चीन वीगर मुस्लिमांना नोकरीच्या बहाण्याने असं उद्ध्वस्त करत आहे

बुझनाप
    • Author, जॉन सुडवर्थ
    • Role, बीबीसी न्यूज, बिजिंग

वीगर मुस्लिम आणि इतर वांशिक अल्पसंख्यांकांना हजारोंच्या संख्येनं नवीन नोकऱ्यांसाठी शिंजियांग प्रांताच्या बाहेर पाठविण्याच्या चिनी सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प म्हणजे त्यांची लोकसंख्या कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचं एका उच्चस्तरीय चिनी अभ्यासात नमूद केल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं आहे.

अति-पश्चिमेकडील भागातील डेमोग्राफी (लोकसंख्येची रचना) बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचं वृत्त चिनी सरकारनं फेटाळलं आहे. नोकरीनिमित्त केलेल्या या बदल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिने केल्या आहेत. ग्रामीण भागातील वर्षानुवर्षांची बेरोजगारी तसंच गरीबी हटविण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आल्याचंही चिनी सरकारनं म्हटलं आहे.

पण आमच्या हाती आलेल्या पुराव्यांवरून हे दिसत आहे की, शिंजियांगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये उभारण्यात आलेल्या शैक्षणिक शिबीरांसोबतच या नवीन धोरणामुळेही धाकदपटशाहीचा धोका वाढू शकतो. शैक्षणिक धोरणाप्रमाणेच नोकऱ्यांमधील बदल्यांचं हे धोरणही अल्पसंख्यांकांची जीवनशैली तसंच विचारसरणी बदलण्यासाठी आखल्याचंही जाणवत आहे.

हा अभ्यास ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा नजरेखालून घालावा यासाठी तयार केला होता, पण अपघाताने तो ऑनलाइन प्रसिद्ध केला गेला. प्रोपागंडा रिपोर्टस, मुलाखती आणि चीनमधील वेगवेगळ्या कारखान्यांना दिलेल्या भेटींवर बीबीसीची जी शोधमोहिम होती, त्यामध्ये या अभ्यासाचाही समावेश करण्यात आला आहे.

वीगर मजुरांच्या बदल्या आणि दोन महत्त्वाच्या पाश्चिमात्य ब्रँड्समधलया संभाव्य लागेबांध्यांसंबंधीही आम्ही प्रश्न विचारले. कारण त्यासंबंधी जागतिक पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिंजियांगच्या दक्षिणेकडे असलेल्या गावामध्ये शेतात गवताच्या गंजी रचल्या जात होत्या आणि गावकरी फळं तसंच ब्रेड वगैरे गोष्टी त्यांच्या 'सुपां'मध्ये ठेवत होते. याभोवतीच पारंपरिक वीगर कुटुंबांचं आयुष्य फिरत असतं.

ताक्लामाकन वाळवंटाकडून येणारे उष्ण वारे मात्र काहीशी काळजी आणि बदल सोबत घेऊन आले आहेत.

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाकडून चालविण्यात येणाऱ्या वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या एका व्हीडिओ रिपोर्टमध्ये दाखविण्यात आलं की, गावामध्ये अधिकाऱ्यांचा एक गट लाल रंगाचं बॅनर घेऊन बसला होता. या बॅनरवर 4 हजार किलोमीटर लांब असलेल्या अन्हुई प्रांतात नोकरी असल्याची जाहिरात होती.

दोन दिवस उलटून गेल्यानंतर रिपोर्टर आपल्या नॅरेशनमध्ये सांगत आहे की, गावातील एकही व्यक्ती या नोकरीसाठी नोंदणी करायला पुढे आली नाहीये. त्यामुळे आता अधिकारी घरोघरी फिरत आहेत.

त्यानंतर वीगर, कझाक आणि इतर अल्पसंख्याकांना दूरच्या फॅक्टरींमध्ये काम करण्यासाठी भाग पाडल्याचंही फुटेज समोर आलं. त्यांच्या घरापासून हे अंतर प्रचंड आहे.

हा व्हीडिओ 2017 मधला आहे. त्यावेळी या धोरणाची तीव्रता वाढली होती. पण आजपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये याला प्रसिद्धी मिळाली नाही.

अधिकारी एका वडिलांशी बोलत होते. ते गृहस्थ आपल्या मुलीला इतक्या लांबवर पाठवायला नाखूश असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

बुझनाप

"ज्याला तिकडे जायचंय असं कोणीतरी असेलच ना," ते अधिकाऱ्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करत होते. "आम्ही इथं आमचं भागवतोय. आम्हाला आमच्या पद्धतीनं जगू द्या ना."

वडिलांना न जुमानता ते अधिकारी थेट 19 वर्षांच्या बुझनापशी बोलायला लागतात. ते तिला सांगतात की, जर ती इथंच राहिली तर लवकरच तिचं लग्न लावून देतील आणि मग तिला कधीच बाहेर पडता येणार नाही.

"विचार कर एकदा. जाशील का तू कामाला?" ते विचारतात.

सरकारी अधिकाऱ्याची ती रोखलेली करडी नजर आणि सरकारी मालकीच्याच चॅनेलचे पत्रकार समोर असतानाही ती मान हलवून नकार देत म्हणते, "मी नाही जाणार."

पण तरीही ते तिच्यावर दबाव टाकतच राहतात. शेवटी हुंदके देत ती म्हणते, "जर इतर जण जाणार असतील तर मी पण जाईन."

ही फिल्म आई आणि मुलींच्या भावूक निरोपावर येऊन संपते. बुझनाप आणि तिच्यासोबत कामावर घेतलेले इतर जण आपलं कुटुंब, संस्कृती मागे ठेवत दूर जाण्यासाठी एकत्र जमलेले असतात.

प्रोफेसर लॉरा मर्फी या युकेमधील शेफिल्ड हलम विद्यापीठात मानवी हक्क आणि समकालीन गुलामगिरी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्या 2004 ते 2005 या कालखंडात शिंजियांग इथे राहिल्या होत्या. त्यानंतरही लॉरा इथे येत राहतात.

"हा व्हीडिओ उल्लेखनीय आहे," त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

"चिनी सरकार वारंवार सांगत आहे की, लोक या कार्यक्रमात स्वयंप्रेरणेनं सहभागी होत आहेत. पण या व्हीडिओतून हे स्पष्टपणे दिसून येतंय की चिनी सरकार दडपशाहीचा वापर करत आहे, लोक विरोध करूच शकत नाहीयेत."

"दुसरी गोष्ट म्हणजे यातून दिसणारा सरकारचा अंतस्थ हेतू," त्या सांगतात. "लोकांना दारिद्रयरेषेखालून बाहेर काढण्यासाठी ही योजना आहे, असं सांगितलं जात असलं तरी हा लोकांचं आयुष्य आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर करून त्यांची लोकसंख्या विखुरायची आणि त्यांची भाषा, संस्कृती, कुटुंबपद्धती बदलून टाकायची. यामुळे गरीबी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक आहे."

शिंजियांगमधील प्रशासनाबद्दल चिनी सरकारच्या बदललेल्या धोरणांना दोन घटना कारणीभूत ठरल्याचं दिसतं. एक म्हणजे 2013 साली बिजिंगमध्ये पादचाऱ्यांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि 2014 साली कनमिंग शहरात झालेला हल्ला. या हल्ल्यासाठी वीगर मुसलमान आणि फुटीरतावाद्यांना जबाबदार धरण्यात आलं.

बुझनाप

फोटो स्रोत, NATHAN VANDERKLIPPE/THE GLOBE AND MAIL

शैक्षणिक कँप आणि नोकऱ्यांच्या निमित्तानं करण्यात आलेल्या बदल्यांच्या योजनांच्या केंद्रस्थानी वीगर मुस्लिमांमधील इस्लामिक श्रद्धांमध्ये परिवर्तन घडवून 'आधुनिक' बनविण्याचा प्रयत्न करणं हा आहे, जेणेकरून त्यांच्या निष्ठा कम्युनिस्ट पार्टीकडे वळतील.

चीनमधील बहुसंख्याकांच्या हान संस्कृतीच्या प्रवाहात वीगर मुस्लिमांना सामावून घेणं हेच शिंजियांगमधील नोकऱ्यांच्या बदल्यांमागचं उद्दिष्ट असल्याचं वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासातून दिसून येत आहे.

शिंजियांगमधील होतान प्रीफेक्चरमध्ये मे 2018 साली केलेल्या फिल्ड वर्कमधील अहवालातून चिनी अधिकाऱ्यांसाठी नोकऱ्यांमधल्या बदल्यासंबंधीचा अभ्यास तयार करण्यात आला होता. तो डिसेंबर 2019 मध्ये ऑनलाइन प्रसिद्ध केला गेला आणि त्यानंतर अचानकपणे काही महिन्यांतच तो मागे घेतला गेला.

चीनमधील नानकाई विद्यापीठातील अभ्यासकांच्या एका गटानं लिहिलेल्या या अभ्यासात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की, वीगर अल्पसंख्याकांवर प्रभाव टाकण्याच्या, त्यांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येनं मजुरांची बदली करणं हे महत्त्वाचं ठरू शकतं.

त्यातून त्यांच्या विचारप्रक्रियेतही बदल होऊ शकतो. त्यांना एका ठिकाणहून चीनमधली दुसऱ्या कोणत्याही प्रांतात घेऊन जाण्यामुळे वीगर मुसलमानांची लोकसंख्येंची घनताही कमी होऊ शकते, असंही या अहवालात म्हटलं आहे.

परदेशात राहणाऱ्या एका वीगर संशोधकाला हा अभ्यास रिपोर्ट आढळला. विद्यापीठाला त्यांची चूक लक्षात येऊन त्यांनी तो रिपोर्ट काढण्याआधी त्याचं एक व्हर्जन सेव्ह केलं गेलं.

बुझनाप

डॉ. अड्रियन झेन्झ हे वॉशिंग्टनमधील व्हिक्टिम्स ऑफ कम्युनिझम मेमोरियल फाउंडेशनमध्ये सीनिअर फेलो आहेत. त्यांनी या अहवालावरचं सविस्तर विश्लेषण लिहिलं आहे. त्याचं इंग्लिश भाषांतरही आहे.

'शिंजियांगमध्ये उच्चस्तरीय अक्सेस असलेले माजी सरकारी अधिकारी आणि आघाडीच्या अभ्यासकांनी तयार केलेला हा रिपोर्ट अभूतपूर्व आणि अधिकृत आहे,' असं डॉ. झेन्झ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

त्यांच्या विश्लेषणात एरिन फारेल रोझेनबर्ग यांचंही कायदेशीर मतप्रदर्शन आहे. रोझेनबर्ग हे स्वतः अमेरिकेतील होलोकोस्ट मेमोरियल म्युझियमचे माजी ज्येष्ठ सल्लागार होते. त्यांच्या मते जबरदस्तीनं केलेल्या बदल्यांमधून मानवतेविरोधातले गुन्हे असल्याचं नानकाई रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका लेखी निवेदनामध्ये म्हटलं आहे की, या रिपोर्टमधून लेखकाचा केवळ वैयक्तिक दृष्टिकोन दिसून येतो. त्यातील बहुतांश भाग हा वस्तुस्थिला धरून नाहीये.

"शिंजियांग मधील गोष्टींचं रिपोर्टिंग करताना पत्रकार चिनी सरकारनं प्रसिद्ध केलेली अधिकृत माहिती वापरतील हीच आमची अपेक्षा आहे," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

नानकाई रिपोर्टच्या लेखकांनी हा गरिबीविरुद्धच्या लढाईतला एक भाग असून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी स्वेच्छेनं लोक तयार झाले आहेत असं म्हटलं आहे. शिवाय या फॅक्टरीमधून कामगारांना नोकरीतून बाहेर पडण्याची आणि घरी परत जाण्याचीही मुभा आहे.

पण ही धोरणं प्रत्यक्षात ज्यापद्धतीनं राबविली जात आहेत, ते नानकाई रिपोर्टच्या लेखकांनी केलेल्या दाव्याशी विसंगत वाटतं.

यासंदर्भात काही 'लक्ष्यं' निर्धारित करून दिली आहेत. जेव्हा हा उपक्रम हाती घेतला गेला त्यावेळी एकट्या होतान प्रीफेक्चर इथं अडीच लाख मजुरांना बाहेरून आणण्यात आलं होतं.

ही उद्दिष्टं गाठण्यासाठी दबाव आहे. जवळपास प्रत्येक गावात नोकरभरती केंद्र उभं करण्यात आलं आहे आणि अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन भरती करण्याचं काम दिलं आहे. जसं 19 वर्षांच्या बुझनापच्या बाबतीत घडलं होतं.

बुझनाप

फोटो स्रोत, NATHAN VANDERKLIPPE/THE GLOBE AND MAIL

प्रत्येक पातळीवर सरकारी नियंत्रणाच्या खुणा पाहायला मिळतात. नोकरीत घेतलेल्या प्रत्येकाला राजकीय विचारधारांसंबंधीचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यानंतर त्यांना फॅक्टरीमध्ये गटागटानं पाठविलं जातं.

ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन किंवा गाई-गुरं मागे सोडून जायची इच्छा नसते, त्यांना केंद्रीकृत सरकारी योजनेत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. या योजनेत नाव नोंदविलेल्यांच्या जमिनीची व्यवस्था त्यांच्या अनुपस्थितीतही ठेवली जाते.

जेव्हा नव्यानं भरती केलेले लोक त्यांच्या नवीन फॅक्टरीमध्ये जातात तेव्हा त्यांच्यासोबत केंद्रीकृत व्यवस्थापनाचे अधिकारी असतात, जे अगदी खातापितानाही त्यांच्यासोबत राहतात.

पण यंत्रणेमधील भेदभावाची वागणूक स्थानिक पोलिसांमध्ये दिसून येते. वीगर मुस्लिमांच्या भरभरून येणाऱ्या रेल्वेगाड्यांनी त्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

याठिकाणी चीनच्या शिंजियांग प्रांतातील पोलिसांसाठी समस्या वाढल्या आहेत. येथील पुनर्शिक्षण केंद्रात भरती करण्यात आलेल्या लोकांची संख्या आता कट्टरवाद्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त झाली आहे.

संपूर्ण वीगर समाजावरच दंगलखोरपणाचा शिक्का मारू नये, असंही त्यात सांगितलं आहे.

हुबेईच्या ग्रे औद्योगिक परिसरात हुआफू टेक्स्टाईल कंपनी आहे. हा परिसर चीनच्या पूर्व भागात येतो.

टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या बातमीत याच कारखान्याचा उल्लेख होता. बीबीसीने याठिकाणी भेट दिली, त्यावेळी पाच मजल्याच्या वीगर वसतिगृह पुनर्वसन केंद्रात आम्ही गेलो.

इथं एका खिडकीत मोज्यांची एक जोडी वाळत घातलेली होती. इथले वीगर लोक घरी परतल्याचं तिथल्या गेटवरच्या राखणदाराने सांगितलं.

कोव्हिड प्रतिबंधक नियमांमुळे याठिकाणी शिंजियांग परिसरातील कोणताच कामगार ठेवला जात नाही, अशी माहितीही त्या रखवालदाराने दिली.

अॅमेझॉनच्या युकेमधील वेबसाईटवर हुआफू येथे बनवण्यात आलेली काही उशीचे कव्हर्स विक्रीला असल्याचं दिसतं. पण त्याचं उत्पादन इथंच होतं किंवा नाही, याबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही.

ही उत्पादनं सध्या उपलब्ध नाहीत. अॅमेझॉन कामगारांवर होणारा अत्याचार सहन करत नाही. त्यामुळे त्यांनी या उत्पादनांची विक्री आता बंद केल्याचं त्यांनी सांगितलं.

चीनमधील आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या एका समुहासोबतही बीबीसीने एकूण सहा कंपन्यांना भेट दिली.

ग्वांगझेऊ प्रांतातील डोंगन लुझू शू फॅक्टरीत एका कामगाराने वीगर कामगारांबद्दल माहिती दिली. या कारखान्यात स्केचर्स कंपनीचे शूज तयार होत असल्याचं तिथल्या कामगाराने सांगितलं. विगर कामगार स्वतंत्र वसतिगृह वापरतात, त्यांचं कँटीनही वेगळं असतं, असंही त्याने सांगितलं.

या कंपनीतील एक व्हीडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्यामध्ये विगर कामगार हे शूज बनवताना दिसत होता. या व्हीडिओची सत्यता पडताळता आलेली नव्हती.

पण याबाबत स्केचर्सने स्पष्टीकरणही दिलं होतं. कोणत्याही कामगारासोबत जबरदस्ती सहन केली जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

या प्रकरणावर डोंगल लुझू कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

याठिकाणी लोकांशी बोलताना वीगर कामगारांना कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, असंच आम्हाला सांगण्यात आलं. पण काही ठिकाणी वेगळ्या गोष्टीही समोर आल्या. काही ठिकाणी या व्यक्तींच्या फिरण्यावर बंधनं होतं.

वुहानमधील एका हान चायनीज कामगाराने याबाबत माहिती दिली. त्याच्या कंपनीतील जवळपास 200 सहकाऱ्यांना मोकळेपणाने फिरू दिलं जात नाही, त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही, असं त्याने सांगितलं.

तीन महिन्यांनी बुझनाप पुन्हा तिच्या गावी तिचं राजकीय प्रशिक्षण सुरू करण्यासाठी परतली. त्यावेळी चीनच्या शासकीय टीव्ही चॅनेलने पुन्हा तिची भेट घेतली. याही वेळी ती हुआफू टेक्स्टाईल कंपनीमध्येच होती. पुन्हा एकदा अहवाल केंद्रस्थानी ठेवूनच ही बातमी करण्यात आलेली आहे.

या बातमीत एका ठिकाणी बुझनाप अत्यंत भावनिक होताना दिसते. तिला सुरुवातीला रागावलं जातं, पण अखेर यामध्ये बदल होताना दिसतो. तिला कामाची परवानगी मिळाल्याच दाखवलं जातं.

म्हणजेच, जीवनशैली आणि विचारसरणी या दोन्ही बदलत चालल्याचं हे उदाहरण आहे.

निर्माती - कॅथी लाँग

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)