सिंगापूरमध्ये धावणार चालकविरहित बस

फोटो स्रोत, NTU SINGAPORE
सिंगापूरमध्ये 2022मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी चालकविरहित बस चालवण्याची योजना आहे. चालकविरहित वाहनाचे प्रयोग जगभरात सुरू आहेत.
आपल्याकडेही दिल्ली मेट्रोच्या जनकपुरी पश्चिम ते बॉटनिकल गार्डन या मजेंटा लाइनवर चालकविरहित मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंगापूर सरकारनं सिंगापूर शहर आणि लगतच्या तीन उपनगरात प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्याचं ठरवलं आहे.
तुलनेनं कमी गर्दीच्या रस्त्यांची त्यासाठी निवड केली आहे.
या बसेसचा वापर फिडर सेवेसारखा करता येईल. प्रवासी त्यातून जवळच्या बस किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊ शकतील.
"जागेची टंचाई असलेल्या सिंगापूरमध्ये या चालकविरहित बसेसचा फायदा होईल. तसंच, मनुष्यबळाच्या समस्येवरही उपाय मिळेल," असं सिंगापूरचे वाहतूक मंत्री खाव बून वान यांनी सांगितलं.
या स्वयंचलित बसेसमुळे सध्याच्या बसताफ्यात भर पडेल.
सुरुवातीच्या काळात कमी गर्दीच्या वेळेत ही सेवा दिली जाणार आहे.
टोल आणि सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे सिंगापूरमध्ये इतर दक्षिण आशियाई शहरांच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असते.
चालकविरहित तंत्रज्ञानात आघाडी घेण्याचा सिंगापूरचा मानस आहे.

फोटो स्रोत, NUTONOM
सिंगापूरमध्ये चालकविरहित वाहनांची चाचणी घेण्यासाठी नवीन केंद्र सुरू करण्यात आलं आहे.
त्या केंद्रात गाड्या, बस यांना पादचाऱ्यांची काळजी घेण्याचं, मुसळधार पावसात, बेदरकार चालक, दुचाकी आणि रस्त्यावरील इतर गोष्टींचा अंदाज घेत वाहन चालवण्याच्या क्षमतेची चाचणी करता येईल.
सिंगापूरमध्ये सध्या 10 कंपन्या चालकविरहित वाहनाची चाचणी घेत असल्याची माहिती खाव यांनी दिली.
हेही वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








