भगतसिंह कोश्यारी : मी राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक - #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मी राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक - भगतसिंह कोश्यारी

मी राज्याचा राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

मी राज्याचा राज्यपाल नाही तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशूरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकरिता काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन करतो. शासनात काम करणाऱ्यांना देखील अशीच दैवी दृष्टी मिळावी, असंही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

यावेळी क्रीडापटूंना नोकरी देण्यावरूनही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारवर टीका केली. कविता राऊतला अद्याप नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री फक्त नोकरी देण्याची भाषा करतात. करत काहीच नाही. मग सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी विचारला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. कोणताही प्रोपगंडा देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवू शकत नाही - अमित शाह

कोणताही प्रोपगंडा देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवू शकत नाही. कोणताही प्रोपगंडा भारताला उंचावर जाण्यापासून रोखू शकत नाही. भारताच्या प्रगतीसाठी सर्वजण एकजूट आहोत, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर काल (4 जानेवारी) वातावरण ढवळून निघालं होतं.

पॉप गायिका रिहानानंतर ग्रेटा थुनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीसह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अनेक लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने प्रतिक्रिया दिली. शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या वक्तव्याला रिट्वीट करत अमित शाह यांनीही अशा प्रोपगंडाला विरोध दर्शवला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

3. 'रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?'

कृषि कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यावरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आता 6 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा शेतकरी संघटनांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषि कायद्यांच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली होती. या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्या लोकांना सोडून देण्याची मागणी करत आहेत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातेवाईक आहेत का, रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का, असा सवाल भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी विचारला आहे.

तसंच शेतकऱ्यांच्या आडून सर्वसामान्यांना चिथावण्याचं आणि भडकवण्याचं काम राहुल गांधी यांच्याकडून केलं जात असल्याचा आरोपही संबित पात्रा यांनी केला. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक तक्रार

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथितरित्या बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतरसुद्धा त्यांच्यासमोरच्या अडचणी सुरुच आहेत.

आधीचं प्रकरण मिटतं न मिटतं तोच धनंजय मुंडे यांच्याशी परस्पर सहमतीने संबंधांत असलेल्या महिलेने आता त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. संबंधित महिनेले थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेंविरोधात तक्रार दाखल केल्याची बातमी झी 24 तासने दिली आहे.

आपल्या दोन मुलांना मुंडे यांनी चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं असून यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे, ती सुरक्षित नाही, असं महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.

शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही महिलेने दिला आहे.

पण धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर प्रकरण कोर्टात असल्याचं सांगत महिलेकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हे त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण करणारे असल्याचं मुंडे म्हणाले.

5. आंदोलनात सहभागी झालात तर सरकारी नोकरी मिळणार नाही - बिहार पोलीस

एखादा व्यक्ती गुन्हेगारी कारवायांमध्ये आढळून आला तर त्याचा रेकॉर्ड तयार होतो. संबंधित गोष्ट त्या व्यक्तीच्या चारित्र्य दाखल्यामध्ये नमूद केली जाते. त्यामुळे सरकारी, निमसरकारी अथवा खासगी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात, त्या व्यक्तीला नोकरी मिळेल की नाही, हे यावरून ठरू शकतं, असं वक्तव्य बिहारचे पोलीस महासंचालक जितेंद्र कुमार यांनी केलं आहे.

कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी येत्या 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांनी एक अधिसूचना दिली असून रस्त्यावर कोंडी करणाऱ्या किंवा आंदोलनादरम्यान गुन्हेगारी कृत्यं करणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी नाकरण्यात येऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर दाखल गुन्हे त्याच्या चारित्र्याच्या दाखल्यावर नमूद करण्यात येऊ शकतात. त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा बिहार पोलिसांनी दिला आहे. ही बातमी फायनान्शियल एक्सप्रेसने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)