You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमध्ये ई-मेल्स का वापरले जात नाहीत?
- Author, लू-हाय लियांग
- Role, बीबीसी वर्कलाईफ
मे 2008मध्ये मी चीनच्या येंगशुओ नावाच्या एका लहानशा गावातल्या एका इंग्रजी शाळेत शिकवत होतो.
कोर्स संपल्यावर माझ्या एका विद्यार्थ्याने मला QQ ॲप डाऊनलोड करायला सांगितलं, म्हणजे आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहता आलं असतं. हे ॲप MSN मेसेंजरसारखंच डेस्कटॉपवर चालतं.
मी त्याला मला फेसबुकवर ॲड करायला सांगितलं आणि त्याचा ई-मेल ॲड्रेस मागितला. तोपर्यंत चीनमध्ये फेसबुक ब्लॉक करण्यात आलं नव्हतं.
काही मुलांनी मला त्यांचे ईमेल ॲड्रेस दिले तर खरे पण ते लक्षात ठेवणं कठीण होतं. कारण ते [email protected] असे काहीसे होते.
काही वर्षांनी मी चीनची राजधानी असणाऱ्या बीजिंग शहरात मी एक स्वतंत्र पत्रकार आणि कॉपीरायटर म्हणून काम करू लागलो. पण मी क्वचितच कोणा चिनी नागरिकासोबत ई-मेलवरून संवाद साधायचो.
बहुतेकदा मला स्मार्टफोनवरच चीनचं मेसेजिंग ॲप - वीचॅटवरून कॉपीरायटिंगचं काम यायचं.
काम पूर्ण झाल्यावर मी याच ॲपवरून काम पाठवून द्यायचो आणि त्यावरूनच मला माझे पैसे मिळत.
ही पूर्ण प्रक्रिया तिचा वेग आणि मोबाईलच्या प्रभावी वापरामुळे जादुई वाटायची.
अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये ई-मेललाच प्राधान्य दिलं जातं. विशेषतः कामाच्या बाबतीत.
अमेरिका आणि ब्रिटन दोन्हीकडे ई-मेल लोकप्रिय आहे. अमेरिकेत 90.9 टक्के युजर्स आहेत आणि ब्रिटनमध्ये 86 टक्के.
इतरही अनेक देशांमध्ये ब्राऊजिंग, इंटरनेट बँकिंग, व्हिडिओ पाहणं किंवा सोशल मीडियाच्या वापरापेक्षा ईमेलचा वापर जास्त केला जातो.
पण चीनमध्ये असं नाही.
जगातल्या इतर युजर्सपेक्षा चिनी युजर्स त्यांचे ई-मेल्स 22 टक्के कमी चेक करत असल्याचं डिलॉईड कंपनीने 2018मध्ये केलेल्या मोबाईल कंझ्युमर सर्व्हेमधून समोर आलं.
जवळपास 79% चिनी स्मार्टफोन युजर्स वीचॅटचा नियमित वापर करतात आणि मेसेजिंग ॲप वापरणाऱ्या युजर्सपैकी 84.5 टक्के वीचॅट वापरतात.
वीचॅट तयार करणारी कंपनी टेनसेंटची रिसर्च टीम पेंग्विन इंटेलिजन्सच्या रिपोर्टनुसार 20 हजार लोकांच्या पाहणीमध्ये आपण रोजच्या कामकाजासाठी वीचॅट वापरत असल्याचं 88 टक्के लोकांनी सांगितलं.
तर 59.5% लोक फोन, SMS आणि फॅक्सचा वापर करतात. या सगळ्यानंतर ई-मेलचा नंबर लागतो. 22.6 टक्के लोकच ई-मेलचा वापर करतात.
ईव्हा सू एक डिजीटल ब्रँडिंग कंपनी चालवतात आणि त्यांनी अमेरिकेत बराच काळ वास्तव्य केलंय. गेली सहा वर्षं त्या शांघायमध्ये आहेत.
आपल्या परदेशी ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आपण ई-मेल आणि लिंक्डइनचा वापर करत असलो, तरी चिनी ग्राहकांबाबत मात्र ही गोष्ट वेगळी असल्याचं त्या सांगतात.
"चिनी ग्राहक वीचॅट वापरतात आणि तिथेच सगळ्या फाईल्स पाठवतात."
सायबर कॅफे
चीनमध्ये एकप्रकारे सर्वव्यापी झालेल्या वीचॅटचे 1 अब्जापेक्षा जास्त युजर्स आहेत.
पण वीफास्टचा असा वापर होण्यामागची कारणं चीनमध्ये अनेक वर्षं आधीच निर्माण झाली होती.
1999मध्ये टेनसेंट या चिनी कंपनीने QQ नावाचं एक प्रॉडक्ट लाँच केलं. डेस्कटॉपसाठीच्या इंस्टंट मेसेजिंग प्रोग्राम - ICQ वर ते आधारित होतं.
त्याकाळात चीनमध्ये दर 100 लोकांपैकी फक्त 1.2 जणांकडेच कॉम्प्युटर होता, असं वर्ल्ड बँकेची माहिती सांगते. पण त्याच काळात अमेरिकेतल्या दर दोघांपैकी एकाकडे कॉम्प्युटर होता.
21वं शतकं जसं पुढे सरकू लागलं तसे चीनमध्ये इंटरनेट कॅफे वाढू लागले आणि तरूण तिथे जाऊ लागले.
या सायबर कॅफेंच्या लोकप्रियतेचं एक कारण QQ ॲपही होतं. कारण यामध्ये मनोरंजनासाठीचे गेम्स, संगीत आणि मायक्रो ब्लॉगिंगची सोयही होती.
ईमेलच्या तुलनेत या ॲपमध्ये संवादाचे अवतार आणि इंस्टंट मेसेजिंगसारखे पर्याय होते.
ड्रायव्हिंग लायसन्ससारखी गरज
QQ किंवा MSN अकाऊंटशिवाय चिनी लोकांचं पान हलत नसे, असं लेखक जेम्स युआन आणि जेसन इंच यांनी त्यांच्या 'सुपरट्रेंड्स ऑफ फ्युचर चायना' या पुस्तकात लिहीलंय.
ते म्हणतात, "पाश्चिमात्य देशांतले लोक लायसन्स नसणाऱ्या माणसाबद्दल जसा विचार करतात, हे तसंच आहे."
कंपन्यांमध्येल ज्येष्ठ अधिकारी त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर त्यांचा QQ नंबर लिहीत आणि अनेक उद्योगांचे स्वतंत्र QQ अकाऊंट असत.
2012 पर्यंत चीनमध्ये QQचे दरमहा 798 दशलक्ष युजर्स झाले होते. तेव्हाच्या चीनच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा हा आकडा मोठा होता.
पण 2011मध्ये टेनसेंटने वीचॅट सुरू केलं आणि पाहता पाहता वीचॅट हा देशातला संवादाचा सर्वात लोकप्रिय मार्ग बनला आणि डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची जागा स्मार्टफोन्सनी घेतली.
ब्रिटनचे मॅथ्यू ब्रेनन 2004 पासून चीनमध्ये डिजिटल इनोव्हेशन कन्सलटंट म्हणून काम करतात. अनेक देशांमध्ये ईमेल ॲड्रेस हा लोकांची एकप्रकारची ओळख असते कारण अनेक ऑनलाईन सर्व्हिसेससाठी रजिस्टर करायला ईमेलची गरज असते.
पण चीनमध्ये हे सगळं काम मोबाईल्स ॲपवर होतं. अली-पे किंवा वीचॅटसारख्या ॲपद्वारे ऑनलाईन देवाणघेवाण होते.
एकाच ॲपद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता, शॉपिंग करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना मेसेज पाठवू शकता.
इन्स्टंट मेसेजिंग
वीचॅट चीनच्या वर्किंग कल्चरमध्ये अगदी योग्य बसत असल्याचं चेऊंग काँग बिझनेस स्कूलचे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक जाँग लिंग म्हणतात.
त्या म्हणतात, "वीचॅटवर काम करायला ईमेलच्या तुलनेत कमी वेळ लागतो. या अनौपचारिक पद्धतीमुळे लोक लगेच उत्तर देतात आणि चीनमधली संस्कृती आणि बिझनेसची पद्धत यामध्ये लगेच उत्तर देण्याला महत्त्वं आहे."
चीनमध्ये लोकांचं व्यावसायिक आयुष्य आणि खासगी आयुष्य यातली सीमारेषा अंधुक असल्याचं जाँग सांगतात.
"परिणामी मालक वा मॅनेजर कामाचे तास उलटून गेल्यानंतरही नवं काम सोपवतात किंवा त्याबद्दल काही प्रश्न विचारतात. त्यासाठी ते दुसरा दिवस उजाडायची वाट पाहत नाही."
एखाद्या कामात पुन्हापुन्हा संवाद साधायची गरज असल्यास त्यावेळी ईमेलपेक्षा वीचॅट पटकन काम करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पण यातला तोटा म्हणजे कोणत्याही वेळी उत्तर देण्याचा दबाव कर्मचाऱ्यांवर येतो.
तातडीने उत्तराची अपेक्षा
एखादा प्लॅटफॉर्म कोणत्या प्रकारे तयार करण्यात आलाय याचा परिणाम आपल्या संवादाच्या पद्धतीवरही होतो. हाच परिणाम फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा वीचॅटवरही दिसून येतो.
तुम्ही त्वरित उत्तर द्याल अशी अपेक्षा इन्स्टंट मेसेजिंगमध्ये केली जाते.
"म्हणूनच मग वीकेंडला जरी तुम्हाला मेसेज आला तरी तुम्हाला उत्तर द्यावं लागतं."
ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या इंग्लिश प्राथमिक भाषा असणाऱ्या देशांमध्ये आजही ईमेल लिहिण्याची जुनीच प्रथा प्रचलित आहे.
'प्रिय...' ने सुरुवात आणि 'धन्यवाद' ने औपचारिक शेवट करण्याची पद्धत अजूनही पाळली जाते.
पण आशिया खंडातल्या अनेक देशांमध्ये इन्स्टंट ॲप आणि अनौपचारिक मेसेजिंगचा वापर आता जास्त केला जातो.
बिझनेस
चीनमध्ये वीचॅटसोबतच मोठ्या कंपन्यांचं काम बिझनेस ॲपद्वारे होतं. उदाहरणार्थ अलीबाबाचं डिंगटॉक आणि बाईटडान्सचं लार्क. सोबतच वीचॅटचं बिझनेस व्हर्जनही आहे. वीचॅट वर्कमध्ये डॉक्युमेंट शेअरिंग आणि ऑनलाईन एडिटिंग फीचर आहे. पे-रोल सर्व्हिस आणि प्रायव्हसीचं प्रमाणही जास्त आहे.
तर डिंगडाँगमध्ये युजर्सना त्यांचा मेसेज वाचण्यात आलाय वा नाही हे पाहता येतं आणि मेसेज पाहिलेला नसल्यास तो वाचण्याची आठवण करणारा एक पुश मेसेजही पाठवता येतो.
पाश्चिमात्य जगातल्या विखुरलेल्या ऑनलाईन सर्व्हिसेस
30 वर्षांच्या हेलन जिआ चीनमधल्या एका क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग कंपनीत पब्लिक रिलेशन्स मॅनेजर आहेत.
2018मध्ये त्या बीजिंगमधून इंग्लंडमध्ये आल्या. इंग्लंडमधल्या ऑनलाईन सेवा विस्कळीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
त्या सांगतात, "तुम्ही ॲमेझॉनवर काही खरेदी करता, दुसऱ्या ॲपवरून खाण्यापिण्याच्या वस्तू घेता, वेबसाईटवरून अपॉइंटमेंट बुक करता आणि या सगळ्यासाठी ईमेल वा फेसबुक गरजेचं असतं. पण चीनमध्ये हे सगळं एका वीचॅट अकाऊंटवरून होतं."
आपला ईमेल वरचेवर तपासण्याची सवय अजून हेलनला झालेली नाही.
"चीनमध्ये असताना मी कधीच ईमेल पहायचे नाही. म्हणूनच लोक ईमेलला उत्तर देतील अशी माझी अपेक्षाच नसते. आणि ईमेलवरून मनोरंजन तर होत नाही."
पण याचा अर्थ चिनी लोक ईमेल अजिबातच वापरत नाहीत, असा नाही.
बहुतेकांकडे ईमेल ॲड्रेस आहे पण अमेरिका वा युरोपातल्या लोकांच्या तुलनेत ते ईमेल्स कमी तपासतात.
ईमेल भूतकाळाचा हिस्सा
मला ज्या विद्यार्थिनीने स्वतःचा ईमेल ॲड्रेस दिला होता, तिच्याशी ईमेलद्वारे मी काही काळ संपर्कात राहिलो. ती आता 30 वर्षांची आहे आणि चीनमधल्या गुआनडाँगमध्ये राहते.
अनेक वर्षांपूर्वी ती मला वीचॅटवर भेटली आणि आता आम्ही तिथेच बोलतो.
आपण ज्या ईमेलद्वारे संवाद साधायचो, तो ईमेल ती अजूनही वापरते का, असं मी विचारलं.
तिने हसत विचारलं, "कोणता? माझ्याकडे खूप ईमेल आयडी होते - 163, 126 आणि MSN"
आता ती क्वचितच कधी स्वतःचा ईमेल तपासते. ईमेल शेवटचा कधी तपासला होता, हे आता तिला आठवतही नाही.
ती सांगते, "मी बहुतेक वीचॅटच वापरते. QQ इतकं वापरत नाही पण कधी कधी तेही वापरते."
तिच्यासारख्या अनेक चिनी नागरिकांसाठी वीचॅट आता त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि ईमेल त्यांच्या भूतकाळाचा हिस्सा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)