शेतकरी आंदोलन: दिल्ली पोलिसांनी रणनीती का बदलली?

    • Author, सलमान रवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पोलीस अधिकाऱ्यांना किंवा जवानांना कोणालाही लोखंडाच्या किंवा स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तसंच दिल्ली पोलिसही याचा वापर करणार नाही अशी हमी देण्यात आलीय.

अतिरिक्त पोलीस प्रवक्ते अनिल मित्तल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सोशल मीडियावर व्हायरल केलं जाणारं दृश्यं शाहदरा येथील आहे. त्याठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याने तलवारीने हल्ला करणाऱ्यांपासून बचावासाठी स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी मागितली होती.

अनिल मित्तल सांगतात, "वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोखंडाच्या किंवा स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी दिलेली नाही. भविष्यातही याचा वापर करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही."

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यावर सिंघू सीमेजवळ तलवारीने हल्ला करण्यात आला. तसंच प्रजासत्ताकदिनी पोलिसांवर ज्यापद्धतीने हल्ला झाला ही परिस्थिती पाहता स्थानिक पोलीस आपल्या सुरक्षेसाठी काही प्रयोग करू पाहत आहेत. पण अद्याप दिल्ली पोलिसांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

हल्ला होत असताना पोलिसांनी काढलेले फोटो वापरण्यात येऊ नये अशीही सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे.

स्वरक्षणासाठी हत्यार वापरण्याची अधिकृत परवानगी पोलीस अधिकाऱ्यांना असते. याचा वापर केवळ दिल्ली पोलीस नव्हे तर सर्व राज्याचे पोलीस आणि सशस्त्र पथकाचे अधिकारी आणि सैनिक करत असतात.

पोलिसांच्या या फोटोंबाबत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

'पोलीस कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही'

शेतकरी आंदोलनाचा सामना करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आपली रणनीती बदलली आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

दिल्ली पोलिसांचे अधिकारी सांगतात, "प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटाना निश्चित केलेल्या मार्गांवरच ट्रॅक्टर रॅली काढतील असा विश्वास पोलिसांना होता. ही ट्रॅक्टर रॅली जनपथवरील सरकारी कार्यक्रम संपल्यानंतरच काढली जाईल असंही ठरलं होतं. पण त्यादिवशी घडलेल्या घटनांमुळे दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी का आणि कशी दिली? असे प्रश्न विचारले जात आहेत."

दिल्ली पोलिसांनी निश्चित करून दिलेल्या मार्गांच्या निर्णयावरही टीका केली जात आहे. शहराअंतर्गत रॅली काढण्यासाठी परवानगी द्यायला नको होती. तसंच अशाप्रकारचे आयोजन दिल्ली सीमेच्या बाहेर मर्यादित करणं गरजेचं होतं अशीही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी देण्यापूर्वी शेतकरी नेत्यांसोबत अनेक बैठका पार पडल्या. ही रॅली शांततेत होईल आणि महत्त्वाचे म्हणजे निश्चित करून दिलेले मार्ग आणि वेळ यानुसार होईल असा विश्वास शेतकरी नेत्यांनी पोलिसांना दिला होता. पण आंदोलनकर्ते वेळेपूर्वीच दिल्लीत सुरू असलेल्या सरकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले."

इतर पोलीस अधिकारी सांगतात, प्रजासत्ताकदिनी जे काही घडले त्यानंतर दिल्ली पोलीस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. यामुळेच सिंघू,टिकरीपासून ते गाझीपूर सीमेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याठिकाणी पोलिसांनी सिमेंटचं पक्कं कुंपण, काटेरी तारा आणि रस्त्याच्या मधोमध खिळे लावले आहेत.

आंदोलनकर्ते दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर घेऊन शिरकाव करू नये आणि नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी ही सुरक्षा व्यवस्था केली असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

'स्थानिकांना अडचण'

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे अवीक साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी एकता मोर्चाने दिल्ली पोलिसांच्या अशा सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली असून याविरोधात प्रस्ताव मांडला आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, दिल्ली पोलिसांनी सिमेंटचं पक्कं कुंपण लावलं आहे. यामुळे स्थानिकांना अडचण होत आहे.

"आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्याला अशाच पद्धतीने सील केले जात आहे. यामुळे स्थानिक लोकांना आंदोलनाच्या विरोधात भडकवण्याचं काम पोलीस करत आहे. पोलिसांच्या या नव्या नियोजनात आंदोलनकर्त्यांसाठी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिकेसाठी जागा देण्यात आलेली नाही."

काँग्रेस नेते राहुल गाँधी यांनी यासंदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणातात, "पूल बांधा, भींती नाही."

अखिल भारतीय किसान सभा ही 40 शेतकरी संघटानांपैकी एक संघटाना आहे. या सर्व संघटाना संयुक्त किसान मोर्चाच्या घटक आहेत. किसान सभेचे वरिष्ठ नेते वीजू कृष्णन यांनी दिल्ली पोलिसाची सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरोधात असल्याचा आरोप केला आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण तरीही दिल्ली पोलिस आंदोलनस्थळी नाकाबंदी करून या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचं अखिल भारतीय किसान सभेचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना वीजू कृष्णन यांनी सांगितलं, "धरणं आंदोलन सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी पाणी आणि वीज पुरवठा खंडित व्हावा अशी दिल्ली पोलिसांची योजना आहे. इंटरनेट सेवा याआधीच ठप्प करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शत्रू राष्ट्राची सीमा असल्याप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त केला आहे."

सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे तीन थरांचे बॅरिकेडिंग केले आहे. सुरुवातीला लोखंडाचे बॅरिअर, त्यानंतर मोठ्या दगडांनी बनवलेले रोडे आणि त्यानंतर सिमेंटचे ब्लॉक्स अशी अनेक पातळ्यांची सुरक्षा व्यवस्था केली आहे. एवढंच नाही तर या सगळ्याच्या मधल्या भागांमध्ये ठिकठिकाणी खिळे ठोकण्यात आले आहेत.

खेडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे आयोजक संजय माधव सांगतात, "आंदोलनच्या ठिकाणापासून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यांवर पोलिसांनी काटेरी तार आणि बॅरिकेड लावले आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा स्थानिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे."

किती थरांचे बॅरिकेडिंग?

सुरक्षा व्यवस्थेचा पहिला थर - या थरात सिमेंटचे बॅरिकेडिंग केले आहे. याठिकाणी अर्ध सैनिक दलाचे जवान आणि अधिकारी तैनात आहेत.

दुसरा थर - काटेरी तारा रस्त्यांच्या मधोमध लावल्या असून काही भाग खोदून खिळे ठोकले आहेत. कोणत्याही प्रकारचे वाहन रोखण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या थरात लोखंडाचे बॅरिकेड लावले आहेत. तर पाचव्या थरात ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि कंटेनरच्या रांगा आहेत.

शेवटच्या थरात पुन्हा काटेरी तारेचे कुंपण लावले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने येण्यासाठी रोखण्यात यावं अशी विनंती दिल्ली पोलिसांनी पंजाब आणि हरयाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. तसंच आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही गोळा करण्याच्या सूचनाही दोन्ही राज्यांच्या पोलिसांना दिल्या आहेत.

रेल्वे मार्ग बदलण्याचा पर्यायही कामी आला नाही

दिल्ली पोलिसांनी आपल्या पत्रात गंगानगर-हरिद्वार-भठिंडा एक्स्प्रेस ट्रेन आणि दिल्ली-मुंबई-पंजाब मेलचाही उल्लेख केला आहे. या रेल्वेचे मार्ग आंदोलनामुळे दिल्लीऐवजी रोहतक मार्गाकडे वळवण्यात आले होते. पण ही उपाययोजना दिल्ली पोलिसांच्या फारशी कामी आली नाही.

शेकडोच्या संख्येने शेतकरी रोहतक स्टेशनला उतरून दिल्लीला पोहोचले. पत्रकार सत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या रोहतक रेल्वे स्टेशनला उतरलेले शेतकरी रस्त्यामार्गे दिल्लीत आंदोलनस्थळी पोहोचले.

रेल्वे मार्ग यासाठी बदलण्यात आले कारण या रेल्वेतून येणारे शेतकरी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाणार होते. अशी माहिती सत सिंह यांना रोहतकचे पोलीस उपाधीक्षक गोरखपाल राणा यांनी दिली.

अखिल भारतीय किसान सभेचे नेते वीजू कृष्णन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, ठरलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत सुरू आहे. केंद्र सरकार केवळ दिल्लीतील उच्चभ्रू शहरवासियांचा विचार करत आहे. शेतकरी आणि सामान्य स्थानिकांना अडचणीत आणलं जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)