तब्बल 3 हजार वर्षांपूर्वीचा सोन्याचा मास्क सापडला, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

चीन, मास्क, कोरोना

फोटो स्रोत, WEIBO/SANXINGDUI MUSEUM

फोटो कॅप्शन, प्राचीन मास्क

तीन हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या मास्कची सध्या चीनमधील सोशल मीडियावर खुमासदार चर्चा सुरू आहे. हे समारंभामध्ये परिधान करण्याचा हा मास्क असल्याचं म्हटलं जातंय. सिचुआन प्रांतातील उत्खननात हा मास्क सापडला.

सँक्सिंगदुई पुरातत्व साईटवर सापडलेला हा मास्क ब्राँझ युगातलं अवशेष असल्याचं म्हटलं जातंय.

तज्ज्ञांच्या मते, या शोधामुळे शू राज्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा संदर्भ लागण्यास मदत होईल. इसवी सन पूर्व 316 मध्ये इथं शू राज्य होतं.

मात्र, या अर्ध्या मास्कमुळे सोशल मीडियावर अगदी खुमासदार पद्धतीने चर्चा सुरू झालीय. मीम्स आणि विनोदी व्हीडिओ तयार करून शेअर केले जात आहेत.

चीनमधील विबो या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अक्षरश: या मास्कच्या मीम्सनं धुमाकूळ घातलाय. सिनेमांमधील वेगवेगळे कॅरेक्टर्स या मास्कला जोडून विनोदी फोटो तयार केले जात आहेत.

सँक्सिंगदुई गोल्ड मास्क फोटो एडिटिंग कॉम्पिटिशन अशा अर्थाचं चिनी भाषेतलं हॅशटॅग वापरून हे फोटो शेअर केले जात आहेत. आतापर्यंत जवळपास 40 लाख जणांनी हे शेअर केले आहेत. विबोवरील चिनी लोकांच्या कल्पकतेला अगदी धुमारे फुटले आहेत.

सँक्सिगदुई येथील संग्रहालयानंही या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला. चीनमधील सर्वांत महत्त्वाचं मानलं जाणारं हे संग्रहालय आहे.

"सुप्रभात, आम्ही आताच उठलो. सगळेजण फोटोशॉप करण्यात व्यग्र आहेत का?" असा प्रश्न विबोवर पोस्ट करत या संग्रहालयाने ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, संग्रहालयानेही स्वत: एक मीम शेअर केला.

तसंच, संग्रहालयाकडून एक व्हीडिओही शेअर करण्यात आला. त्यातून प्राचीन नागरीकरणाच्या कौशल्याचं कौतुक करण्यात आलंय. हा व्हीडिओही तुफान व्हायरल होत आहे.

हे चीनमध्ये काही पहिल्यांदाच होतंय, असंही नाही. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अँग्री बर्ड्समधील डुकराच्या कॅरेक्टकप्रमाणे एक अवशेष सापडलं होतं आणि तेव्हाही अशीच चर्चा झाली होती.

या सोन्याच्या मास्कसह हस्तिदंत, पितळेचे तुकडे, रेशीमपासून बनवलेल्या कलाकृती इत्यादी गोष्टी सापडल्या.

सँक्सिंगदुई पुरातत्त्व साईटचा शोध 1929 साली एका शेतकऱ्याने लावला होता. या जागेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक अवशेष सापडले आहेत. चेंगडू शहरापासून ही जागा 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)