नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला स्थानिकांचा का होत आहे विरोध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेश,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च रोजी बांगलादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, जाण्याआधीच तिथल्या काही लोकांनी त्यांच्या दौऱ्याचा विरोध सुरू केला आहे.

मात्र, एका गटाच्या विरोधामुळे चिंतेचं कारण नाही, असं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, "काही जणांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढाका दौऱ्याविरोधात मोहीम उघडली आहे. मात्र, चिंतेचं कारण नाही. बांगलादेश एक लोकशाही असलेलं राष्ट्र आहे. इथे जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे."

'ढाका ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन एका पत्रकार परिषदेत म्हणाले, "जनता आमच्यासोबत आहे. केवळ काही लोक या दौऱ्याचा विरोध करत आहेत आणि त्यांना तो करू द्यावा. या मुद्द्यावरून चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही."

'द डेली स्टार' वृत्तपत्रानेही हे वृत्त प्रकाशित केलं आहे.

विरोध करणारे कोण आहेत?

एसोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनुसार शुक्रवारी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मुस्लीम आणि विद्यार्थी संघटनांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मार्चच्या दौऱ्याचा विरोध करत रॅली काढली.

यंदा 26 मार्च रोजी बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च रोजी बांगलादेशला जाणार आहेत. 26 मार्च 1971 रोजी बांगलादेशने स्वतःला पाकिस्तानपासून स्वतंत्र घोषित केलं होतं. तब्बल 9 महिन्यांच्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताच्या मदतीने बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेश,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदी याआधी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते.

एसोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार शुक्रवारच्या नमाज पठणानंतर जवळपास 500 मुस्लिमांनी ढाक्यातील बैतुल मोकार्रम मशिदीबाहेरच्या रस्त्यावर मोर्चा काढला. रॅलीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी निदर्शकांच्या हातात कुठलंही बॅनर नव्हतं आणि ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, याचीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरचा अवमान केला. या मोर्च्यात भारतविरोधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. काही निदर्शकांच्या हाती पोस्टर होते. त्यावर लिहिलं होतं - 'गो बॅक मोदी, गो बॅक इंडिया.'

याव्यतिरिक्त डाव्या विचारसरणीच्या जवळपास 200 विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ढाका विद्यापीठाबाहेर मोर्चा काढला. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या आमंत्रणावरून या दौऱ्यावर जाणार आहेत.

निदर्शक पंतप्रधान शेख हसिना यांच्यावरही टीका करत आहेत. नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करायला नको होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण सुरक्षा देण्यात येईल'

"भारताचे पंतप्रधान आमच्या आमंत्रणाला मान देऊन येत आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे," असं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळी आवश्यक सुरक्षा पुरवण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

बांगलादेशामध्ये येणाऱ्या सर्वच राष्ट्रप्रमुखांना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात येईल आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करत सर्व नियोजित कार्यक्रमानुसारच घडेल, असंही मोमेन यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेश,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन

पुराणमतवाद्यांना कसं हाताळायचं हे बांगलादेशच्या जनतेला आणि पंतप्रधान शेख हसिना यांना चांगलंच ठाऊक आहे, असंही मोमेन म्हणाले.

दक्षिण आशियातील पाच राष्ट्र प्रमुख केवळ द्विपक्षीय चर्चेसाठी नव्हे तर बांगलादेशचा 50वा स्वांतत्र्य दिन आणि राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी व्हायला येत असल्याचं बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री एम. शहरियार आलम यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आणि म्हणूनच मी वेगळं मत असणाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ते बंगबंधू यांचा राष्ट्रपिता म्हणून आदर करत असतील आणि त्यांना देशाप्रती प्रेम असेल तर त्यांनी आमंत्रित पाहुण्यांविषयीदेखील आदर दाखवावा."

गोनोशसथ्या केंद्राचे संस्थापक डॉ. जफरुल्लाह चौधरी आणि बीएनपीशी संबंधित इतर पक्ष आणि गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा विरोध करून दुटप्पी भूमिका घेऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात याच सर्व लोकांनी मोदी यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता, असं त्याचं म्हणणं आहे.

बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची जन्मशताब्दी आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 10 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 मार्चपासून ढाक्यातील नॅशनल परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम सुरू आहे.

बांगलादेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गोपालगंजच्या मटुआ समाजातील लोकांची भेट घेणार आहेत. या कार्यक्रमामागे काही राजकीय किंवा पश्चिम बंगाल निवडणुकीचं कारण आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना एम. शहरयार आलम म्हणाले, "मोदी ढाक्याच्या बाहेर असणाऱ्या वेगवेगळ्या भागांना भेट देणार आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ते आमचे पाहुणे आहेत आणि ढाक्याबाहेर भेट देण्याची त्यांची इच्छा आहे. यामुळे आमचं पर्यटन क्षेत्र वाढीस मदतच होईल. आमच्यासाठी ही चांगली बाब आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेश,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलदेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी गोपालगंजमध्ये मटुआ समाजाच्या तुंगीपारा या मंदिराला आणि ओरकांडी इथल्या बंगबंधू स्मारकाला भेट देणार आहेत.

तर नेपाळच्या राष्ट्रापती विद्यादेवी भंडारी यादेखील सोमवारी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्या बांगलादेशातील दुहेरी सोहळ्यात सहभागी होतील. तसंच त्या बांगलादेशच्या पंतप्रधानांशी चर्चाही करतील. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्या आमंत्रणावरून बांगलादेशला जाणार आहेत.

दुसरीकडे श्रीलंकचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेला परतले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रविवारी याविषयी ट्वीट करताना ते लिहितात, "बांगलादेशच्या यशस्वी दौऱ्यानंतर श्रीलंकेला परतलोय. माझ्या प्रतिनिधी मंडळाच्या आदरातिथ्यासाठी मी बांगलादेशचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानू इच्छितो. या सुंदर देशात राहून मला आनंद मिळाला. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण एकत्रित काम करू, अशी आशा मला आहे."

मोदी सरकारच्या धोरणांवर नाराजी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांचा बांगलादेशमध्ये विरोध होतोय. सीएए कायद्याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हटलं होतं. यावर बांगलादेशने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेश,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन

बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले होते, "हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हणणं अनावश्यक आणि चूक आहे. बांगलादेशमध्ये आहे तसा जातीय सलोखा असणारी राष्ट्रं मोजकीच आहेत. आमच्याकडे कुणी अल्पसंख्याक नाही. सर्व समान आहेत. शेजारील राष्ट्र म्हणून परस्पर मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील, असं भारत काहीही करणार नाही, अशी आशा आम्ही बाळगतो. हा विषय नुकताच आमच्यासमोर आला आहे. आम्ही या मुद्द्याचा काळजीपूर्वक अभ्यास करू आणि त्यानंतरच भारताशी यावर चर्चा करू."

भारताच्या या दोन्ही नव्या कायद्यांचा विषय बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीनेही उचलला होता. बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. बीएनपीचे सरचिटणीस मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर यांनी 16 डिसेंबर 2019 रोजी भारतातील आसाम राज्यात एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका असल्याचं म्हटलं होतं.

इस्लाम आलमगीर यांनी म्हटलं होतं, "भारताच्या एनआरसी कायद्याची आम्हाला चिंता वाटते, असं आम्ही याआधीच सांगितलं होतं. भारताच्या एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं आम्हाला वाटतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)