घरात बोलायला कुणी नाही? मग आता या गॅजेट्सशीच बोला!

अॅमझॉन अॅलेक्सा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अॅमझॉन अॅलेक्सावर काम करणारा Echo
    • Author, तृषार बारोट
    • Role, बीबीसी न्यूज, भारतीय भाषा सेवांचे डिजिटल एडिटर

कल्पना करा... तुम्ही सकाळी उठता आणि पहिली हाक मारता, "छोटू, टीव्हीवर बातम्या लाव." आणि त्यानंतर लगेच "आणि छोटू, प्लीज माझी कॉफीसुद्धा बनवून ठेव ना," असा आदेश धाडता. मग बिछान्यातून बाहेर पडल्यावर ब्रश करताना छोटूला आणखी एक प्रश्न विचारता, "छोटू, बाहेर सध्या किती ट्रॅफिक आहे, सांगतोस का? माझी 10 वाजताची एक मीटिंग आहे, त्यासाठी मी कधी निघू?"

असा कोणता "छोटू" आहे जो या सगळ्या गोष्टी एकट्याने हाताळेल? कदाचित सापडणार नाही. पण जर हाच छोटू जर एक माणूस नसून एक अद्ययावत उपकरण असेल तर? जर छोटू तुमच्या एका आवाजाने घरातल्या सर्व यंत्रांना कामाला लावू शकणारा एक साथीदार असेल तर? एकदम मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी शोभेल!

पण छोटूची ही किमया कोणत्याच Sci-Fi सिनेमात नाही तर प्रत्यक्षात लाखो लोक जगभर आज अनुभवत आहेत आणि आज ती उपकरणं तुमच्या घरीसुद्धा येण्यास सज्ज झाली आहे.

हे 'डिजिटल व्हॉइस असिस्टंट' सातत्याने US आणि UKच्या अनेक घरांचा भाग बनत आहेत. अॅमेझॉनने सर्वप्रथम असे दोन स्मार्ट स्पीकर्स भारतीय बाजारात आणले - एक Echo आणि दुसरा Dot. या दोन्ही यंत्रांमध्ये Alexa (अॅलेक्सा) नावाचं एक अचाट तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे एक व्हर्च्युअल स्त्री तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देते.

जर तुम्ही अॅलेक्साला विचारलं की आजचं हवामान कसं आहे, तर ती सांगेल "पाऊस येण्याची शक्यता आहे. छत्री सोबत ठेवा."

तिला विचारा की पुरणपोळी कशी बनवतात, तर ती एखाद्या काकूंची हिट रेसिपी तुम्हाला सांगेल. तुम्ही विचारा की आज बीबीसी मराठीवर पाच मोठ्या बातम्या कोणत्या, आणि अॅलेक्सा तुम्हाला एक-एक करून सगळ्या मोठ्या हेडलाईन्स वाचून दाखवेल.

गेल्या वर्षी अॅमेझॉनने या अॅलेक्साला भारतात आणलं, आणि मंगळवारी तिचा गुगल होम (Google Home) हा प्रतिस्पर्धी भारतात आला.

नुकतंच Accenture कंपनीने अॅलेक्सा आणि गुगल होमसारख्या डिजिटल व्हॉईस असिस्टंट उपकरणांचं एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाअंती ही उपकरणं विकत घेण्यासाठी अमेरिका, ब्राझील आणि चीनच्या लोकांपेक्षा भारतीय जास्त उत्सुक आहे, असं लक्षात आलं.

कसे असतात डिजिटल वॉइस असिस्टंट?

अॅमेझॉन अॅलेक्सा आणि गुगल होम ही दोन्ही उपकरणं कुठल्याही साध्या वायरलेस स्पीकरसारखे दिसतात. तुमच्या घरच्या WiFi बरोबर जोडल्यास हे उपकरण मग तुमच्या आवाजाची ओळख करवून घेण्यासाठी थोडा वेळ घेतं. तुमच्या आवाजातून काही बेसिक कमांड ते आत्मसात करतात आणि मग हळूहळू तुमचा आवाजही ओळखू लागतात.

काही मिनी अॅप्सच्या मदतीनं आपण या डिव्हाईसवर आपल्या आवडीनिवडी सेट करू शकतो. त्यातून हा अनुभव आणखी आनंददायी होतो. या 'मिनी अॅप्स'ला अॅमेझॉन Skills म्हणतं तर गुगल Actions म्हणतं. तुमचं आवडतं रेडिओ चॅनल असो वा बातम्यांचं विश्वासार्ह स्रोत, किंवा इतर कुठलंही काम, या Skills किंवा Actions द्वारे आपण सगळं सेट करू शकतो आणि मग या डिव्हाईसला हाक मारल्यावर कोणती अॅप कोणती कामं करणार, ते त्याला आपोआप कळतं.

पण यांना भारतीय भाषा समजतात का?

भारतात दर काही मैलांवर भाषा बदलते, असं म्हणतात. तुम्हाला वाटत असेल की माणसांना एकमेकांच्या भाषा कधीकधी कळत नाही तर मग या यंत्रांना काय कळणार?

ग्रामीण भारतात हे उपकरण वरदान ठरेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रामीण भारतात हे उपकरण वरदान ठरेल

खरंय. कारण अॅमेझॉन आणि गुगल दोघांनीही आपली उपकरणं इंग्रजी भाषा समोर ठेवून बनवली आहेत. मग भारतीयांचं इंग्रजी समजणं या डिव्हाईसेसमोर एक मोठं आव्हानच होतं.

गेल्या ऑक्टोबरमध्ये अॅमेझॉनने अॅलेक्सा भारतात आणलं, त्यानंतर कंपनीने 'Indian English' समजण्यासाठी आपलं सॉफ्टवेअर अपडेट केलं. पण गुगलचं डिव्हाईस या आव्हानाला तोंड देण्यास कदाचित थोडं अधिक तयार असेल, कारण त्यांचं सध्याचं तंत्रज्ञान आधीच त्या दृष्टीने उपलब्ध आहे. पण गुगल होम कितपत सुरळीतपणे काम करेल, ते येणारा काळच सांगेल.

पण एक नक्की - भारतीय बाजारात वाढण्याची भरपूर क्षमता आहे, याची दोन्ही कंपन्यांना कल्पना आहे. म्हणूनच भारतीय भाषांमध्ये आपली उपकरणं अधिक चांगल्या पद्धतीने काम करावीत यावर ते भर देत आहेत.

भविष्य काय?

सध्या जरी हे तंत्रज्ञान केवळ स्मार्ट स्पीकरभोवती केंद्रित असलं तरी, पुढे तुम्ही कदाचित या तंत्रज्ञानाचा वापर करून घरातली इतर उपकरणंही नियंत्रित करू शकाल. जसं एका हाकेवर टीव्ही, रेडिओ, घरातले लाईट, दाराची कुलपं, एसी, कुकर आणि अगदी तुमचा फ्रीजसुद्धा बंद किंवा चालू करू शकाल.

तुमच्यापैकी काही जण आताच कदाचित हे तंत्रज्ञान आपल्या फोनमधल्या गुगल असिस्टंट किंवा आयफोन सिरीद्वारे वापरत असालही. पण आता या स्पीकर्समुळे आणखी नवे पर्याय खुले झाले आहेत.

अॅमझॉन अॅलेक्सावर काम करणारा Echo

फोटो स्रोत, Amazon

फोटो कॅप्शन, अॅमझॉन अॅलेक्सावर काम करणारा Echo तुम्हाला किचनमध्ये बातम्या आणि रेसिपी ऐकवू शकतं.

आणि जरी ही उपकरणं धनाढ्यांची घरं आणखी अद्ययावत करतील, पण अशीही आशा आहे की या तंत्रज्ञानामुळे अनेक गरीब आणि निरक्षर लोकांचा डिजिटल जगात प्रवेश सुकर होईल.

उदाहरणार्थ, जर एका गरीब ग्रामीण शेतकऱ्याने त्याचा पहिला व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड फोन विकत घेतला, तर त्याला आधी फोन आणि नंतर पूर्ण इंटरनेट शिकण्याची गरज नाही. त्याला फक्त आपला फोन सुरू करण्याची गरज आहे, मग तो फोनच त्याच्याशी बोलून त्याला टप्प्या-टप्प्याने सगळं शिकवेल.

पण हे कितपत सुरक्षित?

भारतात अशा उपकरणांबद्दल खूप कुतूहल आणि उत्सुकता असली तरी ज्या देशांमध्ये ही उपकरणं सध्या उपयोगात आहेत, तिथल्या लोकांनी याबद्दल काही शंका व्यक्त केल्या आहेत.

खरंतर या उपकरणांना 'भिंतींचेही कान असतात', या म्हणीचं प्रत्यक्ष रूप म्हणता येईल, कारण ती सदासर्वकाळ त्यांच्या आसपासचं सगळं ऐकत असतात. मग कोणी तुमच्याबद्दल काही बोललं असेल वा तुम्ही कुणाबद्दल काही बोललं असाल, या डिव्हाईसच्या मेमरीत काय काय जमा होतंय, कुणास ठाऊक!

एका स्पीकरवरून अख्खं जग चालवणार का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका स्पीकरवरून अख्खं जग चालवणार का?

आणि या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या माहितीचा काही दुरुपयोग तर नाही करणार ना? जर कोणत्या सरकार किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला तुमची खासगी माहिती लागली तर...?

असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं अजूनही या कंपन्यांनांकडेही नाहीत. आणि आता ही उपकरणं भारतात येत आहेत, त्यामुळे माहितीच्या सुरक्षिततेवरून आधीच धास्तावलेल्या सामान्य माणसाच्या चिंता आणखी वाढणार का?

(तृषार बारोट हे बीबीसी न्यूज भारतीय भाषा सेवांचे डिजिटल एडिटर आहेत. त्यांनी 2017 साली हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डिजिटल व्हॉईस डिव्हाईसेसवरच्या एक संशोधन प्रकल्पाचं नेतृत्व केलं आहे.)

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)