मेगन मार्कल यांचा ब्रिटिश राजघराण्यावर 'खोटेपणा' केल्याचा आरोप

फोटो स्रोत, Getty Images
प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मार्कल यांनी एका मुलाखतीत ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
डचेस ऑफ ससेक्सने म्हटले आहे की, बकिंगहॅम पॅलेस जर 'आमच्याबद्दल खोटं बोलत असेल' तर त्या आणि प्रिन्स हॅरी गप्प बसतील अशी अपेक्षा ते करू शकत नाहीत.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ओप्रा विन्फ्रे यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली आहेत. यावेळी मेगन यांना विचारण्यात आलं की, "तू तुझे सत्य सांग? असे विचारल्यावर कसे वाटले?"
मेगन यांनी असंही म्हटलं की, "आम्हाला यामुळे गोष्टी गमावण्याचा धोका असेल तर तसंही आम्ही आधीच खूप काही गमावले आहे."
मेगन यांच्यावर रॉयल कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचा आरोप असून त्याबाबत राजघराण्याकडून पडताळणी केली जात आहे.
मेगन यांची ही मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. ही मुलाखत रविवारी अमेरिकेत आणि सोमवारी यूकेमध्ये प्रसारित होणार आहे.

फोटो स्रोत, Harpo Productions/Joe Pugliese
ही मुलाखत राजघराण्यातील वरिष्ठ रॉयल पदाचा त्याग करण्यापूर्वी हॅरी आणि मेगन यांच्या आयुष्यातील अल्प कालावधीचा तपशील देईल अशी अपेक्षा आहे.
सीबीएसने प्रसिद्ध केलेल्या 30 सेकंदांच्या टीझर क्लिपमध्ये विन्फ्रे डचेसना विचारते, "तुम्ही तुमचे सत्य मांडत असताना आज राजघराण्याला काय वाटत असेल?"
मेगन यांनी उत्तर देताना म्हटलं, "आमच्याबाबत सतत खोटं बोललं जात असेल तर आम्ही आताही शांत राहू ही अपेक्षा ते कसं करू शकतात मला माहिती नाही."
ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स ही मानाची उपाधी मिळालेल्या जोडप्याने मार्च 2020 मध्ये वरिष्ठ रॉयल पदांचा त्याग केला होता. आता ते कॅलिफॉर्नियामध्ये राहतात.
बुधवारी टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, राजघराण्यात काम करत असताना डचेस मेगन यांना तक्रारींना सामोरं जावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या बातमीनुसार, ही घटना ऑक्टोबर 2018 साली घडली जेव्हा ड्यूक आणि डचेस त्यांच्या लग्नानंतर केन्सिंग्टन पॅलेसमध्ये राहत होते.
वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका कर्मचाऱ्याने पाठवलेल्या लीक ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, मेगन यांनी दोन स्वीय सहाय्यकांना घराबाहेर काढले. तंसच इतर कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास कमी केल्याचा दावाही बातमीत करण्यात आला आहे.
याबाबत बकिंगहॅम पॅलेसने आपल्या निवेदनात म्हटलं, "टाईम्समध्ये करण्यात आलेल्या आरोपांची आम्हाला काळजी वाटते. आमचं मनुष्यबळ विभाग याप्रकरणाची दखल घईल."
"राजघराण्याचं परंपरागत कामाचं धोरण आहे आणि कामाच्या ठिकाणी दादागिरी किंवा छळ खपवून घेणार नाही," असंही बकिंगहॅम पॅलेसने म्हटलंय.
प्रिन्स हॅरी आणि मेगन आपली टीका ब्रिटिश प्रसार माध्यमांपुरती मर्यादित ठेवणार आहेत असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी पुन्हा विचार करावा."द फर्म" उर्फ रॉयल फॅमिली आणि त्यांचे कर्मचारी स्पष्टपणे त्यांच्या रडारवर आहेत.

फोटो स्रोत, PA
हे थेट मेगन यांच्यावर झालेल्या दादागिरीच्या आरोपांबद्दल नाही तर काही प्रमाणात प्रिन्स हॅरी यांच्याबाबतही आहे.
मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर असे आरोप उघड करण्यात आल्याने राजघराण्यातील काही लोक आपल्याविरोधात असल्याचं हे एक उदाहरण आहे, असं या जोडप्याला वाटतं.
राजघराण्याने नेमके कोणते आरोप केले आहेत याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्याला मुलाखत प्रसिद्ध होण्याची वाट पहावी लागेल.
दादागिरीचा केल्याचा आरोप जोडप्याने स्पष्ट फेटाळला आहे. पण या प्रकरणाची चौकशी राजघराण्याकडून सुरू आहे. पण या संपूर्ण प्रकरणात जोडप्याची बाजू समोर येणार आहे हे स्पष्ट आहे.
चौकशीचा भाग म्हणून राजघराण्यात भूतकाळातील आणि वर्तमानातील कर्मचाऱ्यांना मेगन यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांविषयी बोलण्याची संधी दिली जाणार आहे.
'तिच्या चारित्र्यावर हल्ला'
दादागिरीचे आरोप मेगन आणि प्रिन्स हॅरी यांनी फेटाळून लावले आहेत.
वर्तमानपत्राच्या बातमीसंदर्भात स्पष्टीकरण देताना मेगन यांच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं,
"ज्या व्यक्तीवरच दादागिरी करण्यात आली आहे, त्या व्यक्तीलाच वेदना आणि आघात सहन करावे लागलेत. जी व्यक्ती कायम सहकार्य करण्यास पुढाकार घेत असते अशा व्यक्तीच्या चारित्र्यावर आरोप केल्याने डचेच यांना दु:ख झालं."

फोटो स्रोत, Reuters
"जगभरात करुणा निर्माण करण्यासाठी आपलं काम सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. चांगलं आणि योग्य काम करण्यासाठी कायम एक उदाहरण बनण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिल."
प्रिन्स हॅरी यांनी आधी म्हटलं की, माघार घेण्याचा निर्णय प्रसारमाध्यमांपासून स्वत:चं आणि त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी होता.
राजघरण्याचे कार्यकारी सदस्य म्हणून आपण परत येणार नसल्याची घोषणा जोडप्याने गेल्या महिन्यात केली होती.
मेगन आणि प्रिन्स हॅरी यांची ओप्रा विन्फ्रे यांनी घेतलेली टीव्ही मुलाखत रविवार 7 मार्चला संध्याकाळी अमेरिकेतील सीबीएसवर प्रसारित केली जाईल.
यूकेमध्ये ही मुलाखत सोमवार 8 मार्च रोजी 21:00 जीएमटी आयव्हीव्हीवर प्रदर्शित केली जाईल.

फोटो स्रोत, SUSSEXROYAL/INSTAGRAM
मेगन यांची मुलाखत "शाही विवाह, मातृत्व आणि "तीव्र सार्वजनिक दबावाखाली असलेले जीवन" त्या कशा हाताळत आहेत?" यांसदर्भात असणार आहे असं सीबीएसने स्पष्ट केलं आहे.
त्यानंतर प्रिन्स हॅरी सुद्धा त्यांच्यासोबत मुलाखतीत सहभागी होतील. गेल्यावर्षी अमेरिकेला जाण्याबाबत आणि त्यांच्या भविष्यातील योजनांसंदर्भात ते बोलणार आहेत.
सीबीएसने याआधी प्रसिद्ध केलेल्या एका क्लिपमध्ये दिवंगत डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि मेगन यांच्या वागणुकीत साम्य असल्याचं दाखवलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








