You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमारमध्ये लष्कराच्या गोळीबारात 89 आंदोलकांचा मृत्यू
म्यानमारमध्ये 'आर्म्ड फोर्सेस डे' दिनी लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. शनिवारी संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, लष्कराच्या गोळीबारात 89 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
असिस्टेंस असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स (एएपीपी) यांनी ही आकडेवारी सादर केली आहे. अमेरिका, युके, युरोपियन युनियन यांनी म्यानमारमधील हिंसक घटनांप्रति निषेध व्यक्त केला आहे.
म्यानमारमध्ये गेल्या महिन्याच्या सुरुवातीला लष्कराने उठाव केला तेव्हापासून संपूर्ण म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं सुरू आहेत. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने पोलिसांच्या मदतीने निदर्शकांवर कारवाई सुरू केली आहे.
लष्कराने नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत प्रतिष्ठा गमावली आहे अशा शब्दात ब्रिटनचे राजदूत डेन चग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लष्कराकडून नि:शस्त्र नागरिकांची हत्या केली जात आहे असं अमेरिकेच्या दूतावासाने म्हटलं आहे.
लष्करप्रमुख मिन आंग लाइंग यांनी शनिवारी नॅशनल टेलिव्हिजनवर लोकशाहीचं रक्षण करू असं सांगितलं होतं. देशात निवडणुका घेतल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. मात्र निवडणुका कधी होणार याविषयी त्यांनी काहीही भाष्य केलं नाही.
लोकशाही पद्धतीने निवडून आलेले आंग सांग सू ची आणि त्यांचा पक्ष गैरपद्धतीने कामकाज करत असल्याने लष्कराला सत्ता हाती घ्यावी लागली असं लष्करप्रमुखांनी सांगितलं.
आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत की नाहीत याविषयी त्यांनी भाष्य केलं नाही. याआधी असा दावा केला जात होता की गोळीबार आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
म्यानमार पूर्वी बर्मा या नावाने ओळखला जात असे. 1948मध्ये म्यानमारला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर अनेक वर्ष देशात लष्कराचीच सत्ता होती.
म्यानमारमध्ये यंदा फेब्रुवारीमध्ये लष्कराने सत्तापालट करत सत्ता हस्तगत केली. आतापर्यंत लष्करविरोधी आंदोलनात चारशेहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी वाहिन्यांवरून आंदोलनकर्त्यांना इशारा देण्यात आला की, गेल्या काही दिवसात झालेल्या मृत्यूंमधून तुम्ही बोध घेतला पाहिजे की गोळी मागच्या बाजूनेही येऊ शकते.
शनिवारी आंदोलनकर्ते आणि लष्करात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा लष्कराने आधीच दिला होता.
रंगून शहरात आंदोलनकर्त्यांना थोपवण्यासाठी लष्कराने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती.
बीबीसीचे प्रतिनिधी आंग थुरा यांना म्यानमारची राजधानी नेपिडाओमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. ते न्यायालयाबाहेरून वार्तांकन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी उठावापासून 40 पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान आंग सान सू ची यांच्यासहित अनेक लोकनियुक्त नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 16 जण अद्याप अटकेत आहेत. लष्करानं 5 माध्यम संस्थांचा परवाना रद्द केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)