#आंबेडकरआणिमी : 'बाबासाहेबांमुळेच मी जातपंचायतीविरुद्ध लढले, आता मीही आंतरधर्मीय लग्न करणार!’
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महापुरुषांचं मोठेपण हे त्यांनी त्यांच्या हयातीत उभारलेल्या कार्यावर अवलंबून असतंच. पण ते काळाच्या कसोटीवर अधिक मोठं ठरतं जेव्हा त्यांच्या प्रेरणेतून भविष्यातल्या पिढ्या समाजाला बदलणारं नवं कार्य उभारतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर या कसोटीवर उत्तुंग ठरतात आणि हे सिद्ध करतात दुर्गा गुडिलुसारखे शिलेदार!
मुंबईच्या जोगेश्वरी भागातल्या संजयनगरच्या दाटीवाटीच्या छोट्या घरांच्या वस्तीत आम्ही 27 वर्षांच्या दुर्गा गुडिलु यांना भेटलो. दुर्गा गुडिलु कोण आहेत? असं विचारल्यावर त्या साधं हसून सांगतात, "दुर्गा गुडिलु एक सामान्य मुलगी आहे. मी असं नाही म्हणत की मी समाजाला चेंज करते. मी फक्त मोकळा श्वास निर्माण करते मला जगण्यासाठी आणि माझी पुढची पिढी जगण्यासाठी."
त्या स्वत:ला सामान्य म्हणतात हे त्यांचं साधेपण, पण सत्य हे आहे की दुर्गा या महाराष्ट्रातल्या जातपंचायतीविरोधातल्या लढ्याच्या चेहरा बनल्या आहेत. त्या वैदू समाजातल्या आहेत. या भटक्या वैदू समाजातल्या बालविवाह आणि जातपंचायत या प्रथा या तरुणीने मोडून काढल्या आहेत. आता त्या शिक्षणापासून शेकडो वर्षं लांब राहिलेल्या या समाजातल्या नव्या पिढीला शिक्षणाकडे आणण्याचं मोठं कार्य उभारत आहेत.
जंगलात जाऊन वनौषधी गोळा करणं आणि गावोगाव फिरून ती औषधं म्हणून विकणं हा या वैदू समाजाचा पारंपारिक व्यवसाय. काळ बदलत गेला, औषधांचं विज्ञान बदललं, पण भटका वैदू समाज शिक्षणापासून लांब राहिल्यानं जुन्याच कामात अडकून राहिला.

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
शिक्षण नसल्याने हा समाज आर्थिक प्रगतीपासूनही वंचित राहिला. भटका असल्याने ज्या ज्या शहरात जागा सापडेल त्या त्या शहरांतल्या गरीब वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, रस्त्यांच्या बाजूला छप्पर शोधत राहिला.
अशा शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीत जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा समाजावर आपला प्रभाव बळकट करतात, जात पंचायती आपला वचक बळकट करतात. आणि जेव्हा दुर्गा सारख्या स्वातंत्र्याची जाणीव झालेल्या व्यक्तीच्या त्या आड येतात, तेव्हा लढा अटळ असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना समान हक्क मिळावेत म्हणून लढा दिला. आज 21व्या शतकात हेच आंबेडकर जगभरातल्या विविध समान हक्क चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. महिलांपासून समलैंगिकांपर्यंत आणि अफ्रिकेपासून युरोपापर्यंत ते हजारो तरुण-तरुणींनाजगण्याची उमेद आणि संघर्षासाठी बळ देत आहेत. अशाच लढवय्यांच्या या कहाण्या सांगणारी बीबीसीची सीरिज #आंबेडकरआणिमी 14 एप्रिलच्या आंबेडकर जन्मदिवसाच्या निमित्ताने...

"जात पंचायत मी जवळून पाहिली माझ्या बहिणीच्या लग्नावेळेस," दुर्गा सांगतात. "माझी बहीण जन्माला पण नव्हती आली तेव्हा तिचं मामाच्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. पंचांच्या समोर आई-वडिलांनी वचन दिलं होतं. ती मोठी झाली. तिला शिकण्याची इच्छा होती. तिनं ग्रॅज्युएशन केलं. माझ्या आई-वडिलांनी तिला चांगलं शिकवलं. ती आज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे."
2011 मध्ये सुरू झालेल्या लढ्याचा हा घटनाक्रम, पण दुर्गा हे सगळं अगदी काल घडल्यासारखं सांगतात.
बालविवाहाची प्रथा वैदू समाजात अजूनही काही ठिकाणी टिकून आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मूल जन्माला यायच्या आधीच त्याचं आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकायचं, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घ्यायच्या.
दुर्गाची मोठी बहीण गोविंदीसोबतही हेच झालं होतं. पण इंजिनिअर झालेल्या गोविंदीला आता हे ते लग्न पटणं शक्यच नव्हतं.

फोटो स्रोत, Durga Gudilu
"त्यामुळे ती म्हणाली की तिला त्या मुलाशी लग्न करायचं नाही. तो मुलगा सातवी नापास होता. तो काम पण काही करत नव्हता. तिने रडत रडत मला सांगितलं की, 'दुर्गा नाही करायचं मला हे लग्न.' मी म्हणाले की, ही इतकी शिकली आहे तर हिला आपण सपोर्ट करायला पाहिजे. काय होईल ते होऊ द्या. ते तरी जातील किंवा आपण तरी मरू," त्यांनी ठामपणे ठरवलं.
स्वत:च्या मोठ्या बहिणीपेक्षा दुर्गा यांचं स्वत:चं शिक्षण खूप कमी होतं, पण त्यांचं धैर्य खूप जास्त होतं. त्या धैर्यानेच गुडिलु कुटुंबीयांनी प्रथेप्रमाणे जुनी शपथ पाळायला नकार दिला.
"मग जातपंचायत भरवली गेली आणि ते म्हणाले की तुम्ही 3 लाखांचा दंड भरा आणि जर नाही भरला तर तुमचं घर आम्ही विकू. मी म्हणाले असं कसं? आम्ही जर चुकीचे असू तर तुम्ही जाऊन तक्रार करा ना," असं दुर्गा सांगतात. "त्यावर ते म्हणाले, 'आता तू बोललीस ना तर तुझे पायच तोडू आम्ही'."
स्वत:च्या कुटुंबाचा हा लढा त्यांनी विशीत स्वत:च्या खांद्यावर पेलला होता. मग धमक्यांचं सत्र सुरू झालं. जातीविरुद्ध, पंचांविरुद्ध जाऊ नका, असं सतत धमकावलं जाऊ लागलं.
दुर्गा यांचा त्याअगोदरच काही संस्थांशी, चळवळींशी संबंध आल्याने काही हितचिंतक त्यांच्या मागे उभे होते. आई-वडिलांचाही धीर खचत होता, पण दुर्गा ठाम उभ्या होत्या.
त्याच दरम्यान एकदा जात पंचायत भरली असताना दुर्गा यांचे एक पत्रकार मित्र सोबत होते. त्यांना तिथे मारहाण झाली. मग प्रकरण पोलिसांत गेलं, त्याची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. दुर्गाचा चाललेला लढा तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला समजला.
"ते जेव्हा धमकी देत होते ना, तेव्हाच पोलिस स्टेशनमध्ये मी ठरवलं होतं आणि मी म्हणाले पण, की मला काहीही होऊ द्या, मी मेली तरी चालेल, पण इकडे दुसरी दुर्गा उभीच राहणार नाही. आणि मी ते करूनही दाखवलं आणि सक्सेस सुद्धा झाले," दुर्गा हसत, एका प्रकारच्या विजयी मुद्रेनं सांगतात.
जवळपास दोन वर्षं एका भीतीसोबत, पण त्याहीपेक्षा जास्त खंबीरपणा दाखवत चालवलेला लढा त्या जिंकत आल्या होत्या.

फोटो स्रोत, Durga Gudilu
"जात पंचायतीचे पंच म्हणाले की आमच्याकडून चूक झाली, आम्ही माफी मागतो आणि आजपासून आम्ही जातपंचायत बरखास्त करतो. तेव्हा त्यांनी जातपंचायत बरखास्त केली," दुर्गा हे अभिमानानं सांगतात. कारण जातपंचायतविरोधी कायदा महाराष्ट्रात येण्याअगोदर वैदू समाजानं ती पंचायत रद्द करण्याचं ठरवलं आणि ते दुर्गा यांच्या लढ्याला आलेलं यश होतं.
अखेरीस दुर्गाच्या बहिणीचा जन्माअगोदरच प्रथेप्रमाणे ठरलेला विवाह रद्द करण्यात आला. नुकताच 29 मार्च 2018 ला तिचा आंतरजातीय प्रेमविवाह संपन्न झाला. दुर्गाच्या मते हा वैदू समाजातला पहिला आंतरजातीय विवाह होता.
आता समाजही त्यांच्यामागे उभा राहिला. जे एकेकाळी दुर्गाच्या विरोधात होते, तेही आता आनंदानं या सोहळ्यात सहभागी झाले. पण दुर्गा गुडिलुंचं कार्य या स्वत:च्या बहिणीसाठी दिलेल्या लढ्यापाशी संपलं नाही, तर तिथं ते सुरू झालं.

फोटो स्रोत, SHARAD BADHE
त्यांना एक दिसलं की जर समाजातल्या ज्येष्ठांना समजावलं तर त्यांना नव्या आधुनिक युगाबद्दल काही समजणार नाही, पण तरुणांना नक्की समजेल आणि त्यासाठी मार्ग एकच आहे. तो म्हणजे शिक्षण.
"जी नवी जनरेशन येते आहे, त्यांना जर आपण शिक्षण दिलं तर ते बदलतील हे निश्चितच. त्यामुळे मी सध्या या मुलांच्या शिक्षणावर काम करते आहे. माझी 'अनुम फाऊंडेशन' नावाची संस्था आहे. त्या संस्थेमार्फत 412 शाळाबाह्य मुलांना मी शिकवते," असं दुर्गा सांगतात.
या संस्थेमार्फत अनेक जण शिक्षणासाठी वैदू समाजातल्या मुलांना दत्तक घेतात आणि शिक्षण सुरू राहतं. शिवाय या समाजातल्या महिलांसाठीही दुर्गा एक बचत गट चालवतात आणि त्यामार्फत अनेक हॉस्टेल्स आणि हॉटेल्सला रोज पोळ्या पुरवण्याचं काम करतात.
त्या राज्यभर फिरतात आणि ज्या ज्या भागात वैदू समाजातले लोक आहेत तिथपर्यंत हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दुर्गा गुडिलुंचं संस्थात्मक कार्य आता आकार घेऊ लागलं आहे.
पण हा सगळा संघर्ष करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा त्यांना कोण देतं?

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
दुर्गा यांचं उत्तर आहे की त्यांची प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.
"ज्यांना बाबासाहेबांची इन्स्पिरेशन घ्यायची आहे त्यांनी स्वत:च्या घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे. माझ्या घरातूनच आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली आणि मी पण आंतरधर्मीय लग्न करणार आहे," आपल्या घरातली राज्यघटना दाखवत त्या म्हणतात.
बाबासाहेब नसते तर मला त्यांच्यानंतर इतक्या वर्षांनी हा लढा लढण्याचं बळ मिळालं नसतं, असं त्या म्हणतात.
"बाबासाहेबांनी तर पूर्ण जगाला शिकवण दिली आहे. मी पूर्ण जगाला नाही देऊ शकत, पण मी माझ्या वैदू समाजाला जरी बाबासाहेब आणि घटना समजवली, तरी बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असं मला वाटेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









