You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमार- आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी केली पार्टी
म्यानमारमध्ये लष्करी उठावाविरोधात सामान्य जनतेकडून मोठं आंदोलन सुरू आहे. आत्तपर्यंत 100 पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालाय. जगभरातील 12 देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी याचा निषेध केला आहे.
म्यानमारमध्ये शनिवारी 'आर्म फोर्सेस डे' च्या दिवशी लष्कराने जारी केलेल्या सूचनेनंतरही आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. प्रदर्शनादरम्यान गोळीबार झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, लष्कराचे प्रमुख मिन आंग लाइंग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी रात्री जंगी पार्टी केली.
रविवारी सकाळी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार होत असताना लष्कराने त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी म्यानमारच्या लष्कराने दिलेली सूचना डावलून लोकांनी रस्त्यावर आंदोलन केलं.
म्यानमारमध्ये लष्करी उठावाविरोधात 1 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 400 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका?
जगभरातील 12 देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी म्यानमारमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा निषेध केला. इंग्लंड आणि इतर देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी या विरोधात एक संयुक्त निवेदन जारी केलं.
अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने या संयुक्त निवेदनावर सही केलीये. या निवेदनानुसार, "कोणत्याही देशाच्या लष्कराकडून आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलं जातं. त्यांची जबाबदारी आपल्या देशातील लोकांना नुकसान पोहोचवण्याची नाही, तर जीव वाचवण्याची आहे."
यूके सरकारने म्यानमारमध्ये राहात असलेल्या सर्व (युके) नागरिकांना लवकरात लवकर म्यानमारसोडून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सचिव एंटोनियो गुटरेज यांनी, "म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तीव्र दुख: झाले आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सैन्याने शनिवारी 40 पेक्षा जास्त ठिकाणी गोळीबार केला. यंगूनच्या कमर्शिअल सेंटरमध्ये एक डझनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. उत्तर आणि दक्षिणेच्या अनेक शहरातही हिंसाचारात लोकांचा बळी गेला.
अमेरिकेने या हिंसाचाराचा निषध केलाय. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट एन्टोनी ब्लिनकीन यांनी लष्कराकडून, "काही लोकांची सेवा करण्यासाठी सामान्यांचा बळी दिला जातोय," असा आरोप केला.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या घटनेला "अत्यंत खालच्या पातळीवरील" असं म्हटलं आहे.
चीन आणि रशियाकडून या संयुक्त निवेदनावर सही करण्यात आलेली नाही. याचा अर्थ, संयुक्त राष्ट्र परिषदेच्या माध्यमातून कारवाई खूप कठीण मानली जात आहे.
संयुक्त राष्ट्र महासंघाचे विशेष दूत टॉम एन्ड्रूज यांनी या घटनेसंदर्भात एक आपात्कालीन संमेलन बोलावण्याची मागणी केली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी पार्टी का केली?
'आर्म फोर्सेस डे' साजरा करण्यासाठी शनिवारी पार्टी करण्यात आली.
स्टेट टीव्हीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात लष्कराचे प्रमुख आणि इतर अधिकारी युनिफॉर्मध्ये रेड कार्पेटवर चालताना आणि हसताना दिसून आले.
या पार्टीवर सोशल मीडियातून मोठी टीका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते माउंग झार्नी यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.
म्यानमारमधील सद्यस्थिती?
शनिवारी प्रदर्शनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार रविवारी कुटुंबीयांकडून करण्यात आले.
क्याव विन माउंग आणि आये को यांचा लष्कराच्या गोळीबारात मृत्यू झालाय.
AFP न्यूज एजन्सीशी बोलताना आये को च्या आसपास राहाणारे सांगातात, "आये को ला गोळी मारण्यात आली. त्यानंतर त्याला आगीत फेकून देण्यात आलं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)