You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आपल्याला ओठ का असतात?
- Author, जेसन जी. गोल्डमन
- Role, बीबीसी
ओठ आपल्या चेहऱ्याच्या पुढच्या बाजूला सतत हलत असतात, हिवाळ्यात ते सुकतात व त्यांना भेगा पडतात, आणि क्वचितप्रसंगी जेवणाचा घास समजून आपले दात आपलेच ओठ चावतात.
या ओठांचा काही उपयोग असतो का? पक्ष्यांना ओठ नसतात, तरीही त्यांचं व्यवस्थित चाललेलं असतं, कासवांचे ओठही टणक होऊन चोचीसारखे होऊन जातात, आणि बहुतांश सस्तन प्राण्यांना ओठ असले, तरी माणसांच्या बाबतीत ओठ कायम बाहेरच्या बाजूला वळलेले असतात, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
पण ओठ तितकेच महत्त्वाचे असतात, खूपच महत्त्वाचे असतात. खालचा ओठ दातात येण्याचा धोका असतो आणि ते खरोखरच दुखू शकतं, तरीही ओठांचं महत्त्व त्याहून जास्त आहे.
जन्मल्यानंतर आपण जी काही पहिली कौशल्यं शिकतो त्यामध्ये ओठांचा वापर करून चोखणं या कौशल्याचा समावेश होतो. किंबहुना आपल्या जगण्यासाठी ओठ इतके मूलभूत महत्त्वाचे आहेत की, त्याला "आदिम प्रतिक्षिप्त क्रिया" असं म्हणतात. आपल्याला जन्मतःच चोखण्याचं ज्ञान असतं, त्यासाठी काही शिकवावं लागत नाही. हे जवळपास सर्वच सस्तन प्राण्यांना लागू होतं.
चोखण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेसोबतच डोकं पुढे नेऊन स्तनपानासाठी सोयीच्या हालचाली करण्याची प्रतिक्षिप्त क्रियाही अशाच आदिम प्रकारात मोडते. तोंड व गाल यांना लागेल त्या गोष्टीकडे चेहरा वळवण्याच्या दृष्टीने ही दुसरी प्रतिक्षिप्त क्रिया उपयोगी असते. नवजात अर्भकाच्या ओठांना कशाचा ओझरता स्पर्श झाला, तरी चोखण्याची प्रतिक्षिप्त क्रिया जागृत होते. नंतर यात जीभ बरंच काम करत असली, तरी बाळाला दूध गिळता यावं यासाठी घट्ट पकड ठेवण्याचं काम ओठ करतात.
म्हणजे स्तनपान असो किंवा बाटलीतून दूध पिणं असो, लहान बालकाचा त्यातील सहभाग निष्क्रिय स्वरूपाचा नसतो. किंबहुने ते बरंचसं संभाषणासारखं असतं. उत्क्रांतीने ठरवल्यानुसार दोन्ही बाजूंनी आपापला सहभाग त्यात घेतला जातो. या कृतीमध्ये ओठांचं स्थान मध्यवर्ती असतं.
माझे ओठ वाचा
इतर अन्न खाणं व बोलणं यांसाठीही अर्थातच ओठ खूप महत्त्वाचे आहेत. भाषाविज्ञानामध्ये ओठांना उच्चारणाच्या अनेक स्थानांपैकी दोन महत्त्वाची स्थानं मानलं जातं किंवा फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा थोपवण्यासाठी तोंड व घसा यांच्यातील ठिकाण म्हणूनही ओठांना महत्त्व असतं.
आपले दोन्ही ओठ एकमेकांना चिकटल्यानंतर आपल्याला प, ब आणि म हे उच्चार करता येतात. फ किंवा व यांसारखे उच्चार करण्यासाठी आपल्याला खालचा ओठ वरच्या दातांपाशी न्यावा लागतो. डब्ल्यू असा उच्चार करण्यासाठी जीभ मागे घेऊन तोंडाच्या आत वरच्या बाजूला लावावी लागते आणि ओठ एकमेकांजवळ आणावे लागतात.
बोलणं किंवा वाचा हा मानवी जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, पण चुंबन घेण्याइतकी मजा बोलण्यात नाही. चुंबन घेणं ही सर्वत्र आढळणारी कृती नसली, तरी सुमारे 90 टक्के संस्कृतींमध्ये चुंबनाला स्थान आहे.
काही संस्कृतींमध्ये चुंबन आश्चर्यकारकरित्या अनुपस्थिती असल्याचं खुद्द डार्विननेही नोंदवलं आहे. "ममत्व दाखवण्यासाठी चुंबन घेण्याची आपल्याला- म्हणजे युरोपीयनांना इतकी सवय झाली आहे की, हे मानवाचं अंगभूत वैशिष्ट्य असल्यासारखं आपल्याला वाटू शकतं, पण तसं काही नाही... न्यूझिलंडर (माओरी), ताहिती, पापुआवासी, ऑस्ट्रेलियन, आफ्रिकेतील सोमाल व इस्क्विमॉक्स (एस्किमो) यांच्यासाठी चुंबनाची कृती अपरिचित आहे," असं डार्विनने 'द एक्सप्रेशन ऑफ इमॉशन इन मॅन अँड अॅनिमल्स' या पुस्तकात लिहिलं आहे.
चुंबन सर्वत्र आढळत नसेल, तरी त्याची मुळं जीवशास्त्रात रुजलेली आहेत आणि त्यात अनुवांशिक प्रेरणा व आत्मसात केलेलं वर्तन या दोन्हींचा संयोग झालेला असावा. इतरही प्रजातींमध्ये चुंबन आढळतं.
भांडण झाल्यानंतर समेट करताना चिम्पान्झी चुंबन घेतात, बोनोबोंमध्येही जिभेने असं करण्याची प्रथा आहे.
'साइन्टिफिक अमेरिकन माइन्ड' या नियतकालिकाच्या 2008 सालच्या अंकामध्ये लेखक चिप वॉल्टर यांनी ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञ डेस्मंड मॉरिस यांचा दाखला देऊन असं प्रतिपादन केलं होतं की, प्रायमेटमध्ये मुलांना अन्न देण्यापूर्वी चावून घेतलं जात असे, या कृतीमधून चुंबनाचा उगम झाला असावा.
उदाहरणार्थ, चिम्पान्झी माता अन्न चावतात आणि गिळण्याआधी स्वतःचे ओठ त्यांच्या बालकांच्या ओठांवर दाबतात, जेणेकरून अन्न बालकांच्या तोंडातही जावं. अशा रितीने ओठ दाबणं एकंदरच चिंतातूरता दूर करण्यासाठीचं साधन ठरलं असावं.
ओठांना मिळणारी उत्तेजना अन्नाशी जोडली गेली आणि अखेरीस ओठांना नुसता स्पर्श करणंही सुखकारक भावना उत्पन्न करणारं ठरलं, असं प्राथमिक अभिजात वर्तनविश्लेषण असू शकतं. शिवाय, ओठांपाशी येऊन संपणाऱ्या नसांची संख्याही प्रचंड असते, त्यामुळे ओठांच्या रूपात अत्यानंदाचा स्त्रोतच आपल्याला उपलब्ध होतो.
तोंडपुजेपणा
ओठांमधील तंतू अत्यंत संवेदनशील असतात. मेंदूतील जो भाग स्पर्श ओळखतो त्याला 'सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्स' असं संबोधतात आणि मेंदूतील 'पोस्टसेंट्रल गायरस' या ठिकाणी वरच्या बाजूला हा भाग असतो.
सर्व शरीरातील स्पर्श संवेदनांवर तिथे प्रक्रिया होते, आणि पोस्टसेंट्रल गायरसमध्ये शरीराच्या प्रत्येक भागातील संवेदनाचा काही वाटा असतो. स्पर्शासाठी किती त्वचा उपलब्ध होते यापेक्षा स्पर्शग्रहणाची घनता किती होती, यावर त्याचा आकार अवलंबून असतो.
उदाहरणार्थ, छातीला व पोटाला स्पर्श झाल्यावर निर्माण होणाऱ्या संवेदनांसाठी काम करणारा पोस्टसेंट्रल गायरसमधील भाग बराच लहान असतो. पण हात व ओठ इथल्या संवेदनांवर प्रक्रिया करणारे भाग बरेच मोठे असतात. आपण जग अनुभवतो त्यात हातांइतकंच ओठांचंही स्थान मध्यवर्ती असतं.
ज्या संस्कृतींमध्ये चुंबन नसतं तिथे "लैंगिक कृतीत सहभागी झालेल्या व्यक्ती संभोगापूर्वी एकमेकांच्या चेहऱ्यांवर फुंकर घालतील, चाटतील, चोखतील किंवा चेहरे एकमेकांवर घासतील, अशा शक्यता आहेत," असं संशोधक गॉर्डन गॅलप म्हणतात. पण तथाकथित 'एस्किमो चुंबन' प्रत्यक्षात नाक घासण्याशी संबंधित असल्याचं आर्क्टिक प्रदेशात सुरुवातीला गेलेल्या शोधप्रवाशांना वाटलं असलं, तरी वस्तुस्थिती तशी नाही.
या चुंबनामध्ये एकमेकांना हुंगलं जातं- गंधाची देवाणघेवाण होते. संभाव्य लैंगिक भागीदाराचा शोध हुंगून घेत असताना आनंददायी भाग म्हणून चुंबनाची कृती उद्भवली असण्याची शक्यता आहे.
अमेरिकी महाविद्यायीन विद्यार्थ्यांसारख्या चुंबनाशी चांगलीच ओळख असलेल्या गटातील चुंबनव्यवहाराचा अभ्यास गॅलप यांनी केला. एखादा साथीदार चांगलं चुंबन घेणारा आहे की नाही, हे महाविद्यालयीन तरुणी चव आणि गंधावरून ठरवत असल्याचं गॅलप व त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं. त्यांच्या संशोधनानुसार, महाविद्यालयीन मुली आधी चुंबन घेतल्याशिवाय पुरुषाशी संभोग करण्याची शक्यता खूपच कमी असते.
माणसांमध्ये खरोखरच फर्मोन्स असतील आणि असतील तरी आपण ते ओळखू शकतो का, हा भाग बाजूला ठेवला, तरी शारीर गंधाची देवाणघेवाण करण्यासाठी ओठांचा उपयोग निश्चितपणे होतो. प्राथमिक स्वच्छतेसारख्या अनेक गोष्टींबद्दल प्रचंड माहिती या कृतीतून मिळते.
गॅलप यांनी केलेल्या दुसऱ्या एका सर्वेक्षणामध्ये त्यांनी सहभागी व्यक्तींना असा प्रश्न विचारला, "तुम्हाला कोणाबद्दल तरी आकर्षण वाटलं, पण पहिल्यांदा चुंबन घेतल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये रस नाही अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली, असं कधी झालंय का?" या सर्वेक्षणातील प्रतिसादक पुरुषांपैकी 59 टक्के जणांनी होकारार्थी उत्तर दिलं, तर 66 टक्के स्त्रियांनी यावर सहमती दर्शवली.
केवळ अमेरिकन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांच्या अभ्यासांना काही स्वाभाविक मर्यादा असल्या, तरी प्राणी-संशोधनातील आंतरसांस्कृतिक माहितीशी व पुराव्याशी या अभ्यासातील निष्कर्षांची सांगड घातली, तर असं म्हणता येईल की, हुंगण्याच्या क्रियेला चुंबन मोठ्या प्रमाणात हातभार लावतं. याची आपल्याला जाणीव असेल किंवा नसेल, तरी चुंबनातून आपण संबंधित व्यक्तीला आपला लैंगिक साथीदार करायचं की नाही याचा अंदाज घेत असतो.
त्यामुळेच कधीतरी फुटणारे ओठ, किंवा अतिसंवेदनशील असलेले ओठ खूप महत्त्वाचे ठरतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)