पर्यटकांसाठी इथे सुरू केलंय बोटीवरचं क्वारंटाईन!

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडला भेट देणारे पर्यटक आता त्यांचं दोन आठवड्यांचं सक्तीचं क्वारंटाईन बोटीवर घालवू शकतात.
थायलंडच्या सरकारने हा नवीन उपक्रम आणला आहे. या बोटीवरच्या क्वारंटाईनने थायलंडमधला बुडत चाललेला पर्यटन व्यवसाय सावरता येईल अशी सरकारला आशा आहे.
कोरोना व्हायरसच्या काळात देशातल्या पर्यटन व्यवसायाला जोरदार फटका बसला आहे. या नव्या उपक्रमामुळे थायलंडला 1.8 अब्ज बाख्त (58 दशलक्ष डॉलर्स) इतका महसुल मिळेल असं सरकारला वाटतंय.
याआधी जानेवारी महिन्यात सरकारने पर्यटकांना त्यांचं विलगीकरण गोल्फ कोर्सवर घालवण्याची परवानगी दिली होती.
हा दक्षिण आशियायी देश उत्पन्नासाठी पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे थायलंडला आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध आणावे लागले.
'बोटीवर क्वारंटाईन' या उपक्रमाची घोषणा सोमवार, 8 मार्चला, झाली. यानुसार ज्या पर्यटकांचा कोव्हिड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना बोटीवर किंवा फुकेतजवळ एका छोट्या क्रुझवर क्वारंटाईन होता येईल.
कोरोना व्हायरसच्या काळात इथल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 40,000-50,000 वरून घसरून शेकड्यांवर आली होती.
रंगीत तालीम
यात सहभागी होण्यासाठी बोटींचे अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे. सुमारे 100 नौका यात सहभागी होतील असा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Depa
यात सहभागी होणाऱ्या पर्यटकांना एक छोटा रिस्टबँड घालावा लागणार आहे. हा बँड त्यांच्या शरीराच्या लक्षणांवर नजर ठेवून असेल. या बँडमुळे शरीराचं तापमान, रक्तदाब सतत मोजला जाईल तर बँड घालणाऱ्या व्यक्तीच्या लोकेशनवरही लक्ष असेल.
हे यंत्र 10 किलोमीटरच्या पट्ट्यात समुद्रातूनही माहिती पाठवू शकतं, अशी माहिती थायलंड सरकारने दिली.
थायलंडने गेल्यावर्षी मार्च महिन्यात पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली होती. पण ऑक्टोबर महिन्यापासून त्यांनी आपल्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत.
मागच्या महिन्यात थायलंडच्या पर्यटनमंत्र्यांनी क्वारंटाईनसाठी पर्यटकांना लोकप्रिय ठिकाणं तसंच बीच रिसॉर्टचा पर्याय देण्याची योजना आखल्याचं म्हटलं होतं.
रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्याचा उपक्रम येत्या एप्रिल किंवा मे महिन्यापासून फुकेत, क्राबी आणि चिआंग मई सारख्या लोकप्रिय ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








