लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून बायकोसाठी खरेदी केली चंद्रावर जमीन

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, जयपूरहून बीबीसी हिंदीसाठी

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील व्यावसायिक धर्मेंद्र अनीजा यांचं नाव सध्या चर्चेत आहे. त्यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची भेट देण्यासाठी थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

24 डिसेंबरला आपल्या लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मेंद्र यांनी आपल्या पत्नीसाठी चंद्रावर जमीन खरेदी करून भेट दिली.

बीबीसीशी बोलताना धर्मेंद्र अनीजा यांनी म्हटलं, "मी वर्षभरापूर्वीच ठरवलं होतं की, लग्नाच्या पुढच्या वाढदिवसाला पत्नीला चंद्रावर जमीन खरेदी करून भेट द्यायची. अर्थात, हे सरप्राईज देणं इतकं सोपंही नव्हतं. अनेक अडथळे पार करून चंद्रावर जमीन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे."

धर्मेंद्र पुढे सांगतात, की चंद्रावर जमीन खरेदी करणं इतकं सोपं नाहीये, असतं तर कोणीही खरेदी केली असती.

चंद्रावर कुठे खरेदी केली जमीन?

धर्मेंद्र अनीजा यांच्या पत्नी सपना अनीजा सांगतात, "भेट म्हणून चंद्रावर जमीन मिळाल्यामुळे मी इतकी आनंदी झाले होते की, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. जगात मी सगळ्यात नशीबवान स्त्री असेन जिला अशी काही भेट मिळाली आहे."

त्या सांगतात, "तुमचं गिफ्ट ओळखा, असं जेव्हा मला सांगण्यात आलं, तेव्हा मला वाटलं की, एखादी गाडी किंवा दागिना असेल. पण चंद्रावरची जमीन भेट म्हणून मिळेल, असा विचार केला नव्हता."

सपना यांच्या नावे चंद्रावर 14.3 नॉर्थ लॅटिट्यूड, 5.6 ईस्ट लाँजिट्यूड, लेक्ट 20 पार्सल्स 377, 378 आणि 379 वर तीन एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.

कोण आहेत धर्मेंद्र अनीजा?

धर्मेंद्र अनीजा आणि सपना अनीजा अजमेरचेच रहिवासी आहेत. त्यांचं शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण इथेच पूर्ण झालं.

अजमेर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर धर्मेंद्र अनीजा यांनी ब्राझीमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे आई-वडील मात्र अजमेरमध्येच राहतात.

गेल्या दहा महिन्यांपासून मात्र धर्मेंद्र अनीजा हे अजमेरमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांना सात वर्षांची मुलगी रिद्धी आहे.

धर्मेंद्र यांचे वडील रामदयाल अनीजा कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि सपना यांचे वडील गीसुलाल अर्नोडिया निवृत्त बँक मॅनेजर आहेत.

जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया

आपल्याला जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी एक ठराविक प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठीही लांबलचक प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

धर्मेंद्र अनीजा यांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी जवळपास वर्षभरापूर्वी अमेरिकेतील एका फर्ममध्ये अर्ज दाखल केला होता. अर्ज मंजूर झाल्यानंतरही त्यांनी अनेकवेळा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित फर्मसोबत मीटिंग केल्या.

या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेण्यात आली. कागदपत्रांच्या पूर्ततेची लांबलचक प्रक्रिया पार पडली, ज्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला.

धर्मेंद्र अनीजा यांचा दावा आहे की, अनेक बनावट कंपन्या चंद्रावर जमीन मिळवून देण्याचा दावा करतात. मात्र जगात केवळ 'लुना सोसायटी इंटरनॅशनल' ही एकमेव कंपनी आहे, जी चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी अधिकृत आहे.

चंद्रावर खरेदी केलेल्या जमिनीवर शोध लागल्यास रॉयल्टी

चंद्रावर दोन पद्धतीने जमीन उपलब्ध होते. एकामध्ये केवळ एका वर्षासाठी जमिनीचा मालकी हक्क मिळतो.

दुसऱ्या पद्धतीत 49 वर्षांसाठी मालकी हक्क मिळतो. धर्मेंद्र अनीजा सांगतात की, त्यांनी तीन एकर जमीन 49 वर्षांसाठी खरेदी केली आहे. आता ही जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.

जमीन खरेदी करताना केलेल्या करारानुसार, जर धर्मेंद्र यांनी चंद्रावर खरेदी केलेल्या जमिनीत कोणताही शोध लागला, तर त्यांना त्याची रॉयल्टी दिली जाईल.

'चंद्रावर असल्याची भावना'

सपना अनीजा सांगतात, "मला जेव्हा हे सरप्राइज मिळालं, तेव्हा चंद्रावरच उभं राहून कागद घेत असल्यासारखं वाटलं. मी खूप नशीबवान आहे.

लग्नाच्या आठव्या वाढदिवसादिवशी पत्नी सपनाला ही खास भेट देण्यासाठी धर्मेंद्र अनीजांनी विशेष आयोजन केलं होतं.

त्याची जबाबदारी त्यांनी अजमेरमधील 'राशि इंटरटेन्मेंट अँड इव्हेंट्स'कडे सोपविली होती. चंद्रावर खरेदी केलेली जमीन भेट देण्यासाठी चंद्रावर असतं तसंच वातावरण तयार केलं जावं, अशी धर्मेंद्र अनीजांची इच्छा होती.

राशि एन्टरटेन्मेंटचे संचालक कौसिनोक जैन सांगतात, "धर्मेंद्र अनीजा यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला आणि चंद्रावर जमीन खरेदी केल्याचं सांगितलं, तेव्हा मी थक्क झालो. माझा विश्वासच बसला नाही. धर्मेंद्र यांनी मला 17 पानांचे डॉक्युमेंट्स दाखवले. त्यानंतर आम्ही सरप्राइज पार्टीच्या तयारीला लागलो."

ते सांगतात, " कार्यक्रमात चंद्रावर असल्याचा भास व्हावा असं धर्मेंद्र यांना वाटत होतं. त्यासाठी आम्ही खूप तयारी केली.

कार्यक्रमात एलईडी लाइट्सचा वापर करून चार फुटांपर्यंत तरंगणारे ढग, चंद्र आणि चांदण्या बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमात आलेल्या प्रत्येकाला चंद्रावर आल्यासारखं वाटत होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)