You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA : मुस्लिमांना राहण्यासाठी 150 देश, हिंदूंना एकच-विजय रुपानी #5मोठ्या बातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मुस्लिमांना राहण्यासाठी 150 देश, हिंदूंना एकच-विजय रुपानी
मुस्लिमांना राहण्यासाठी दीडशे देश आहेत, मात्र हिंदूंना एकच पर्याय आहे तो म्हणजे भारत, असं वक्तव्यं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
भाजपतर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ गुजरातमध्ये 62 रॅली काढण्यात आल्या. अहमदाबाद शहरात झालेल्या रॅलीत रुपानी बोलत होते.
पाकिस्तानात हिंदूंचं प्रमाण 22 टक्क्यांवरून 3 वर आलं आहे. बांगलादेशात हिंदू लोकसंख्येचं प्रमाण 2 टक्के आहे. मुस्लिमांना राहण्यासाठी दीडशे देश आहेत पण हिंदूंना एकच आहे, असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.
2. पवार साहेब, तुमच्या संघर्षाने आम्हाला प्रेरणा-सोरेन
"शरद पवारजी, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांकरता मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रात तुम्ही केलेला संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला," अशा शब्दांत झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.
झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्यावर या विजयाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून सोरेन यांचं अभिनंदन केलं. त्याला उत्तर देताना सोरेन यांनी महाराष्ट्रातल्या संघर्षाचा उल्लेख केला.
3. राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार, विद्यार्थिनीने केला निषेध
पुद्दुचेरी विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात सुवर्णपदक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीने राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला न गेल्याने तिने पदवी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
रुबीहा अब्दुररहीम असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला याआधी तिने विरोध दर्शवला होता. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
रुबीहाने सोशल मीडियावर नागरिकत्व कायद्याविरोधात मत व्यक्त केलं आहे. पदवीदान समारंभाला आल्यानंतर रुबीहाला विशेष पोलीस अधीक्षकांनी बाहेर बोलावून घेतलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं भाषण आपल्याला हॉलच्या बाहेर उभं राहून ऐकावं लागलं. मला बाहेर का काढलं याबद्दल काहीच कल्पना नसून असं का केलं, असा सवालही रुबीहाने विचारला आहे. नागरिकत्व कायद्याला केलेला विरोध, आंदोलनात भाग घेतल्यानं अशी वागणूक दिल्याची शक्यता रुबीहाने व्यक्त केली.
पदवीदान समारंभ झाल्यानंतर रुबीहाला हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. रुबीहाने प्रमाणपत्र स्वीकारलं परंतु राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार दिला. हॉलबाहेर काढणं हा अपमान असल्याचं रुबीहा म्हणाली.
4. 'बांगलादेशी घुसखोरांना हाकला नाहीतर...'
शहरात असलेल्या घुसखोरांना हाकला नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. देशभरात एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा यावरून तीव्र आंदोलनं सुरू आहेत.
सरकार या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधीपासून करणार हे अजून निश्चित झालेलं नाही. त्याआधीच पुण्यात मनसेनं शहरातील बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांना पकडून परत पाठवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. 'नेटवर्क 18 लोकमत'ने बातमी दिली आहे.
मनसेचे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. देशाची लोकसंख्या 125 कोटी असताना अजून बाहेरच्या लोकांना नागरिकत्व का द्यायचं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता. सरकार घुसखोर आणि शरणार्थी कसे ओळखणार? आधार कार्ड वापरून मतदान करू शकतो. मग आधार कार्डावर नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही. पण जे मोर्चे काढत आहेत, तोडफोड सुरू आहे, त्यांना तरी या कायद्याबद्दल नीट माहिती आहे का? भारत हा धर्मशाळा नाही. जे घुसखोर आहेत त्यांना हाकललंच पाहिजे अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
5. जमीन मोजणी होणार आता अर्ध्या तासात
जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्य होणार आहे. 'अॅग्रोवन'ने ही बातमी दिली आहे.
सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. कॉर्समुळे हे काम अर्धा तासात होणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग अर्ध्या तासात होणार आहे. राज्यात 77 ठिकाणी कॉर्स स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार आहे. पुण्यात असं एक स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यानंतर मावळ, शिरुर, दौंड आणि पुरंदरमध्ये अशी चार कॉर्स स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)