म्यानमार: लष्करी राजवटीमध्ये लहानाचं मोठं होण्याचे काय परिणाम होतात?

    • Author, यवेत टॅन
    • Role, बीबीसी न्यूज

म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाला. मात्र, लष्करी उठावाची ही पहिलीच वेळ नाही. खरंतर या उठावामुळे 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

25 वर्षांच्या एका तरुणीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हे म्हणजे पुन्हा स्क्वेअर वनवर परतल्यासारखं आहे."

लष्करी राजवटीतलं जीणं काय असतं, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

'दहशतीच्या छायेतलं आयुष्य'

वाई वाई नू अवघ्या पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांना तिच्या डोळ्यांदेखत फरफटत नेण्यात आलं.

वाई वाईचे वडील राजकीय कार्यकर्ते होते आणि आँग सांग सू ची यांच्यासोबत ते लोकशाही स्थापनेसाठी काम करत होते.

महिनाभरानंतर त्यांची सुटका झाली खरी. मात्र, त्या दिवशी जे घडलं त्याच्या आठवणी वाई वाईच्या मनात अजूनही ताज्या आहेत.

ती सांगते, "मी त्या भीतीच्या छायेतच लहानाची मोठी झाले. मी लहान असताना मला सारखी भीती वाटायची. बाहेर कायम सैनिकांचा गराडा असायचा आणि माझ्या वडिलांना माझ्यापासून फरफटत दूर नेत असल्याचं ते चित्र आजही मला जसंच्या तसं आठवतं. मला आठवतं, आम्ही कानाला ईअरफोन लावून अगदी बारीक आवाजात रेडियो ऐकायचो."

वाई वाई म्यानमारमध्ये सर्वाधिक पीडित अल्पसंख्याक असलेल्या रोहिंग्या मुस्लिम समाजातून येते. ती सांगते, तिच्या वडिलांचा कायम पाठलाग केला जायचा.

ती 10 वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने राजधानी यांगोनला (त्यावेळचं रंगून) स्थायिक व्हायचं ठरवलं.

याविषयी बोलताना ती सांगते, "यांगोनमध्ये मला जरा अधिक स्वातंत्र्य असल्याचं जाणवलं. रखाइनमध्ये बहुतांश लोक रोहिंग्या होते. मात्र यांगोनमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे आणि वेगवेगळी भाषा बोलणारे लोक होते. मात्र, वांशिक अल्पसंख्याकांबाबत काय घडतंय, याची यांगोनमधल्या बहुतांश जनतेला जराही कल्पना नव्हती."

त्यावेळी वाई वाईला आयुष्य सामान्य झाल्यासारखं वाटत होतं.

"आम्ही शाळेत जायचो. शाळेतून घरी यायचो. मला आठवत शाळेत लष्करातले वेगवेगळे जनरल यायचे. आम्ही त्यांचं स्वागत करायचो. त्यांचं अभिवादन करायचो. शिक्षण व्यवस्था लष्कराचा उदोउदो करणारी होती."

मात्र, ती 18 वर्षांची असताना पुन्हा एकदा तिच्या वडिलांना लक्ष्य करण्यात आलं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच तुरुंगात डांबण्यात आलं. पुढची सात वर्षं ते सगळे तुरुंगात होते.

वाई वाईला ही तुरुंगात जावं लागलं.

तुरुंगातून सुटल्यावर तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आज वाई वाई मानवाधिकार कार्यकर्ती म्हणून काम करते. रोहिंग्या आणि महिलांना समान हक्क मिळावे, यासाठी ती काम करते.

वाई वाई सांगते, "रखाईनमधलं आयुष्य गरिबीतलं होतं. पण वाईट नव्हतं. लोक आपापला कामधंदा करायचे. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती."

फोनवरच्या संभाषणावरही लष्कराची नजर

फायोचा (नाव बदललं आहे) अनुभव मात्र अगदी वेगळा आहे.

एका सुखवस्तू घरातून असलेल्या फायोचा जन्म यांगोनचा. यांगोनमध्येच ती लहानाची मोठी झाली. फायो सांगते बाहेरच्या जगापासून तिचं आयुष्य कायमच सुरक्षित होतं.

मात्र, तिच्याही लहानपणीच्या काही वेगळ्या आठवणी आहेत.

ती सांगते, "फोनवर बोलताना मागे कुणाचा तरी आवाज यायचा. कुणीतरी टिव्ही बघत असायचं किंवा काही माणसं बोलत आहेत, असा तो आवाज असायचा. पण हा आवाज लष्कराचा असायचा. तुम्ही जे काही बोलत आहात, ते सर्व लष्कर ऐकत असायचं."

"याची भीती वाटायची नाही. कारण तुमचा जन्मच अशा वातावरणात झालेला असताना दुसराही काही पर्याय असतो, याची तुम्हाला कल्पनाही नसते. पण, आमचे आई-वडील आम्हाला फोनवर बोलू नका, म्हणून सांगायचे."

म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशहा थान शूई सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत 1995 साली फायोचा जन्म झाला.

88 साली झालेल्या क्रांतीनंतर लष्करी दडपशाहीने 1995 साली कळस गाठला होता, असं फायो सांगते.

शाळेतला अभ्यासक्रमही फार सिलेक्टिव्ह होता, असं ती सांगते.

ती म्हणाली, "संवेदनशील विषय ते शिकवत नसत. उदाहरणार्थ समजा अमेरिकेत एखाद्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करायला शिकवत असतील तर आमच्याकडे बुद्धांच्या कथा शिकवल्या जायच्या. किंवा मग म्यानमारचे राजे किती थोर होते आणि ब्रिटिशांनी त्यांना कसं लुटलं, हे सगळं शिकवायचे."

ब्रिटिशांनी म्यानमारवर 1824 ते 1948 पर्यंत राज्य केलं होतं.

फायो 12 वर्षांची होईपर्यंत देशातल्या राजकीय घडामोडींविषयी तिला फारशी माहिती मिळत नव्हती.

याविषयी बोलताना फायो सांगते, "मला चांगलं आठवतं म्यानमारमध्ये भगवी क्रांती झाली त्यादिवशी माझा 12 वा वाढदिवस होता. आपण हुकूमशाही व्यवस्थेत आहोत, याची जाणीव मला त्या दिवशी झाली."

म्यानमारमध्ये 2007 साली तथाकथित भगवी क्रांती झाली होता. त्यावेळी लष्करी राजवटीविरोधात हजारो भिक्खू रस्त्यावर उतरले होते.

बौद्ध धर्म मानणाऱ्या म्यानमारमध्ये बौद्ध भिक्खूंना मोठं आदराचं स्थान आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्या अनेक भिक्खूंना लष्कराने तुरुंगात डांबलं आणि सुरक्षा बळांनी तीन भिक्खूंना ठार केल्याचंही सांगितलं जातं.

फायो सांगते, "माझ्या घराबाहेरही बरेच निदर्शक जमले होते. चिंता आणि काळजीचं वातावरण होतं. बघाल तिकडे लष्करी जवान दिसत होते."

फायो सांगते ती मोठी झाली तेव्हा मोबाईल फोन आले. पण ते खूप महाग होते. त्यामुळे ज्यांना परवडेल, त्यांच्याकडेच ते दिसायचे.

"मोबाईल फोन कुणाला विकत घेता येऊ नये, यासाठी त्यांनी मोबाईल फोनच्या किंमती खूप वाढवून ठेवल्या होत्या. त्यावेळी लोकांकडे फक्त लँडलाईन फोन होते. शिवाय, भारनियमनही असायचं. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा बोलता येईलच, असं नाही."

पुढे फायोला परदेशातल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पाश्चिमात्य जग आणि म्यानमार यात किती जमीन-अस्मानाचं अंतर आहे, याची जाणीव तिला तिथे झाली.

ती सांगते, "रस्त्यात एखादा पोलीस दिसला की माझे मित्र म्हणायचे, हे किती भीतीदायक आहे. पण, मला जवानांना बघायची सवय झाली होती. ही माझ्यासाठी सामान्य बाब होती."

ती सांगते 1 फेब्रुवारीला ती सकाळी सहाला उठली आणि मोबाईल बघितला तर फोनवर बरेच मेसेजेस आले होते.

ती म्हणाली, "एका सकाळी तुम्ही उठता आणि तुम्हाला कळतं की एका रात्रीतून तुमचं संपूर्ण सरकारच बदललं आहे."

"लहानपणी मी सकाळी उठले की लोकांना तुरुंगात डांबलं, लोक बेपत्ता झाले, अशाप्रकारच्या बातम्या असायच्या. त्यामुळे आता जे घडलं ते बघून आपण पुन्हा त्याच जागी येऊन उभे ठाकलो आहेत, असं वाटतंय. आम्ही केलेली सर्व कामं, आम्ही दिलेलं कायदेशीर सरकार सर्व एका रात्रीत संपलं आहे."

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी

क्याव थान विन आज 67 वर्षांचे आहेत. त्यांनी लष्करी राजवटीचा दीर्घकाळ बघितला आहे. 1988 साली झालेल्या लष्करी उठावाच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.

म्यानमारच्या मध्यभागी असणाऱ्या मिन बू शहरात ते रहायचे. त्यावेळी बाहेर अनेक ठिकाणी 'गोळीबार आणि हिंसाचार' झाल्याचं ते सांगतात. मात्र, तुलनेने मिन बू शहर शांत होतं.

ते सांगतात बऱ्याच जणांसाठी आयुष्य पुन्हा सामान्य झालं. पण, मत व्यक्त करण्यावर बंदी होती.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही कामावर परतलो. सरकारी नोकरदार ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यापैकी काहींना बडतर्फ करण्यात आलं, काहींची बदली केली, काहींना खालच्या पदावर पाठवण्यात आलं तर काहींना ताब्यात घेण्यात आलं."

"पण, माझ्यासारखे सरकारी कर्मचारी सामान्यपणे कामावर परतले. भीतीपोटी काहीही न बोलता सामान्य आयुष्य जगणं भाग होतं."

क्याव थान विन सांगतात 2015 पर्यंत आयुष्य असंच होतं. 2015 साली म्यानमारमध्ये पहिल्यांदा निष्पक्ष निवडणुका झाल्या. आँग सान सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने दणदणीत विजय मिळवत 50 वर्षांची लष्करी राजवट उलथून लावली.

क्याव थान विन सांगातत, "त्यांच्यासारखी एक व्यक्ती देशाचा कारभार सांभाळणार याचा मला खूप आनंद झाला होता. त्यांनी खूप चांगली कामं केली. मूलभूत सार्वजनिक सुविधा दिल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचं आयुष्यही सुधारलं. आयुष्य खूप चांगलं झालं."

मात्र, हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नाही.

1 फेब्रुवारी रोजी उठाव करून लष्कराने जनतेने दिलेला कौल नाकारला, असं क्याव थान विन यांचं म्हणणं आहे.

म्यानमारच्या एकतेचं आणि अखंडतेचं रक्षण आपणच करू शकतो, असं तातमादोअला (म्यानमारचं लष्कर) वाटतं, असं सिंगापूर इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल अफेअरचे चेअमन प्रा. सायमन टाय यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "एनएलडी पक्षाने सलग दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला. असं असलं तरी आपण सक्रीय राजकारणातून माघार घ्यायला हवी, असं तिथल्या लष्कराला वाटत नाही."

ते पुढे म्हणतात, "म्यानमार पुन्हा एकदा एकाधिकारशाही, आर्थिक निर्बंध आणि दारिद्र्याच्या त्या काळात लोटला जावा, असं लष्करातल्याही काहींची सुप्त इच्छा आहे."

"मात्र, म्यानमारमध्ये परिवर्तन लवकर दिसेल, असं वाटत नाही तोवर लष्कराची मनमानी सुरूच असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)