You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन : बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणारे झॉन्ग आहेत चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती
बाटलीबंद पाण्याचा उद्योग असणारी व्यक्ती एका देशाची सर्वात श्रीमंत व्यक्ती असू शकते, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण आजच्या घडीला चीनमधली जी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ती हाच व्यवसाय करते. इतकंच नाही तर या उद्योजकाने 'अलिबाबा' या जगातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन खरेदी प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा जॅक मा यांनाही मागे टाकलं आहे.
झॉन्ग शनशान असं या उद्योजकाचं नाव आहे. 1996 साली चीनच्या पूर्व किनाऱ्यावरच्या झेजिआंग प्रांतात त्यांनी 'नॉन्गफू स्प्रिंग' नावाने बाटलीबंद पाण्याची कंपनी सुरू केली होती.
आणि 58.7 अब्ज डॉलर्ससह झॉन्ग शनशान आज ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्समध्ये सर्वांत वरच्या स्थानी आहेत.
बाटलीबंद पाण्याची ही कंपनी नुकतीच स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. शिवाय, लस तयार करणाऱ्या एका कंपनीतले सर्वाधिक शेअर्स खरेदी केल्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
संपत्तीत झालेल्या एवढ्या मोठ्या वाढीनंतर रिलायंस इंडस्ट्रीच्या मुकेश अंबानींनंतर ते आशिया खंडातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. झाँग शनशान यांना 'लोन वुल्फ' या टोपणनावानेही ते ओळखले जातात.
इतकंच नाही जगातल्या पहिल्या 500 श्रीमंतांच्या यादीत झॉन्ग शनशान यांचा 17वा क्रमांक लागतो.
चीनमध्ये सर्वाधिक श्रीमंत लोक तंत्रज्ञान क्षेत्रातून येतात. मात्र, हुवेई, टिकटॉक आणि वुईचॅट या टेक कंपन्यांवरून अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या तणावामुळे चीनच्या टेक स्टॉकचं मूल्य बरंच घसरलं आहे.
आणि म्हणूनच सर्वात श्रीमंत उद्योजक तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राला आता अन्न आणि किराणा क्षेत्रातून स्पर्धा निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यातच झॉन्ग यांची 'बिजिंग वान्ताई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राईज' ही कंपनी चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली. या कंपनीतले सर्वाधिक शेअर्स त्यांच्याकडे असल्याने ऑगस्ट महिन्यात त्यांच्या एकूण संपत्तीत तब्बल 20 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
कोव्हिड-19 आजारावरील लसीवर संशोधन करण्यासाठी आपण दोन विद्यापीठांबरोबर करार केल्याचं या कंपनीचं म्हणणं आहे.
लाल झाकणाची बाटली
या महिन्याच्या सुरुवातीलाच 'नॉन्गफू स्प्रिंग' कंपनी हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली आणि पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 54 टक्क्यांची वाढ झाली.
नॉन्गफू स्प्रिंग कारखान्यात तयार होणाऱ्या लाल झाकण असणाऱ्या पाण्याच्या बाटल्या संपूर्ण चीनमध्ये अगदी लहान-लहान दुकानांपासून ते मोठ-मोठ्या हॉटेल्समध्येही विकल्या जातात. ही कंपनी चहा, फ्लेवर्ड व्हिटॅमिन्स ड्रिंक्स आणि ज्युस यांचंही उत्पादन घेते.
स्टॉक मार्केटमधल्या यशस्वी लिस्टिंगनंतर झॉन्ग अलिबाबाचे जॅक मा, टेंसेन्टचे पॉनी मा यांच्यासोबत चीनच्या पहिल्या तीन श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसलेत.
या आठवड्यात तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स घसरल्याने झॉन्ग यांची वेल्थ रँकिंग आणखी वाढली.
परिणामी गेल्या सहा वर्षांपासून पहिल्या स्थानी असणाऱ्या अलिबाबाला नॉन्गफू स्प्रिंगने मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. झॉन्ग यांनी जॅक मा यांना मागे टाकलं असलं तरी ते फारकाळ पहिल्या स्थानावर राहण्याची शक्यता कमीच आहे.
याचं कारण म्हणजे अलिबाबाचं पाठबळ असणारी 'अँट ग्रुप' ही कंपनी पुढच्या महिन्यात चीन आणि हाँगकाँग शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. त्यानंतर अलिबाबाची संपत्ती आणखी वाढेल.
'अँट ग्रुप' ही एक ऑनलाईन पेमेंट फर्म आहे. कंपनी 250 अब्ज डॉलर्स व्हॅल्युएशनचं उद्दिष्ट पूर्ण करू शकली तर जॅक मा यांना 28 अब्ज डॉलर्सचा निव्वळ नफा मिळणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)