सलमान खान केस : साक्षीदार नं -2 ने त्या रात्री नेमकं काय पाहिलं?

सागरराम बिश्नोई
फोटो कॅप्शन, सागरराम बिश्नोई
    • Author, नितिन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, जोधपूरहून

काळवीट शिकार प्रकरणात मुख्य सरकारी साक्षीदारानं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या रात्री नेमकं काय पाहिलं हे सांगताना अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

सागरराम बिष्णोई हे त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी दोन मृत काळवीटं पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती. सागरराम याआधी कधीही माध्यमांसमोर कधीही आलेले नाहीत.

बीबीसी हिंदीचे श्रोता असलेले सागरराम यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं की, सलमान खान, सैफ अली, नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांना घटनास्थळावर पहिल्यांदा घेऊन जाणाऱ्यांपैकीच ते एक होते.

1998मध्ये तत्कालीन वनरक्षक असलेले सागरराम बिष्णोई हे 28 मार्च 2018ला राजस्थान वन्यखात्यातून असिस्टंट सब-इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. सरकारी नोकरीत असल्याने त्यांनी आतापर्यंत माध्यमांसमोर येणं टाळलं.

काळवीट शिकार प्रकरणात एकूण पाच सरकारी साक्षीदार असून सागरराम बिष्णोई हे साक्षीदार क्रमांक 2 आहेत.

त्यांच्या मते, तीन प्रत्यक्षदर्शींनी सलमान खान आणि त्यांच्या सहकारी कलाकारांना काळविटांची शिकार करताना प्रत्यक्ष बघितलं होतं. 2 ऑक्टोबर 1998ला ते वन्यजीव चौकीचे सहाय्यक वनपाल भंवरलाल बिष्णोई यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले होते.

सागरराम बिश्नोई

तेव्हा वनरक्षक किंवा फॉरेस्ट गार्ड असणारे सागरराम बिष्णोई हे घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी मृत काळविटांना वाहनात घालून कार्यालयात आणलं.

काळविटांचं पोस्ट मॉर्टम करावं लागेल हे लक्षात येताच ते डॉक्टर नेपालिया यांच्याकडे मृत काळविटं पाठवण्यात आली.

सागरराम बिष्णोई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला आजही स्पष्ट आठवतं... त्यादिवशी फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या डॉक्टर नोपालिया यांची सुट्टी होती. आमच्या खात्यातील पोस्टमॉर्टम करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीनं त्यांनी काळविटांची तपासणी केली आणि सांगितलं की, एक-दोन दिवसांत रिपोर्ट पाठवून देईल. पण अनेक दिवस हा रिपोर्ट आलाच नाही आणि जेव्हा आला तेव्हा त्यात निधनाचं कारण हे नैसर्गिक असल्याचं सांगितलं होतं. जास्त खाल्ल्यानं हे मृत्यू झाल्याचं रिपोर्ट सांगत होता. हे आम्हाला काही पटलं नाही."

सागरराम बिश्नोई

ज्या ट्रायल कोर्टानं नुकतंच सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवंल, त्यांनी आपल्या आदेशात डॉक्टर नेपालिया यांच्या तपासणीनंतर पुन्हा नव्यानं फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. राजस्थान वन विभागानं डॉक्टर नेपालिया यांना चुकीचा अहवाल दिला म्हणून त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला गेला.

सागरराम बिश्नोई म्हणतात, "स्पष्ट होतं की, काळविटांचा मृत्यू हा गोळ्या लागल्यामुळेच झाला."

त्यांनी माहिती दिली की, "ऑक्टोबर 1998मध्ये दुसऱ्यांदा फॉरेंसिक चाचणी करण्यात आली आणि त्या रिपोर्टमध्ये काळविटांचा मृत्यू हा गोळ्या लागल्यामुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा या कलाकारांना अटक करण्यात आली होती."

लक्षात घेण्यासारखं आहे की, न्यायालयाच्या आदेशात सलमान खानने काळविटांची बंदुकीनं शिकार केल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.

सलमान खान

फोटो स्रोत, Getty Images

सागरराम बिश्नोई पुढे म्हणाले, "आम्ही या पाचही लोकांना घटास्थळावर घेऊन गेलो होतो आणि त्या रात्री सलमान, सैफ, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना गुडामध्ये आमच्या वन विभागाच्या चौकीत ठेवण्यात आलं होतं. मी तिथेच होतो. पण आतमध्ये फक्त जिल्ह्याचे मोठे अधिकारीच उपस्थित होते. गुडा वन विभागांतर्गत जवळपास 32 गावं येतात आणि त्यात कांकाणी या गावाचाही समावेश आहे. इथंच काळविटांची शिकार करण्यात आली होती."

मी सागरराम बिष्णोई यांना विचारलं, "सलमान आणि इतरांविरोधात गेल्या 20 वर्षांपासून बिष्णोई समाजच केस लढवत आहे. आपणही 'साक्षीदार क्रमांक 2' म्हणजे सरकारी साक्षीदार आहात आणि तुम्ही स्वतःसुद्धा बिष्णोई आहात. त्यामुळे काही फरक पडला का?"

सलमान खान

फोटो स्रोत, Getty Images

सागरराम यांनी हसत हसतच याचं उत्तर दिलं. "अरे, या प्रश्नाचं उत्तर तर मी न्यायालयातपण दिलं आहे. सुनावणीदरम्यान सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनीसुद्धा याचा उल्लेख केला होता की, सरकारी साक्षीदारांमध्ये सर्वाधिक साक्षीदार तर बिष्णोईच आहेत. मी त्यावेळी उत्तर दिलं होतं - बिष्णोईंच्या परिसरात वन संरक्षण आणि वनखात्यातल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये बिष्णोई सापडणार नाही तर कोण सापडणार?"

सागरराम बिष्णोई निघताना आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहून म्हणाले, "त्या काळात माझी ड्यूटी वन्यजीव फ्लाइंग स्क्वॉडमध्ये असायची. अनेक ठिकाणी भेटी देऊन मी लोकांशी चर्चा केली. यात कुणाचंही दुमत नाही की या लोकांनी पाठलाग करून शिकार केली होती."

राजस्थानमध्ये बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानविरोधात प्राण्यांच्या हत्यासंदर्भातील चार प्रकरण दाखल आहेत. ज्यातील तीन प्रकरणांमध्ये त्याची सुटका करण्यात आली आहे.

ट्रायल कोर्टामार्फत पाच वर्षांची शिक्षा मिळाल्यानंतर सलमानला दोन दिवस जेलमध्ये रहावं लागलं आणि त्यानंतर सेशन कोर्टामधून सलमानला जामीन मिळाला.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू व्हायची आहे.

सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांना न्यायालयाने काळविट शिकार प्रकरणात दोषमुक्त ठरवलं आहे.

(या बातमीत व्यक्त झालेली मतं ही या केसमधली साक्षीदार सागरराम बिष्णोई यांची आहेत आणि बीबीसीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत ही व्यक्त केलेली आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)