भीमा कोरेगाव : 'पूजाने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय!'

फोटो स्रोत, SAGAR KASAR
- Author, सागर कासार आणि निरंजन छानवाल
- Role, बीबीसी मराठी
"पूजा अभ्यासात हुशार होती. दहावीत तिला 65 टक्के मार्क मिळाले होते. नुकतीच तिने कला शाखेतून अकरावीची परीक्षाही दिली होती आणि पुढे चालून तिला सरकारी खात्यात नोकरी करायची फार इच्छा होती," असं दिलीप सकट भरभरून सांगत होते.
पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार होती पूजा सकट. रविवारी तिचा मृतदेह जवळच्याच शेतातील विहिरीत आढळला!
1 जानेवारीच्या दंगलीत वडगाव ठाणचे रहिवासी सुरेश सकट यांच्या घराचं नुकसान करण्यात आलं होतं. आपलं घर जाळलं जात असताना सकट यांची मुलगी पूजा आणि मुलगा जयदीप तिथं उपस्थित होते.
ही जाळपोळ या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. म्हणून त्यावेळी या दोघांना जमावाने मारहाणही केली होती. त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या जमावाविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली.
"तेव्हापासून सातत्याने त्यांना धमक्या मिळत होत्या. दोघेजण नेहमी दहशतीखाली वावरायचे," पूजाचे चुलते दिलीप सकट सांगतात.
'पण ती परत आलीच नाही!'
"नेहमीप्रमाणं शनिवारी सकाळी सर्वांशी गप्पा मारल्या. दुपारच्या वेळेस घरातून खाली गेली. पण पुन्हा परत आलीच नाही. तिचा आम्ही खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती सापडली नाही," दिलीप सकट सांगतात.
त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली, स्वतः खूप शोधाशोध केली. पण काही हाती लागलं नाही.
अखेर शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या पूजाचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत रविवारी सकाळी सापडला.

फोटो स्रोत, SAGAR KASAR
भीमा कोरेगावच्या दंगलीत सकट कुटुंबीयाचं घर जाळण्यात आलं होतं. या धक्क्यातून सकट कुटुंब सावरत असतानाच रविवारी सकाळी ही बातमी आली. त्यानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
"दंगलीच्या वेळी घर जाळले जात असताना जयदीप आणि पूजा हे प्रत्यक्षदर्शी होते. ती साक्षीदार असल्यानेच तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला," असा आरोप दिलीप सकट करतात. "तिने आत्महत्या केली नाही. तिचा खून करण्यात आली आहे!"
'सरकारी नोकरी करायची होती!'
"सर्वांशी हसतखेळत वागणाऱ्या पूजाला सरकारी नोकरी करायची होती. ते तिचं स्वप्न होतं. आता ते स्वप्नचं राहीलं," तिच्या आठवणींना उजाळा देत असताना दिलीप सकट यांना रडू कोसळलं.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वडील सुरेश सकट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

फोटो स्रोत, SAGAR KASAR
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. याप्रकरणी दिलीप सकट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अॅड. सुधीर ढमढेरे, विलास वेदपाठक, गणेश वेदपाठक, नवनाथ दरेकर, सोमनाथ दरेकर, विलास दरेकर, सुभाष घावटे, गोरक्ष थोरात, गणेश थोरात यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना अटकही केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








