चीनवर युरोप-अमेरिकेने लादले निर्बंध, वीगर मुस्लिमांचं शोषण केल्याचा आरोप

फोटो स्रोत, Reuters
वीगर मुस्लिमांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल अनेक युरोपियन देशांसोबतच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनने चीनवर निर्बंध लावले आहेत.
चीनने देशाच्या वायव्येला असणाऱ्या शिनजियांग प्रांतातल्या कॅम्प्समध्ये वीगर मुस्लिमांना बंदिवान केलंय. या कॅम्पमध्ये असणाऱ्यांचा छळ केला जात असून त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतलं जात असल्याचा आरोप चीनवर आहे. लैंगिक शोषणाचीही काही प्रकरणं समोर आली आहेत.
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या एकत्रित प्रयत्नांनंतर या निर्बंधांची घोषणा करण्यात आली.
प्रत्युत्तरादाखल चीननेही युरोपियन अधिकाऱ्यांवर निर्बंध लावले आहेत.
आपल्यावर झालेले शोषणाचे आरोप चीनने कायमच नाकारले आहेत. हा कॅम्प दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र असल्याचं चीनने म्हटलंय.
पण चीनमधल्या कॅम्प्समध्ये होणारं वीगर मुस्लिमांचं शोषण ही आजच्या काळातली सगळ्यांत मोठी मानवाधिकार समस्या असून आंतरराष्टीय गट याकडे दुलर्क्ष करू शकत नसल्याचं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी म्हटलंय.
वीगर मुस्लिमांना देण्यात येणारी वागणूक मानवाधिकाराचं मोठं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, AFP
1989मध्ये चीनमधल्या तियानानमेन चौकात झालेल्या नरसंहारानंतर युरोपियन युनियनने चीवर निर्बंध लावले होते. लोकशाहीच्या मागणीसाठी निदर्शनं करणाऱ्या लोकांवर चिनी सैन्याने तेव्हा गोळीबार केला होता.
त्यानंतर आता हे निर्बंध लावण्यात आलेत.
काय आहेत निर्बंध?
या निर्बंधांचा रोख शिनजियांग प्रांताच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे आहे. वीगर मुसलमानांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
प्रवासावरचे निर्बंध आणि संपत्ती जप्त करण्याचाही यामध्ये समावेश आहे.
चीनने दहा लाखांपेक्षा जास्त अल्पसंख्याक वीगर मुस्लिमांना या कॅम्पमध्ये बंदिवान करून ठेवल्याचं मानवी हक्क गटांचं म्हणणं आहे.
वीगर महिलांची बळजबरीने नसबंदी करणं आणि लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर ठेवल्याचे आरोपही चीन सरकारवर आहेत.
बीबीसीने याविषयी तपास केला होता. महिलांवरील बलात्कार, लैंगिक शोषण आणि नियोजनबद्ध शोषण केल्याचे पुरावेही यामध्ये आढळले होते. आपल्याकडून बळजबरीने काम करून घेतलं जात असल्याचं कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
चीनच्या शिनजियांग पब्लिक सिक्युरीटी ब्यूरोचे संचालक चेन मिनग्वाओ यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. मानवी हक्कांच्या उल्लंघनामध्ये त्यांचाही समावेश असल्याचं युरोपियन युनियनने म्हटलंय.
चीनचे ज्येष्ठ अधिकारी वांग मिंगशान आणि वांग जुनझेंग आणि शिनजियांगमधल्या कम्युनिस्ट पार्टीचे माजी उप-महासचिव झू हाईलुन यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत.
याशिवाय शिनजियांग प्रॉडक्शन अँड कंस्ट्रक्शन कॉर्प्स पब्लिक सिक्युरिटी ब्यूरोवरही निर्बंध लावण्यात आलेत.
चुकीच्या माहितीच्या आधारे हे निर्बंध लावण्यात आल्याचं चीनने म्हटलंय. सोबतच युरोपियन युनियनचे दहा जण आणि चार संस्थांवरही आपण निर्बंध लावत असल्याचं चीनने म्हटलंय. चीनचं सार्वभौमत्वं आणि राष्ट्रीय हितांच्या विरोधात हा चुकीचा प्रचार होत असल्याचं चीनने म्हटलंय.
चीनमध्ये युरोपियन संसदेचं प्रतिनिधीत्व करणारे जर्मन नेते राईनहार्ड बुतीकॉफर यांच्यावर चीनने निर्बंध घातलेत.
चीनच्या शिनजियांगमधल्या धोरणांचे अभ्यासक एड्रियन झेंज आणि स्वीडनचे अभ्यासक जॉर्न जेर्डन यांच्यावरही चीनने निर्बंध घातले आहेत.
युरोपातल्या या लोकांवर चीनमध्ये येण्यावर आणि इथे व्यवहार करण्यावर बंदी असेल.
दोन्ही बाजूंनी लावण्यात आलेल्या या निर्बंधांमुळे युरोप आणि चीनदरम्यानच्या धोरणात्मक संबंधांमध्ये मोठी फूट पडलीय.
चीन आणि युरोपातली व्यापारी भागीदारी मोठी आहे आणि आतापर्यंत या दोन्हींमधले संबंध चांगले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








