फोनवर बोलायचा कंटाळा येतो? आता गुगल तुमच्यासाठी तेही करणार - पाहा व्हीडिओ
तुम्हाला एखादी अपॉइंटमेंट बुक करायची आहे, पण तुम्हाला फोन लावायचा कंटाळा येत असेल, किंवा तुम्ही इतके बिझी आहात की त्यासाठी फोन करायलाही तुमच्याकडे वेळ नाही. मग काय कराल? या प्रश्नाचं उत्तर गुगलच्या नवीन तंत्रज्ञानात दडलंय.
Artificial Intelligence (AI) म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून एका व्यक्तीशी स्वतःच संभाषण करणारा 'Google Duplex' हा प्रयोग गुगलने दोन दिवसांपूर्वी जगासमोर आणला.
त्यात हे तंत्रज्ञान तुमच्यावतीने फोनवर संवाद साधून काही महत्त्वाची कामं तातडीने उरकू शकेल. Google I/O या डेव्हल्पर्सच्या वार्षिक परिषदेत या नवीन तंत्रत्रानाची माहिती देण्यात आली.
हा सध्या केवळ एक प्रयोग असून तो फक्त इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, असं गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणून भारतीय भाषांना कदाचित थोडी वाट पाहावी लागू शकते.

फोटो स्रोत, Getty Images/Justin Sullivan
काही महिन्यांपूर्वीच या दोन्ही कंपन्यांनी आपापले व्हॉइस-अॅक्टिव्हेटड स्पीकर्स - अॅमेझॉन इको आणि गुगल होम भारतीय धाटणीचे उच्चार आणि भाषेसह बाजारात आणले आहेत.
टेक तज्ज्ञांच्या मते, हे सॉफ्टवेअर यशस्वी झाल्यास अॅमेझॉनचं अलेक्सा आणि अॅपलचं सिरी या प्रतिस्पर्ध्यांना ते वरचढ ठरू शकतं.
या परिषदेत आधीच रेकॉर्ड केलेली उदाहरणं प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. त्यात एकानं सलूनची वेळ बुक करण्यास, तर दुसऱ्यानं हॉटेलमध्ये टेबल बुक ठेवण्यास सांगितलं, आणि गुगल ड्युप्लेक्सने या दोन्ही आज्ञांचं पालन अगदी माणसांसारख्या आवाजातल्या स्वतःच फोन लावून हे संभाषण केलं.
एका संभाषणात तर गुगल असिस्टंटने विचारलेल्या थेट प्रश्नांमुळे कॉलवर असलेली दुसरी व्यक्ती गोंधळलेली वाटली.

फोटो स्रोत, Justin Sullivan
कम्प्युटरनं काढलेले आवाज हे माणसाच्या आवाजाच्या जवळपास जाणारे वाटले. व्हर्च्युअल मदतीसाठी यापूर्वी वापरलेले आवाज फारच कृत्रिम वाटायचे. या नवीन आवाजात तर "हम्म..." सारखे नैसर्गिक हावभावही टाकण्यात आले आहेत.
या पूर्ण संभाषणात समोरचा आवाज हा मशीनचा आहे, असं कधीही स्पष्ट झालं नाही.
"हे जर सुरळीतपणे मार्गी लागलं तर लोकांचा वेळ वाचेल आणि व्यवसायाचं मूल्यही वाढेल," असं पिचाई म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images/Justin Sullivan
सुरुवातीला हे सॉफ्टवेअर, वेगवेगळ्या व्यवसायांना त्यांच्या वेळांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी वापरलं जाईल. शिवाय, गुगल सर्चमधल्या त्या व्यवसायाशी निगडित वेबपेजवर ती माहिती अपडेट करण्यात येईल.
"यावर विश्वास ठेवणं कठीण आहे," असं डेमोक्रॅटिक क्रिएटिव्ह स्ट्रॅटजीजच्या विश्लेषक बेन बाजारान यांनी या कार्यक्रमानंतर म्हटलं. "गुगल असिस्टंटचं महत्त्व कोणीही कमी लेखू शकत नाही."
"अॅपललाही या स्पर्धेत यावंच लागेल, कारण हे असं सॉफ्टवेअर आहे की त्यासाठी लोक तंत्रवाटा बदलण्यासही कमी करणार नाहीत."
लोकांचा या सॉफ्टवेअरवर विश्वास बसावा लागेल, तरच त्याचा वापर वाढेल, असं इतर तज्ज्ञांचं मत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









