प्रेयसीच्या सततच्या मारहाणीमुळे तो गेला रुग्णालयात आणि ती खडी फोडायला

फोटो स्रोत, SBNA
पार्टनरनं शारीरिक छळ केल्यामुळे "मी मृत्यूच्या अगदी जवळ होतो," असं वक्तव्य इंग्लंडमध्ये बेडफोर्डशायर इथं घरकाम करणाऱ्या एका पुरुषानं केलं आहे. आश्चर्य वाटलं ना?
अॅलेक्स स्किल हा 22 वर्षांचा मुलाचा जॉर्डन वर्थ या 22 वर्षींय पार्टनरनं अनेकदा शारीरिक छळ केला. त्यामुळे अॅलेक्सला गंभीर दुखापती झाल्या. जॉर्डन वर्थनं त्याला खायला दिलं नाही आणि त्याच्या कुटुंबीयांपासून त्याला वेगळं केलं, असा आरोप त्यानं केला आहे.
सतत हक्क गाजवून शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली तिला साडेसात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान अशा प्रकारचा छळ झालेल्या इतर व्यक्तींनी समोर यावं असं आवाहन त्यानं केलं आहे.
बेडफोर्डशायरमध्ये एखाद्या महिलेला अशा गुन्ह्यासाठी शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.
छळानं गाठली होती परिसीमा
अॅलेक्स आणि जॉर्डन दोघंही 16 वर्षांचे असताना पहिल्यांदा भेटल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
सुरुवातीपासूनच जॉर्डन त्याच्यावर हक्क गाजवायची. अगदी काय कपडे घालायचे हेसुद्धा सांगायची. त्याला मारहाण करायची.

फोटो स्रोत, SBNA
मागच्या नऊ महिन्यांत या मारहाणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. इतकं की या मारहाणीमुळे त्याला अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं.
मागच्या जून महिन्यात त्यांच्या घरून किंचाळण्याचे आवाज आले तेव्हा शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अॅलेक्सला रुग्णालयात घेऊन जाताना अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या हातावरच्या जखमा दिसल्या. त्याच्या दंडावर आणि पायावर जळल्याच्या खुणा दिसल्या. त्या जखमांवर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात आली होती.
जॉर्डननं त्याच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं होतं. त्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्या जखमांवर उपचार करू दिले गेले नव्हते, असं अॅलेक्सनं सांगितलं.
त्यावेळी "मी मृत्यच्या अगदी जवळ आहे," असं रुग्णालयानं कळवलं होतं.

फोटो स्रोत, SBNA
कुटुंबाशी संपर्क करता येऊ नये म्हणून त्याचा मोबाईलसुद्धा फोडण्यात आला होता.
एकदा जॉर्डनच्या आईला अॅलेक्सचे आजोबा वारले असा मेसेज आलाय असं जॉर्डननं खोटंच त्याला सांगितलं. ते ऐकून अॅलेक्स रडायला लागला. दोन तास रडल्यावर मग जॉर्डननं हा सगळा प्रकार खोटा असल्याचं सांगितलं.
एकदा तो झोपला असताना तिनं त्याच्या डोक्यावर बीअरची बाटली मारली. नंतर त्याचा पाठलाग करत हातोडीनं त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर प्रहार केले.
या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य चौकशी अधिकारी जेरी वॅट म्हणाले, "हक्क गाजवण्याची सीमारेषा धूसर असते. पीडित व्यक्तीला हा अत्याचार आहे हे कळायला वेळ लागतो आणि त्याचंच पर्यावसान हिंसाचारात होतं. त्यामुळे वेळेवरच याबद्दल बोलणं कधीही चांगलं."
सध्या जॉर्डनवर अलेक्सशी संपर्क साधण्यास अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








