बांगलादेशचं विमान साडेपाच वर्षांपासून रायपूर विमानतळावर का उभं आहे?

फोटो स्रोत, ALOK PRAKASH PUTUL
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
एखादी कार घराबाहेर साडेपाच वर्ष उभी असेल, एकदाही दुरुस्ती-देखभाल झाली नसेल तर ती कार चालवता येईल का?
अशा कारचं तुम्ही काय कराल?
कदाचित तुम्ही ती विकण्याचा विचार कराल किंवा दुरुस्त कराल.
पण, कारच्या जागी विमान असेल तर? आणि ते ही भारताचं नाही तर दुसऱ्याच देशाचं विमान भारतातल्या एखाद्या एअरपोर्टवर उभं असेल तर?
विमान पार्किंगचं भाडं
बांगलादेशच्या युनायटेड एअरवेज कंपनीचं एक प्रवासी विमान गेल्या साडेपाच वर्षांपासून भारतातल्या रायपूर विमानतळावर उभं आहे.
या विमानाची विचारपूस करणारं कुणी नाही. इतकंच कशाला पार्किंगचं दीड कोटी रुपयांचं भाडंही थकलं आहे.
विमान कंपनीने रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर राहिलेलं हे विमान विकून पार्किंगचं भाडं चुकवण्याची हमी दिली होती.
मात्र, त्यासाठी 9 महिन्यांची मुदत मागितली आहे.
युनायटेड एअरवेजचं हे विमान गेल्या 68 महिन्यांपासून म्हणजे तब्बल साडेपाच वर्षांपासून रायपूर विमानतळावर उभं आहे. या विमानसंबंधी दोन्ही देशांमध्ये अनेकदा पत्रव्यवहार झाला. पार्किंग शुल्क भरून विमान घेऊन जावं, असंही सांगण्यात आलं. पण, पुढे काहीच झालेलं नाही.
रायपूर विमानतळाचे संचालक राकेश सहाय यांनी बीबीसीला सांगितलं, "विमान विकून भाडं भरू, असं विमान कंपनीने आम्हाला सांगितलं आहे. आम्ही त्यांचा हा प्रस्ताव आमच्या कायदा विभागाकडे पाठवला आहे. कायदा विभागाच्या सल्ल्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल."
राकेश सहाय यांच्या मते गेल्या पाच वर्षात युनायटेड एअरवेज कंपनीला अनेक मेल करण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने विमान घेऊन जाण्यात रस दाखवला नाही आणि रायपूर विमानतळाचं पार्किंगचं भाडंही भरलं नाही.

फोटो स्रोत, ALOK PRAKASH PUTUL
दरवेळी कंपनीने आपण बांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा करत असल्याचं उत्तर पाठवलं.
अखेर कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. तेव्हा कुठे पार्किंगचं 1 कोटी 54 लाख रुपयांचं भाडं भरायला तयार असल्याचं, मात्र, त्यासाठी थोडी मुदत देण्यात यावी, असं उत्तर कंपनीने पाठवलं.
या प्रकरणी आम्ही फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून युनायटेड एअरवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
बांगलादेशचं विमान भारतात कसं आलं?
बांगलादेशच्या युनाटेड एअरवेजच्या या मॅकडोनल डगलस एमडी-83 विमानाला 7 ऑगस्ट 2015 रोजी आपातकालीन परिस्थितीत रायपूर विमानतळावर उतरवण्यात आलं होतं.
बांगलादेशची राजधानी ढाकावरून मस्कतला निघालेल्या या विमानात 173 प्रवासी होते.
विमान वाराणसी आणि रायपूरच्या मधल्या हवाई क्षेत्रात असताना विमानाच्या एका इंजिनने पेट घेतला.
रायपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात JT8D-200 चे दोन इंजिन होते. मात्र, एका इंजिनात बिघाड झाल्याने विमानाला उडणं शक्य नव्हतं. त्यामुळे विमानाने आपातकालीन परिस्थितीत रायपूर विमानतळाला उतरण्याची परवानगी मागितली.
रायपूर विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "संध्याकाळी उशिरा कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलने रायपूर विमानतळाला याविषयी माहिती दिली आणि त्यानंतर तात्काळ विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र, लँडिंगच्या आधीच खराब इंजिनाचा एक भाग हवेत पडला. पण, विमान सुरक्षित उतरवण्यात आलं."

फोटो स्रोत, ALOK PRAKASH PUTUL
या विमानातील प्रवाशांसाठी युनायटेड एअरवेजने दुसऱ्या दिवशी विशेष विमानाची व्यवस्था केली. अशाप्रकारे 8 ऑगस्टच्या रात्री सर्व प्रवाशांना रायपूर विमानतळावरून रवाना करण्यात आलं.
विमानाच्या चालक दलाचे सर्व सदस्यही बांगलादेशला रवाना झाले. मात्र, विमान रायपूर विमानतळावरच उभं करण्यात आलं.
लवकरच विमान घेऊन जाण्याची हमी
आपातकालीन परिस्थितीत विमान उतरवल्यानंतर 24 दिवसांनी कंपनीचे अधिकारी रायपूरला गेले. विमानाचं इंजिन बदलण्यासाठी त्यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे अर्ज केला.
त्यानंतर ते सर्व अधिकारीही बांगलादेशला परतले.
रायपूर विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "रायपूरला आलेल्या युनाटेड एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात इंजिनात झालेला बिघाड दुरुस्त करून विमान बांगलादेशला नेण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, हे आश्वासन कधीच पूर्ण झालं नाही."
ऑगस्ट 2015 नंतर युनायटेड एअरवेजला बरेच फोन कॉल आणि ई-मेलही करण्यात आले. मात्र, वेगवेगळ्या परवानग्यांचं कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी रायपूरला येणं टाळलं.
उपलब्ध कागदपत्रांवरून हे स्पष्ट होतं की फेब्रुवारी 2016 मध्ये कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम रायपूरला आली आणि त्यांनी इंजिन बदललं. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी तंत्रज्ञांनी ही टीम बांगलादेशला रवाना झाली.
कंपनी ठप्प
दरम्यान, युनायटेड एअरवेजच्या पायलटने विमानाचं निरीक्षण करत विमान उडण्यासाठी योग्य असल्याचं सांगितलं.
मात्र, पुढे हे प्रकरण बांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरणात अडकलं. त्यामुळे पायलटलाही 28 फेब्रुवारी रोजी रिकाम्या हाती परतावं लागलं.

फोटो स्रोत, ALOK PUTUL
तांत्रिक टीम आणि पायलट बांगलादेशला परतल्यानंतर विमानही लवकरच बांगलादेशला नेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी आशा होती.
मात्र, पायलट बांगलादेशला परतल्यानंतर आठवडाभरातच म्हणजेच 6 मार्च 2016 रोजी युनायटेड एअरवेजने कंपनी बंद केली. अशाप्रकारे 2005 साली कॅप्टन तस्बीरूल अहमद चौधरी यांनी स्थापन केलेल्या या कंपनीची सर्व विमानं जमिनीवर आली.
रायपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी यानंतरही पाठपुरावा सुरूच ठेवला. पण, एव्हाना बरेच महिने होऊनही पार्किंग भाड्याचा एक रुपयाही विमानतळाला मिळाला नाही. त्यात कमी पार्किंग क्षमता असल्याने जागाही गुंतून होती. त्यामुळे अखेर हे बघून विमान पार्किंगमधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
पार्किंगची समस्या
आठ विमानांच्या पार्किंगची क्षमता असणाऱ्या रायपूर विमानतळावर बांगलादेशच्या युनायटेड एअरवेजच्या या विमानाने बरीच मोठी जागा अडवून ठेवली होती.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला आणि अनेक ई-मेल पाठवले. अखेर 20 जुलै 2018 रोजी युनायटेड बांगलादेशचे सहायक व्यवस्थापक इनायत हुसैन रायपूरला गेले. त्यांच्या उपस्थितीत विमानाला रनवेपासून 300 मीटर अंतरावर उभं करण्यात आलं.
रायपूर विमानतळाचे एक अधिकारी सांगतात, "2015 साली हे विमान विमानतळावर उतरलं त्यावेळी आम्ही मनातल्या मनात 320 रुपये प्रति तास या दराने या विमानाच्या पार्किंगच्या भाड्याचा हिशेब करायचो. त्यानंतर महिन्याचा हिशेब जोडू लागलो आणि बघता-बघता वर्षामागून वर्ष गेली. त्यामुळे आता रायपूर विमानतळाला पार्किंग शुल्क मिळेल, असं वाटत नाही आणि 48 दशलक्ष किंमतीच्या या विमानाच्या नशीबातही भंगारात जाणं असल्याचं दिसतंय."
मात्र, डागडुजीनंतर कुठल्याही विमानाला वापरात आणलं जाऊ शकतं, असं विमानन विषयाचे जाणकार राजेश हांडा सांगतात. मात्र, साडे पाच वर्ष उलटून गेली असल्याने डागडुजीसाठी बराच खर्च येईल.
शिवाय, विमान विकलं तरी त्यातून फार पैसे मिळणार नाहीत.
राजेश हांडा सांगतात की इतर विमान कंपन्याच अशी विमानं विकत घेतात. त्या कंपन्या स्वतः डागडुजी करून विमान वापरात काढतात आणि ते शक्य नसल्यास विमानाचे सुटे भाग काढून ते वापरले जातात.
राजेश हांडा म्हणतात, "इतकी वर्ष एखादी कार उभी असेल तर तिची कंडिशन आणि मार्केट व्हॅल्यू यावर जसा परिणाम होतो तसाच विमानावरही होतो. त्यात कोरोनामुळे मार्केटची परिस्थिती बघता विमान कंपनीचं मोठं नुकसान होणार, हे निश्चित."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








