प्रिन्स हॅरी-मेगन मर्कल: 'पाखंडी आणि विष पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांमुळे इंग्लंड सोडलं'

प्रिन्स हॅरी, मेगन मर्कल आणि ऑप्रा विन्फ्रे

फोटो स्रोत, CBS

फोटो कॅप्शन, ऑप्रा विन्फ्रे यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांची मुलाखत घेतली.

सनसनाटी प्रसारमाध्यमांनी समाजात आमच्याविरुद्ध पसरवलेला वंशभेद हेच इंग्लंड सोडण्याचं प्रमुख कारण असल्याचं द ड्यूक ऑफ ससेक्स अर्थात प्रिन्स हॅरी यांनी सांगितलं.

प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्कल यांनी प्रसिद्ध मुलाखतकार ऑप्रा विन्फ्रे यांना मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

इंग्लंडमधील टॅब्लॉइड अर्थात सनसनाटी बातम्या देणारी माध्यमं पाखंडी आहेत आणि समाजात विष पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यामुळे भीती आणि नियंत्रणाची भावना निर्माण होते असं हॅरी यांनी सांगितलं.

प्रिन्स ऑफ वेल्स यांना अशी प्रसारमाध्यमं असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागलं. दरम्यान प्रसारमाध्यमं पाखंडी नसून, धनाढ्य आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतो असं द सोसायटी ऑफ एडिटर्सने म्हटलं आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

सोशल मीडियामुळे प्रसारमाध्यमांशी असलेले संबंध टोकाला गेले. शाही राजघराण्याचं स्वत:ची माध्यम यंत्रणा आम्हा दोघांबाबत पसरवल्या जाणाऱ्या खोट्यानाट्या बातम्या थांबवू शकली नाही असं मेगन यांनी सांगितलं.

बहुचर्चित अशा या मुलाखतीत हॅरी आणि मेगन यांच्या आयुष्यातील वैयक्तिक मुद्यांना ऑप्रा यांनी हात घातला. वंशभेद, मानसिक आरोग्य, प्रसारमाध्यमांशी संबंध, बाळाच्या रंगाची चिंता, शाही घराण्यातील अंतर्गत गोष्टी याबद्दल या जोडगोळीने भाष्य केलं.

दोन तासांची ही मुलाखत अमेरिकेसह इंग्लंडमध्ये प्रसारित झाली.

या मुलाखतीत हॅरी-मेगन जोडीने अनेक गोष्टींना वाचा फोडली.

-शाही राजघराण्याचा भाग झाल्यानंतर एकाकी वाटायचं, जगूच नये असं वाटायचं असं मेगन यांनी सांगितलं.

-आमच्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता शाही राजघराण्यातील काही व्यक्तींनी व्यक्त केल्याचं मेगन यांनी स्पष्ट केलं.

-ही चिंता राणी एलिझाबेथ तसंच ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांना नव्हती असं ऑप्रा यांनी स्पष्ट केलं.

-मुलाखतीदरम्यान हॅरी-मेगन दांपत्याने दुसऱ्या मुलासंदर्भात घोषणा केली. आम्हाला मुलगी होणार आहे आणि काही महिन्यांमध्ये मेगनची प्रसूती होईल असं हॅरी यांनी सांगितलं.

-विवाहाचा सार्वजनिक सोहळा रंगण्याआधीच तीन दिवस आमच्या पद्धतीने लग्न केल्याचं हॅरी-मेगन यांनी स्पष्ट केलं.

-माझे वडील आणि भाऊ राजघराण्यात अडकले आहेत अशा शब्दात हॅरी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या स्थितीचं वर्णन केलं.

-गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून राजघराण्याने आमच्याशी असलेले आर्थिक व्यवहार तोडून टाकले. वडिलांनी आमच्याशी फोनवर बोलणं देखील सोडून दिलं.

-भावावर प्रचंड प्रेम आहे, त्याच्याशी आणि वडिलांशी असलेले संबंध सुधारायचे आहेत असं हॅरी यांनी सांगितलं.

-प्रिन्स फिलीप यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलल्याचं मेगन यांनी सांगितलं.

अशा स्वरुपाची मुलाखत देण्याचं धैर्य मेगन-हॅरी यांनी दाखवल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे प्रसारमाध्यम सचिव जेन पेसाकी म्हणाले.

'हॅरी यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली गेली नाही'

हॅरी यांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात पुरेशी काळजी शाही राजघराण्याने घेतली नाही तसंच या दांपत्याच्या मुलाच्या रंगासंदर्भात टिप्पणी केली गेली यावर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भाष्य करणं टाळलं.

राणी एलिझाबेथ यांच्याप्रती आदराची भावना असून, सर्वांना एकत्र राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं जॉन्सन म्हणाले.

शाही राजघराण्याने वंशभेद जोपासला आहे का? यावर बोरिस म्हणाले, शाही राजघराण्यासंदर्भातील खासगी गोष्टींवर पंतप्रधानांनी न बोलणंच इष्ट आहे असं त्यांनी सांगितलं.

मुलाखतीच्या वीस मिनिटांच्या एका भागात ऑप्रा यांनी विचारलं, इंग्लंडमधील वंशभेदामुळेच तुम्ही देश सोडला का? यावर हॅरी म्हणाले-प्रामुख्याने तेच कारण आहे.

प्रिन्स हॅरी, मेगन मर्कल आणि ऑप्रा विन्फ्रे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल

शाही राजघराण्याच्या उपाध्या सोडून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अनेक संपादकांशी चांगले संबंध असलेल्या एकाने प्रसारमाध्यमांना याबाबत काही सांगू नका. ते तुमचं खासगी आयुष्य उद्धवस्त करतील असं सांगितलं होतं.

जानेवारी 2020 मध्ये निधीउभारणीसाठी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान हे संभाषण झाल्याचं हॅरी यांनी सांगितलं. त्याआधी काही महिने मेगन यांनी 'द मेल'विरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. एक खासगी पत्र जाहीर केल्याचं ते प्रकरण होतं. ज्या कारणामुळे मी आईला गमावलं तसंच माझ्या बायकोचं होणार का? अशी भीती मनात आल्याचं हॅरी यांनी सांगितलं.

इंग्लंडमधलं वातावरण पाखंडी आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावर हॅरी म्हणाले, इंग्लंडमधलं वातावरण नव्हे, इंग्लंडमधली प्रसारमाध्यमं पाखंडी आहेत.

बातमीचा स्रोत विकला गेलेला किंवा वंशभेदी असेल तसंच पूर्वग्रहदूषित असेल तर समाजात तेच पसरतं असं हॅरी खेदाने म्हणाले.

पाठिंबा नसल्यामुळे शाही राजघराणं, देश सोडला याबाबत राजघराण्यापैकी कुणीही सॉरी म्हटलेलं नाही असं हॅरी यांनी स्पष्ट केलं.

हा आमचा निर्णय आहे त्यामुळे त्याचे परिणामही आम्हीच भोगू. राजघराण्यातून बाहेर पडणं हा अत्यंत अवघड निर्णय होता असं हॅरी म्हणाले.

प्रिन्स विल्यम शाही राजघराणं सोडू शकणार नाही पण मला सोडावं लागेल याची कल्पना असल्याचं हॅरी यांनी सांगितलं.

प्रिन्स हॅरी, मेगन मर्कल आणि ऑप्रा विन्फ्रे

फोटो स्रोत, HARPO PRODUCTIONS/CBS

फोटो कॅप्शन, प्रिन्स हॅरी

विल्यम यांनाही राजघराण्याच्या भूमिकेतून बाहेर पडायचं आहे का या प्रश्नावर हॅरी म्हणाले, मला त्यांच्यावतीने बोलता येणार नाही.

भावासाठी कायमच उपलब्ध असेन असं हॅरी यांनी सांगितलं. प्रिन्स ऑफ वेल्स यांना प्रसारमाध्यमांशी जुळवून घ्यावं लागेल. मात्र आम्ही प्रसारमाध्यमांना समजून घेऊच शकत नाही. सोशल मीडियाने परिस्थिती चिघळवली असं मेगन म्हणाल्या.

कोणताही सबळ पुरावा नसताना प्रसारमाध्यमांवर वंशभेदाचा आरोप करणं चुकीचं असल्याचं द सोसायटी ऑफ एडिटर्स यांनी म्हटलं आहे.

प्रिन्स हॅरी, मेगन मर्कल आणि ऑप्रा विन्फ्रे

फोटो स्रोत, KARWAI TANG

फोटो कॅप्शन, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल

इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी श्रीमंत तसंच सत्ताधारी लोकांना जाब विचारला आहे. काही वेळेस प्रश्न विचित्र किंवा अवघडून टाकणारे असू शकतात पण सगळीच प्रसारमाध्यमं वंशभेदी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही.

मुलाखतीचा काही भाग प्रसारित करण्यात आला नाही. त्यामध्येही हॅरी आणि मेगन यांनी अनेक रहस्यं उलगडली.

शाही राजघराण्यातील महत्त्वाच्या पदी असल्यानंतर तुम्हाला सल्ला देणारे खूप असतात. मात्र काही सल्ले अतिशयच खराब होते असं हॅरी यांनी सांगितलं.

डचेस ऑफ केंब्रिज यांना प्रिन्स विल्यम यांच्याशी विवाहबद्ध होण्यापूर्वी खवचट उपरोधिक गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. कठोर टीका आणि वंशभेद यात फरक असतो. प्रसारमाध्यमं त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात. जेव्हा त्यांना ठाऊक असतं की छापल्या गेलेल्या, प्रसारित झालेल्या बातमीत काहीच तथ्य नाही.

माझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट जगाला ओरडून सांगण्याचं वेड त्यांना लागलं होतं. माझ्या पालकांना याचा त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं मेगन यांनी ऑप्रा यांना सांगितलं.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)