सचिन तेंडुलकरला सकाळी पावणे सहाला कुणाचा फोन यायचा? कधी न ऐकलेले 10 किस्से

असं म्हणतात की ज्यांच्यासाठी क्रिकेट हा धर्म आहे, त्यांचा सचिन तेंडुलकर हा देव होय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, असं म्हणतात की ज्यांच्यासाठी क्रिकेट हा धर्म आहे, त्यांचा सचिन तेंडुलकर हा देव होय.
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

(क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) वाढदिवस. त्यानिमित्तानं हा लेख पुन्हा शेयर करत आहोत.)

सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याला आता 9 वर्षं होत आली. पण क्रिकेटप्रेमींच्या मनातली त्याची जादू अजूनही ओसरलेली नाही. जगभरात चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

सचिनला घडताना ज्यांनी जवळून पाहिलं आणि त्याच्या घडण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा मुंबईकर क्रिकेटर्सना आम्ही सचिनविषयी बोलतं केलं.

वयाच्या 14व्या वर्षी भारतीय नेट्समध्ये सचिनला बॅटिंगची संधी देणारे वासू परांजपे, त्याचे पहिले मुंबई रणजी कॅप्टन दिलिप वेंगसरकर, सचिनची इनिंग अन् इनिंग बारकाव्यानिशी टिपून ठेवणारे सुधीर वैद्य आणि BCCIचे माजी मीडिया मॅनेजर देवेंद्र प्रभूदेसाई यांनी सचिनबद्दलचे जे काही मजेदार किस्से सांगितले, ते आजवर कदाचित आपण कधीच ऐकले नसतील.

1. 300 रन, वर फास्ट आणि स्पिन मिळून 40 ओव्हर, आणि मग नेट्स

सचिनची विनोद कांबळीबरोबरची 662 रन्सची विक्रमी भागीदारी कुणाला माहीत नाही? एकीकडे ती मॅच सुरू होती तेव्हाच मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात या दोन मुलांची चर्चा सुरू झालेली होती. दिलिप वेंगसरकर तेव्हा मुंबई रणजी टीमचे कॅप्टन होते. माजी कॅप्टन वासू परांजपे त्यांना आझाद मैदानावर ती मॅच बघायला घेऊन गेले. वेंगसरकर यांची जिमखाना मॅच सुरू होती. पण परांजपे यांनी ती मॅच सोडून त्यांना सचिनची बॅटिंग बघण्याची गळ घातली.

दोघं पोहोचले तोपर्यंत सचिनच्या शाळेची, शारदाश्रमची बॅटिंग संपलेली होती. सचिनने दोन दिवस खेळून 326 रन केले होते. वेंगसरकर यांनी जमलेल्या लोकांकडे सचिनची चौकशी केली. तर तिथल्या फिरत्या अन्न विक्रेत्यांनी त्यांना उत्तर दिलं, "सचिन-विनोदची बॅटिंग संपली. त्यानंतर सचिनने दहा ओव्हर ओपनिंग बॉलर म्हणून बॉलिंग केली आहे. पण तुम्ही थांबा. आता तो स्पिन टाकेल."

म्हणजे आधी दोन दिवस बॅटिंग, मग फास्ट आणि स्पिन मिळून 40 ओव्हर्सची बॉलिंग. आणि मॅचच्या पूर्वी आणि नंतर आचरेकर सरांच्या शिस्तीप्रमाणे नेट्स, असा 14 वर्षांच्या सचिनचा त्या टेस्ट दरम्यानचा कार्यक्रम होता.

2. 15 वर्षांच्या सचिनला भारतीय टीममध्ये घेतलं नाही कारण...

कांबळीसोबतच्या रेकॉर्डमुळे अजरामर झालेल्या या मॅचनंतर काही दिवसांनी वासू परांजपे यांनी दिलिप वेंगसरकर यांना आणखी एक आग्रह केला - 15 वर्षांच्या सचिनला भारतीय राष्ट्रीय टीमच्या नेट्समध्ये सराव करू देण्याचा.

1990 मध्ये ओल्ड ट्रॅफर्डमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एका टेस्ट मॅचमध्ये सचिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1990 मध्ये ओल्ड ट्रॅफर्डमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एका टेस्ट मॅचमध्ये सचिन

टीम मुंबईतच होती. कपिल देव आणि चेतन शर्मासमोर सचिनच्या हातात बॅट देण्याचं वेंगसरकर यांच्या जिवावर आलं होतं. पण परांजपे त्यांचे जुने कॅप्टन. म्हणून ते नाकारू शकले नाहीत. शेवटी ब्रेबॉर्न स्टेडिअमवर भारतीय नेट्समध्ये खेळण्याची सचिनला संधी मिळाली. सचिनने आपली छाप पाडली, हे वेगळं सांगायला नको.

छापही अशी पाडली की भारतीय टीममध्ये निवडीसाठी 15व्या वर्षीच त्याच्या नावाची चर्चा झाली. तेव्हा निवड समितीचे प्रमुख असलेले नरेन ताम्हणे या बैठकीत म्हणाले, 'सचिनला या वयात कुठे बॉल लागला तर खूप टीका होईल आणि मीडियाचं ऐकून घ्यावं लागेल.'

म्हणून मग सचिनला आधी रणजीत खेळवण्यावर एकमत झालं. दिलिप वेंगसरकर यांनी हा किस्सा ऐकवला.

3. 'मी खेळलो असतो'

पुढच्याच हंगामात अजित वाडेकर निवड समितीचे अध्यक्ष असताना सचिनची मुंबई रणजी टीममध्ये निवड झाली. रणजी, दुलिप आणि इराणी अशा तीनही स्थानिक स्पर्धांमध्ये सचिनने पदार्पणातच सेंच्युरी ठोकली. पण हैद्राबादमधल्या एका मॅचबद्दल वेंगसरकरांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

सचिनची दुसरीच मॅच, तीही मुंबईबाहेर. मुंबईची बॅटिंग सुरू असताना दिवसाअखेरच्या काही ओव्हर बाकी होत्या. वेंगसरकर पिचवर होते. त्यांनी मुद्दाम पाणी मागवलं, आणि त्या वेळेत ड्रेसिंग रूममध्ये निरोप धाडला - "विकेट गेली तर किरण मोकाशीला पाठवा. लहानग्या सचिनला नको. शेवटच्या तीन-चार ओव्हर खेळण्याचा कदाचित त्याच्यावर ताण येईल. त्यापेक्षा त्याला उद्या खेळू दे."

पूर्ण वेळचा बॅट्समन नसलेल्या मोकाशी यांना आपल्या आधी पाठवलं, हे सचिनच्या लक्षात आलं. त्याने तेव्हाचा मुंबई टीमचा फास्ट बॉलर राजू कुलकर्णीकडे नाराजी बोलून दाखवली - "मी पॅड बांधून तयार होतो. बॅट्समन नसताना मोकाशीला वर पाठवलं. मी बॅटिंग केली असती," असं सचिनचं म्हणणं होतं. पण...

4. सचिनला पहाटे पावणेसहाला कुणाचा फोन यायचा

यानंतर यशावकाश सचिन तेंडुलकरने भारतीय टीममध्ये प्रवेश केला.

पाकिस्ताननंतर वेळ आली न्यूझीलंड दौऱ्याची. सचिन वयाने सगळ्यांत लहान, म्हणून सगळेच त्याला जपत होते. संजय मांजरेकर त्याचे रूम पार्टनर होते. दोघं मुंबई टीममध्ये एकत्र खेळायचे, म्हणून ही सोय.

लॉर्ड्सवरच्या एका कसोटी सामन्यात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉर्ड्सवरच्या एका कसोटी सामन्यात

संजय मांजरेकर यांनी दुसऱ्याच दिवशी कॅप्टन वेंगसरकर यांच्याकडे तक्रार केली - 'सचिनला पहाटे पावणेसहाला कुणाचा तरी फोन येतो. सचिन झोपलेला असतो. आणि मला फोनही घ्यावा लागतो, आणि फोनच्या आवाजाने न उठणाऱ्या सचिनना उठवावं लागतं.'

फोन कुणाचा असतो तर सचिनचा मोठा भाऊ आणि क्रिकेटमधला त्याचा मेंटॉर अजित तेंडुलकर यांचा. सचिन आणि अजित यांचं नातं तेव्हाही सगळ्यांना ठाऊक होतं. त्यामुळे वेंगसरकर यांनाही कुतूहल वाटलं.

त्यांनी विचारलं की अजित सचिनशी काय बोलतो. खूप चौकशीनंतरही एवढंच कळलं - 'समोरून अजित बोलत असतो आणि सचिन उत्तर देताना 'हू हू' करत असतो.'

पण वेंगसरकरांनी असंही नमूद केलं की एकूणच सचिन कधीच उलट उत्तर देत नाही. आणि कायमच त्याने आपल्या कॅप्टन आणि सीनिअर्सचं ऐकलं.

5. सचिनचा वीक पॉइंट - बॅट

बॅट हे तर बॅट्समनचं शस्त्र. सचिनचा खेळ असा आक्रमक की त्याने एका मुलाखतीत म्हटलंय, "मी कुठला बॉल खेळायचा किंवा सोडायचा हे मी ठरवणार. बोलर नाही हे ठरवू शकत."

ड्वेन ब्राव्होची बॅट त्याचा आवडता विषय आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ड्वेन ब्राव्होची बॅट त्याचा आवडता विषय आहे.

सचिनचं बॅटवर प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण किती असावं? तर आताही मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्येही तो आला तर सगळ्यांशी गप्पा मारण्याबरोबरच तो खेळाडूंच्या बॅट बघतो. एखादी इनिंग आवडली तर ती खेळताना वापरलेली बॅट तो आवर्जून हाताळतो.

ड्वेन ब्राव्होची बॅट त्याचा आवडता विषय आहे. बॅटकडे एकवार बघून बॅट्समनने किती वेळ मैदानावर घालवलाय, कुठले शॉट लगावले आहेत, अशी माहिती सचिन देऊ शकतो, असं BCCIचे माजी मीडिया मॅनेजर देवेंद्र प्रभूदेसाई यांनी सांगितलं.

6. खंबीर, धीरगंभीर सचिन

प्रभूदेसाईंनी आणखी एक गंभीर किस्सा सांगितला, तो 2003च्या वर्ल्ड कपमधला. भारतीय टीम ऑस्ट्रेलियाकडून प्राथमिक फेरीत पराभूत झाली तेव्हा मीडियाने टीमला व्हिलन ठरवलं. खेळाडूंच्या प्रतिमा भारतात जाळण्यात आल्या. तेव्हा टीमही दक्षिण आफ्रिकेत व्यथित होती. पुढची मॅच झिंबाब्वेबरोबर होती. पण वातावरण तापलेलं होतं. खेळाडू घाबरलेलेही होते.

अशा वेळी मॅच आधीच्या प्रेस काँफरन्ससाठी टीममधला सगळ्यांत सीनिअर खेळाडू अवतरला. तो अर्थातच होता सचिन रमेश तेंडुलकर. तो तेव्हा कॅप्टनही नव्हता किंवा व्हाईस कॅप्टनही नव्हता. पण तो चवताळलेल्या मीडियाला सामोरा गेला.

धीरगंभीरपणे त्याने हातात लिहून आणलेलं निवेदन वाचून दाखवलं. तीन ओळींचं ते निवेदन होतं. "टीम म्हणून आम्ही स्वत:च खूप दु:खी आहोत. तुम्हाला आम्ही पोहोचवलेल्या दु:खाची आम्हाला कल्पना आहे. टीमच्या वतीने इतकंच सांगतो, शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही लढत राहू."

2003 विश्वकपच्या वेळी त्याने धीरगंभीरपणे परिस्थिती हाताळली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2003 वर्ल्डकपच्या वेळी त्याने धीरगंभीरपणे परिस्थिती हाताळली.

ही तीन वाक्यं इतकी परिणामकारक होती, की माध्यमं पुढं काहीच बोलू शकली नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आली आणि सुदैवाने पुढे भारतीय टीमने फायनल पर्यंत मजल मारली.

म्हणूनच देवेंद्र प्रभूदेसाई म्हणतात, "सचिननं औपचारिकपणे दोन वर्षं टीमचं नेतृत्व केलं. पण अनौपचारिकपणे तो 22 वर्षं टीमला दिशा देत होता."

7. एक हुकलेला रेकॉर्ड

सुधीर वैद्य हे भारताचे सगळ्यांत ज्येष्ठ क्रिकेट स्टॅटिस्टिशिअन आहेत. त्यांच्या मते सचिनच्या नावावर बॅटिंगचे जवळपास सगळे रेकॉर्ड आहेत. 100 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत, सगळ्यांत जास्त टेस्ट रन आहेत. पण सर्वांत जास्त अॅव्हरेजचा रेकॉर्ड मात्र हुकला.

सचिन खेळत असताना टेस्ट अॅव्हरेजमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा अव्वल होता. त्याचं अॅव्हरेज होतं 57.40, तर दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसही सचिनच्या पुढे होता, ज्याचं निवृत्तीच्या वेळी अॅव्हरेज होतं 57.37 आणि सचिनचं अॅव्हरेज राहिलं ते 53.78 रनवर.

8. सलग 84 टेस्ट मॅच

जागतिक स्तरावर सर डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर सचिन असा एकमेव खेळाडू ठरला ज्याला कधी टीममधून डच्चू मिळाला नाही. शिवाय सुरुवातीच्या काळात त्याचा फिटनेसही असा चोख की 1989मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या टेस्टनंतर तो सलग 84 टेस्ट दुखापतीशिवाय खेळला. कालावधी सांगायचा झाला तर 12 वर्षांचा काळ तो सलग खेळत होता. 2001मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या टेस्टमध्ये त्याचा पायाची टाच दुखावली.

9. असाही एक विक्रम

मुंबईच्या शिवाजी पार्कवर ब्रिटन राजघरण्याच्या डचेस यांच्यासोबत क्रिकेट खेळताना सचिन. मागे दिलिप वेंगसरकर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईच्या शिवाजी पार्कवर ब्रिटन राजघरण्याच्या डचेस ऑफ केंब्रिज यांच्यासोबत क्रिकेट खेळताना सचिन. मागे दिलिप वेंगसरकर.

सचिनच्या नावावर जसा शंभर सेंच्युरीचा रेकॉर्ड आहे, तसंच सर्वाधिक सेंच्युरी हुकल्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे, ही रंजक बाब वैद्य यांनी सांगितली.

सचिनने 96 अर्धशतकं केली आहेत. आणि तो खरंच 'नर्व्हस नाइन्टीस'चा बळी ठरायचा. सर्वाधिक 18वेळा सचिन 90 ते 99 च्या दरम्यान आऊट झाला आहे. त्यातही 99 रनवर तर तो तीनदा आऊट झाला आहे. हा ही आपल्या विक्रमवीराचा एक रेकॉर्डच आहे.

10. सचिनचा पोस्टल स्टँप

सचिनच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या दिवशी भारतीय टपाल खात्याने त्याच्या सन्मानार्थ त्याचे फोटो असलेले पोस्टल स्टँप काढले होते.

जिवंतपणीच स्टँपवर झळकण्याचा हा एक दुर्मीळ सन्मानच होता, असं सुधीर वैद्य यांनी सांगितलं. यापूर्वी मदर थेरेसा, राजीव गांधी आणि धोंडो केशव कर्वे या व्यक्तींचा स्टँप त्यांच्या जिवंतपणी काढण्यात आला होता.

हे वाचलं का?