वेबवरील सर्व लिंकचं विश्लेषण करता आलं तर प्रत्येक वेबपेजच्या विश्वासार्हतेचं त्या त्या विषयानुसार रॅकिंग करता येऊ शकतं. मग तसं काम करणारा एक अल्गोरिदम डेव्हलप करण्याचं काम सुरू झालं.
हा शोध लावताना विद्यापीठातील फार मोठ्या बँडविड्थचा वापर झाला. या दोघांनी त्यांच्या अल्गोरिदममध्ये बरीच सुधारणा केली आणि कुठलीही माहिती ऑनलाईन शोधण्याची अधिक चांगली पद्धत शोधून काढली होती.
पण आताही कार शब्द टाकल्यावर त्या पॉर्न साईट येणार का? की कामाचे योग्य ते रिझल्ट येतील?
पेज आणि ब्रिन यांनी तयार केलेल्या अल्गोरिदममध्ये अशी सोय केली की बॅकग्राउंडमध्ये 'कार' सारखे शब्द वापरणाऱ्या पॉर्न साईट्सचं लिंकिंग कारसाठीच्या खऱ्या वेबसाईटमध्ये होणार नाही. म्हणजे कार शोधायची असल्याच कारबद्दलचीच माहिती मिळेल, अशी त्यांनी शोधलेल्या सर्च इंजिनवर तरतूद होती.
पेज आणि ब्रिन यांच्या या संशोधनाला गुंतवणुकदार मिळाले आणि या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून 'गुगल' ही खासगी कंपनी जन्मास आली.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या गुगल जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता जरी गूगलचा नफा प्रचंड असला तरी सुरुवातीची काही वर्षं पेज आणि ब्रिन यांना स्वतःच्या खिशातूनच गुगलचा खर्च भागवायचे.
या गुगलला बिझनेस मॉडेल गवसायला 2001 उजाडलं. हे मॉडेल म्हणजे 'पे पर क्लिक' जाहिराती. या मॉडेलमध्ये जाहिरातदार गुगलला फक्त तेव्हाच पैसे देतात जेव्हा त्यांची जाहिरात त्यांच्या उत्पादनात रुची असणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचते.
वृत्तपत्रांना जाहिराती देण्यापेक्षा हे जास्त प्रभावी होते, कारण वृत्तपत्रात जाहिरात पाहणारे वाचक त्या उत्पादनांत रुची ठेवणारे असतीलच, असं नसतं.
हा झाला गुगलचा आर्थिक परिणाम.
सर्चचं चांगलं तंत्रज्ञान पेज आणि ब्रिन यांनी शोधलं. त्यामुळे विविध क्षेत्रात व्हॅल्यू निर्मिती झाली. मॅकेन्सी या संस्थेनं यावर सविस्तर विवेचन केलं आहे.
"उदाहरणार्थ, गुगलमुळे वेळेची फार बचत झाली. ग्रंथालयात एखादी माहिती शोधण्यापेक्षा ती गुगल करणं कितीतरी पट वेगवान आहे. शिवाय ग्रंथालयात जाण्याचा वेळ वाचतो, ते वेगळंच. कुण्या दुकानाचा, प्लंबरचा किंवा इतर कुठल्याही प्रतिष्ठानाचा नंबर हवा तर त्या येलो पेजेसमधून माहिती शोधत बसण्यापेक्षा ती ऑनलाईन शोधणं तिप्पट वेगवान ठरतं. यातून जी उत्पादकता वाढली ती अब्जावधी रुपयांची आहे," असं मॅकेन्सीने म्हटलं आहे.
यामुळे वस्तूंच्या किमतींमध्ये पारदर्शकता सुद्धा आली. ग्राहक दुकानात जातो, वस्तूची किंमत पाहतो आणि मोबाईलवर त्या वस्तूची पुन्हा किंमत पडताळतो. हे दुकानदाराच्या तोट्याचं असलं तरी ग्राहकाच्या फायद्याचं आहे.
याच सर्चमुळे ऑनलाईन शॉपिंगचा उदय झाला. ज्यांना नेमकी वस्तू हवी आहे, त्यांना बाजारात जाऊन ती खरेदी करण्यापेक्षा ती ऑनलाइन ऑर्डर करणं जास्त सोईचं ठरू लागलं. विशिष्ट प्रकारची उत्पादनं बाजारात आणणाऱ्यांसाठी यामुळे खात्रीची बाजारपेठ उपलब्ध झाली. ग्राहक आणि व्यावसायिकांसाठी तर ही सुवार्ताच ठरली.

फोटो स्रोत, Google
पण यात एक समस्या आहे, ती म्हणजे सर्चवर सध्या मक्तेदारी गुगलची आहे. जगभरातील 90 टक्के सर्च गूगलमधून होतात. त्यामुळे अनेक व्यवसाय रँकिंगसाठी ऑरगॅनिक सर्चवर अवलंबून असतात, म्हणजे तुम्ही जे शोधाल, त्याच्या सर्वात जवळचा आणि मिळताजुळता रिझल्ड सर्वांत वर येईल आणि साहजिकच लोक त्यावर क्लिक करतील. त्यामुळे अनेकदा तळाशी असलेल्या पेजेसना वर येण्याची संधीच मिळत नाही.
दुसरीकडे गुगलचं अल्गोरिदम सातत्याने बदलत असतं. या अल्गोरिदमची सर्वसाधारण माहिती गुगल देत असलं तरी त्यांची सिस्टिम नेमकी काम कशी करते, हे कधीच सांगितलं जात नाही. सिस्टिमशी कुणी छेडछाड करू नये, यासाठीच ही काळजी घेतली जाते.
जर गुगलला वाटलं की तुम्ही चुकीच्या पद्धती वापरत आहात, तर तुमच्या साईटचं रँकिंग गुगल कमी करतं. यावर जर कुणी तक्रार केली की गुगल स्वतःच एखाद्या साईटसाठी वकील आणि न्यायाधीश बनून शिक्षा अमलात आणणारा असतो.
नियम मोडण्याच्या शंकेवरून अशी शिक्षा केली तर जाते, पण अनेकदा हे नियम नेमके काय आहेत, हेच कुणाला माहीत नसतं.
हो म्हणा किंवा नाही म्हणा, 1990च्या काळात सर्च स्पर्धात्मक व्यवसाय होता. आता त्यावर पूर्ण एकाधिकारशाही आहे.
याचं कारण काय आहे?
सर्चची उपयोगिता वाढवण्याचा उपाय म्हणजे लोक कशावर क्लिक करतात, काय काय सर्च करतात, याचं विश्लेषण करणं होय. पण आजच्या घडीला याबद्दलचा सर्वाधिक डेटा गुगलकडे आहे. त्यामुळे असं वाटतं की येत्या काही पिढ्यांना ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग गुगलच दाखवणार आहे.
हॅप्पी बर्थडे, गुगल!
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








