राजघराण्यात नव्या बाळाच्या जन्मामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल?

रॉयल बेबी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रिबेका मार्सटन
    • Role, बीबीसी, व्यापार प्रतिनिधी

ब्रिटनच्या राजघराण्यामध्ये तिसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. त्याच्या जन्मामुळे ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण आहे असं वाटत आहे. 'रॉयल बेबी'च्या आगमनामुळं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांचा आत्मविश्वास ढासळलेला दिसत आहे. महागाई वाढीच्या तुलनेत वेतनात वाढ होत नसल्याचं चित्र ब्रिटनमध्ये असल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

लोकांचं पैसे खर्च करण्याचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे दुकानदारांना आपली दुकानं बंद करावी लागली आहेत. या बाळाच्या जन्मामुळे ब्रिटनचे नागरिक आपलं खर्चाचं प्रमाण वाढवतील का?

या विषयी तज्ज्ञांचं एकमत नाही. पण एक अशी संस्था आहे जी याबाबत पैज लावायला देखील तयार आहे.

व्हीडिओ कॅप्शन, राजघराण्यातल्या नव्या पाहुण्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल?

बाळाच्या जन्मामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत किमान 50 दशलक्ष पाउंडनं (अंदाजे 462 कोटी रुपये) भर पडू शकते असं ब्रॅंड फायनान्स या कन्सल्टंसी फर्मचं म्हणणं आहे.

"या बाळाच्या जन्मामुळे ब्रिटिश उत्पादकांना आणि दुकानदारांना त्यांच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्याची उत्तम संधी आहे. आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये रॉयल बेबीचा संदर्भ ते देऊ शकतात. त्यामुळं विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे," असं मत ब्रॅंड फायनान्सचे मुख्याधिकारी डेव्हिड हाइग यांनी व्यक्त केलं आहे.

या बाळाच्या जन्मामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो, असं लहान बाळांशी संबंधित उत्पादनांची विक्री करणाऱ्या JoJo Maman Bebe या रिटेलरचं म्हणणं आहे.

रॉयल बेबीच्या जन्मामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते असं JoJoच्या व्यवस्थापकीय संचालक लॉरा टेनिसन यांचं निरीक्षण आहे.

जेव्हा दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी डचेस ऑफ केंब्रिज गर्भवती होत्या, त्यावेळी त्यांनी जो कोट घातला होता तशा कोटची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती.

रॉयल बेबी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, नव्या रॉयल बेबीमुळे ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लेट यांच्या जन्मानंतर त्यांना जसे कपडे घालण्यात आले होते तशा कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली होती असं मदरकेअर रिटेलरचं म्हणणं आहे. या खास कलेक्शनला हेरिटेज कलेक्शन म्हटलं जातं.

"बाळाच्या जन्मामुळे थोड्याफार प्रमाणात कपड्यांची विक्री होते हे जरी खरं असलं तरी यूकेच्या समग्र अर्थव्यवस्थेवर त्याचा काही परिणाम होतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही," असं मत Investecचे मुख्य अर्थतज्ज्ञ फीलिप शॉ यांनी व्यक्त केलं आहे.

राजघराण्यातील बाळाच्या आगमनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असा काही ऐतिहासिक दाखला नाही. या वेळी तर लोकांच्या हातात खेळता पैसाच नसल्यामुळे अर्थव्यवस्थेला काही फायदा होईल, असं दिसत नसल्याचं ते सांगतात.

जर त्यांनी खर्च केला तर काय फरक पडेल?

जर लोक पैसे खर्च करू लागले तर बाळाशी संबंधित वस्तुंच्या विक्रीत वाढ होईल असं ब्रॅंड फायनान्सचं म्हणणं आहे. भेटवस्तू, संग्रही ठेवण्यासारखी नाणी, अन्न आणि बाळाशी संबंधित वस्तुंची विक्री होईल असं भाकीत केलं जात आहे.

टाउन क्रायर

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, बाळाच्या जन्माची घोषणा पारंपरिक पद्धतीनं करण्यात आली

बाळाचा जन्म तसंच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं होणारं लग्न या दोन घटनांमुळे राजघराणं चर्चेत राहणार आहे. यामुळे राजघराण्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल, असं शॉ यांना वाटतं.

त्यांच्या लग्नामुळे पर्यटनात वाढ होईल असा देखील एक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे फ्लाइट बुकिंग, हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रांना फायदा होऊ शकतो असं ते म्हणतात.

राजघराण्यातल्या बाळाच्या जन्माचं कौतुक कमी होत आहे का?

ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिजचं हे तिसरं बाळ आहे. तसंच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच लग्न लवकरच होणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मामुळे होणारा व्यावसायिक परिणाम झाकोळला जाण्याची शक्यता आहे.

डचेस ऑफ केंब्रिज

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, बाळाच्या जन्माची बातमी ऐकताच इंग्लंडमध्ये जल्लोष करण्यात आला.

त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी 75 दशलक्ष पाऊंड आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी 100 दशलक्ष पाऊंड इतकी उलाढाल वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यावेळी हे अनुमान 50 दशलक्ष पाऊंड इतकं आहे.

हा परिणाम किती दिवस राहू शकेल?

"आम्हाला तर असं वाटतं की तो तसाच राहावा. आम्ही अमेरिकेमध्ये स्टोअर उघडण्याचा विचार करत आहोत. तिथं देखील याच विषयी चर्चा सुरू आहे. राजघराण्यात होणाऱ्या घटनांचा परिणाम अप्रत्यक्षरित्या कायमच राहतो," असं, JoJoच्या टेनिसन यांचं म्हणणं आहे.

"राजघराण्यामुळे दरवर्षी अर्थव्यवस्थेमध्ये भर पडते. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1 अब्ज पाउंडची भर पडू शकते," असा अंदाज हाइग यांच्या कन्सल्टंसीने व्यक्त केला आहे. तर ब्रॅंड फायनान्सचं म्हणणं आहे या लग्नामुळं 1.8 अब्ज पाऊंडांची भर पडू शकते.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)