म्यानमारमध्ये निषेध नोंदवण्यासाठी 'अशुद्ध' कपड्याचा वापर का करत आहेत?

म्यानमारमधील महिला लष्करी राजवटीचा विरोध करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत.

त्या आपल्या कपड्यांशी संबंधित अंधश्रद्धेचा वापर निषेध आंदोलनादरम्यान करत आहेत. याला 'सारोंग क्रांती' म्हणून संबोधण्यात येत आहे.

सारोंगचा वापर

म्यानमारमध्ये जर कुणी पुरुष एखाद्या महिलेच्या 'सारोंग'खालून गेल्यास तो आपला पुरुषार्थ गमावतो, अशी एक अंधश्रद्धा आहे. पण म्यानमारमध्ये व्यापक स्वरुपात ही गोष्ट अनेक जण मानतात.

म्यानमारमध्ये पुरुषांच्या लैंगिक शक्तीला 'हपोन' असं संबोधलं जातं. तर दक्षिण-पूर्व आशियातील महिला कंबरेवर वापरत असलेल्या एका वस्त्राला सारोंग असं संबोधण्यात येतं.

पोलीस कर्मचारी आणि लष्करी जवान येथील रहिवासी भागात घुसण्याचा आणि लोकांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना यापासून रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये महिलांनी आपले सारोंग रस्त्या-रस्त्यांवर लटकवून ठेवले आहेत. काही ठिकाणी याचा परिणामही पाहायला मिळाला.

सोशल मीडियावर येथील काही व्हीडिओसुद्धा व्हायरल झाले होते. यामध्ये पोलीस कर्मचारी गल्लीत घुसण्याआधी हे कपडे तारेवरून खाली उतरवताना दिसतात.

आंदोलक म्यानमारमधील लष्करी राजवटीचा विरोध करत आहेत. देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या सरकारमधील नेत्यांना तत्काळ मुक्त करावं, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

म्यानमारच्या पंतप्रधान आंग सान सू ची यासुद्धा सध्या अटकेत आहेत. त्यांना एक फेब्रुवारी रोजी लष्कराने सत्तेतून हटवलं होतं.

निवडणुकीत विश्वासघात केल्याच्या उत्तरादाखल ही कारवाई करण्यात आल्याचं लष्कराने म्हटलं. यानंतर लष्करप्रमुखांना सत्ता सोपवण्यात आली होती.

देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित करण्यात आल्याचं लष्कराने म्हटलं आहे.

लैंगिक शक्तीवर परिणामाबाबत अंधश्रद्धा

म्यानमारच्या महिलांच्या मते, त्यांनी सारोंग क्रांती करण्यासाठी परंपरागत मान्यतांचा वापर केला.

हुतून लिन नामक एका विद्यार्थ्याने म्हटलं, "एखाद्या महिलेचं सारोंग हे अशुद्ध कापड असतं. हे जर माझ्यावर ठेवण्यात आलं तर माझी लैंगिक शक्ती कमी होईल, असं मानलं जातं. मी ही अंधश्रद्धा पाळतच लहानाचा मोठा झालो आहे."

म्यानमारच्या लेखिका मिमी आय सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्या सांगतात, "आंदोलक महिला आपल्या हितासाठी या लैंगिक अंधश्रद्धेचा वापर करत आहेत."

त्या म्हणाल्या, "अंधश्रद्धेचं मूळ स्वरुप असं नव्हतं. एखादा पुरुष सारोंगमुळे आपली लैंगिक शक्ती गमावेल, असं आधी कधीच म्हटलं नव्हतं. हे कापड अशुद्ध मानलं गेलं कारण पूर्वी महिलांना फक्त उपभोगासाठी किंवा प्रलोभन म्हणून पाहिलं जात असे. ही महिला कोणत्याही कमजोर पुरुषाला उद्ध्वस्त करू शकते, अशा अर्थाने ते म्हटलं जात होतं.

परंपरेनुसार सारोंगचा उपयोग करणं सौभाग्याचं प्रतीक म्हणून संबोधण्यात येतं, असंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या मते, "पूर्वीच्या काळी, युद्धात लढाई करण्यासाठी जात असेलेले पुरुष आपल्या आईच्या सारोंगचा एक तुकडा आपल्यासोबत घेऊन जात असत. 1988 मध्ये झालेल्या बंडादरम्यान आंदोलकांनी आपल्या आईचं सारोंग बंडाना म्हणून वापरलं होतं." (बंडाना म्हणजे डोक्यावर बांधलं जाणारं वस्त्र)

आता म्यानमारच्या महिला आंदोलक सार्वजनिक ठिकाणी सारोंगच्या शक्तीचा वापर करत आहेत.

8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर महिला आंदोलकांनी आपले सारोंग ठिकठिकाणी रस्त्यांवर लटकवले होते. हे आंदोलनाचा एक भाग असल्याचं म्हटलं गेलं.

लोकशाही समर्थक कार्यकर्त्या थिनजार शुनली यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

माझा सारोंग मला म्यानमार लष्करापेक्षा जास्त सुरक्षा देतो, असं त्यांनी फोटोसोबत लिहिलं.

काही आंदोलक महिलांनी जनरल मिन आँग हृाइंग यांच्या फोटोंना सॅनिटरी पॅड्स चिकटवले आणि ते रस्त्यावर पसरवून दिले.

म्यानमारचं लष्कर आपल्या प्रमुखाच्या फोटोवर पाय ठेवणार नाही आणि त्यामुळे ते पुढेही येणार नाहीत, असा विचार यामागे होता.

तुन लिन जॉ एक विद्यार्थी आहेत. पण तेसुदधा आपल्या डोक्यावर सारोंग बांधून आंदोलनात सहभागी होत आहेत.

महिलांना सशक्त करण्याची तसंच आंदोलनात सहभागी होणाऱ्या या धाडसी महिलांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ही एक पद्धत आहे, असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लष्कराकडून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. त्यामध्ये कित्येक महिलांचाही समावेश आहे.

जगभरातील कित्येक देशांनी म्यानमारमधील लष्कराकडून होत असलेल्या हिंसक कारवाईचा निषेध नोंदवला. पण म्यानमारच्या लष्कराने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.

तरीही महिला आंदोलकांनी लष्करी राजवटीचा विरोध करणं अजूनही सुरुच ठेवलेलं आहे. त्यासाठी आपल्या कपड्यांनाच त्यांनी शस्त्राच्या स्वरुपात वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांचं ब्रीदवाक्य आहे, "आमचं सारोंग, आमचं बॅनर, आमचा विजय."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)