You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः उंटांना कोरोना विषाणूच्या शिकाऱ्यांची भीती का वाटत आहे?
- Author, जेकब कशनर
- Role, मार्साबिट, केनिया
माणसांना कोव्हिड-19ची लागण होण्यापूर्वी तो प्राण्यांमध्ये निपजला, असं मानलं जातं. पुढच्या जागतिक साथीबाबतही असंच घडण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
माणसांना लागण होणारे 75 टक्के नवीन आजार प्राण्यांमध्ये निपजलेले असतात, असं 'प्रेडिक्ट' या संस्थेने म्हटलं आहे. संसर्गजन्य आजारांवरील जगभरच्या तज्ज्ञांना एकत्र आणणारी ही अमेरिकन सरकारच्या निधीवर चालणारी संस्था आहे. 'प्रेडिक्ट'मधील वैज्ञानिकांनी 1200 नवीन प्राणिजन्य आजार नमूद केले आहेत. पण अजून आपल्याला माहीत नसलेले सुमारे सात लाख असे प्राणिजन्य आजार असावेत, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
या संदर्भात वैज्ञानिकांनी उंटावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. वैज्ञानिकांना पडलेली ही उंटाची भुरळ खुद्द उंटाला मात्र भयकारक वाटते आहे.
ईशान्य आफ्रिका, आशिया व मध्यपूर्व प्रदेशांमधील माणसं उंटांच्या रूपातील हे लांब मान असलेले, पाठीवर मदार असणारे हे सस्तन प्राणी लाखो वर्षांपासून पाळले जात आहेत. अनेक समाज दूध व मांसासाठी, आणि लग्न व संपत्तीसाठीदेखील उंटांवर अवलंबून असतात.
उंटांचे मालक अनेकदा हे 'संवेदनशील जीव' असल्याचं म्हणतात. पण एखाद्या उंटाच्या रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुई घेऊन त्याच्या जवळ गेलं किंवा नाकातून व गुदाशयातून स्वॅब घेण्यासाठी क्यू-टिप त्याच्या जवळ नेली, की हा प्राणी किती संतापू शकतो याचा अंदाज येतो.
"तो तुम्हाला लाथ मारू शकतो. तुमच्यावर थुंकू शकतो. तुमच्यावर लघवी करू शकतो," असं वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमधील पाळत अधिकारी मिलिसन्ट मिनायो सांगतात. मर्साबित, केनिया इथे उंटांचे व कळप राखणाऱ्यांचे नमुने घेण्यासाठी त्यांनी गेली दोन वर्षं बरेच दिवस खर्च केले आहेत. "अशा वागण्यामुळे उंटांच्या संपर्कात असलेल्या कोणालाही तो संसर्ग होऊ शकतो," असं त्या म्हणतात.
"तो संसर्ग" म्हणजे 'मर्स' अर्थात 'मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम' (मध्यपूर्व श्वसनविकार) हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असून कोव्हिड-19पेक्षा तो किमान 10 टक्के अधिक प्राणघातक असल्याचं सिद्ध झालेलं आहे. सौदी अरेबियामध्ये 2012 साली हा विषाणू आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने 2016 साली "मर्स- कोरोना विषाणूचा 1761 व्यक्तींना संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेतील प्रयोगांद्वारे नमूद केलं होतं, आणि या विषाणूमुळे किमान 629 जणांचा मृत्यू ओढवला."
त्या वर्षाच्या उत्तरार्धात एका रुग्णालयात या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर केवळ उंट पाळणाऱ्यांमध्येच नव्हे, तर इतरही लोकांमध्ये याबद्दल भीती निर्माण झाला.
पण उंट या विषाणूचे वाहक असले, तरी मर्सचा धोका मुख्यत्वे मानवनिर्मित आहे. मानवाने घडवलेल्या हवामानबदलामुळे दुष्काळांची वारंवारता वाढलेली आहे, दुष्काळांचा कालावधी व तीव्रता यांमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे प्राणी पाळणाऱ्यांना उंट टिकवून ठेवण्यासाठी गायी व इतर प्राणी सोडून द्यावे लागत आहेत, कारण केवळ उंटच पाण्याविना कित्येक आठवडे जगू शकतात. परिणामी माणसांशी असलेल्या उंटांचा संपर्क वाढतो आहे- प्राणघातक आजारांच्या प्रसारासाठीची ही अगदी सोयीची परिस्थिती असते.
"केनियात प्रचंड संख्येने उंट असल्यामुळे हा अभ्यास इथे करतो आहोत. विशेषतः मर्साबितमध्ये अभ्यास सुरू आहे," असं मिनायो सांगतात. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना एकट्या 2019 या वर्षामध्ये सुमारे 14 उंटांमध्ये हा विषाणू आढळला.
"हा आजार माणसांमध्ये आला तर त्याचं पुढे काय होईल, हे आपल्याला माहीत नाही," मिनायो म्हणतात. "कोव्हिड-19मधून जागतिक साथ उद्भवेल हेदेखील कोणालाच माहीत नव्हतं. पण आता या साथीने लाखो लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम ठरेल."
"प्रीव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर."
उंटांचा देश
केनियामध्ये 30 लाख उंट आहे- म्हणजे जगातील एकूण उंटांपैकी सुमारे 10 टक्के केनियातच आहेत. सुदान व सोमालिया यांचा अपवाद वगळता केनियामध्ये जगातील सर्वाधिक उंट आहेत. केनियन सरकारच्या आकडेवारीनुसार मर्साबितमध्ये किमान 2 लाख 24 हजार उंट आहे.
म्हणजे जवळपास माणसांऐवढीच तिथल्या उंटांची लोकसंख्या आहे. भूभागाच्या हिशेबाने मर्साबित हा केनियातील सर्वांत मोठा प्रांत आहे, पण लोकसंख्येच्या हिशेबात देशातील सर्वांत कमी लोकसंख्येच्या प्रांतांमध्ये त्याची गणना होते. केवळ एक टक्के कोनियन लोक इथे राहतात.
शहराच्या बाहेरच्या बाजूला उजळ रंगाचे कपडे घातलेल्या काही स्त्रिया 'राष्ट्रीय अन्नधान्य व उत्पादन मंडळा'च्या प्रवेशद्वारापाशी वाट पाहत थांबल्या आहेत. कोव्हिड-19मुळे केनियाची अर्थव्यवस्था अंशतः टाळेबंद झाल्यामुळे दररोज सकाळी महिलांना आशाळभूतपणे रांगेत उभं राहावं लागतं- मका, साखर, तांदूळ, खाद्यतेल अशा अन्नाचं पॅकिंग करण्याच्या काही तासांच्या कामासाठी आपली वर्णी लागेल अशी आशा त्या ठेवून असतात. जागतिक साथीमुळे उत्पन्न बुडालेल्या भुकेल्या कुटुंबांना ही अन्नपदार्थांची पाकिटं वाटली जातात.
मर्साबितच्या अर्थव्यवस्थेतील 85 टक्के भार पाळीव प्राण्यांमधून उचलला जातो. आर्थिक उपजीविका परवण्यासोबतच उंट व गायी कौटुंबिक मालमत्ताही ठरत असतात. हुंडा किंवा शालेय शुल्क यांसारख्या खर्चांसाठी या प्राण्यांचा वापर होतो.
मेंढ्या, शेळ्या, किंवा इतर थोडी वर्षं जगणाऱ्या पाळीव पाण्यांपेक्षा उंट अधिक सुरक्षित मानले जातात. वारंवार येणाऱ्या दुष्काळातही टिकून राहणाऱ्या कणखर प्राण्यांकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे उंटांचा वावरही वाढला आहे.मर्साबितवासियांपैकी 80 टक्के लोक गरिबीत जगतात.
पर्यावरणासारखे इतर उद्योग केनियाच्या इतर भागांना तगून राहायला मदत करतात, तसा काही लाभ मर्साबितच्या अर्थव्यवस्थेला नाही. दर वर्षी केनियाला 20 लाख पर्यटक भेट देतात, त्यातले मोजके काही हजारच लोक मर्साबितचा प्रवास करतात.
पण उंटांची संख्या जितकी जास्त असेल तितका प्राणिजन्य आजारांचा धोकाही वाढतो. "या प्रदेशातील पाळीव प्राण्यांची संख्या सातत्याने वाढते आहे, त्यामुळे वन्यजीवनासोबतची घसटही वाढते. अशा वेळी वन्यजीवांमधून आजार पाळीव प्राण्यांमध्ये येऊ शकतात आणि तिथून ते माणसांमध्ये येऊ शकतात," असं केनियातील 'प्रेडिक्ट'च्या प्रकल्पांची धुरा सांभाळणारे डॉन झिमरमन सांगतात.
स्मिथ्सोनियन कन्झर्वेशन बायॉलजी इन्सिट्यूटच्या जागतिक आरोग्य कार्यक्रमात ते वन्यजीवांचे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत
"आजार बाहेर पसरलेले आहेतच. संधी मिळाली की ते माणसांच्या दिशेने झेप घेतात."
मर्स हा विषाणू आधीच पसरलेला आहे. उंट पाळणाऱ्यांना मर्सपासून विशेष धोका असल्याचं अलीकडे एका अभ्यासातून समोर आलं- काही लोकांमध्ये तर या विषाणूवरील मारकद्रव्यही आढळलं, म्हणजे त्यांना या विषाणूची लागण होऊन गेली होती.
उंटाला फसवण्यासाठीची कळ शेपटीत असते
दररोज सकाळी मिनायो व त्यांचे सहकारी बोरू डुब वाटो मर्ससंदर्भात उंटांची चाचणी घेण्यासाठी बाहेर पडतात. खुद्द उंट पाळणारे लोक ज्या खबरदारीच्या उपाययोजना करत नाहीत, त्या मिनायो व बोरू यांनी केलेल्या असतात.
त्या गॉगल घालतात, चेहरा झाकणारे मास्क घालतात आणि धुळीपासून संरक्षण करणारा पूर्ण शरीर झाकणारा कोट घालतात, फेस-शिल्ड, गमबूट व हातमोजे अशी सगळी तजवीज त्यांनी केलेली असते. हा सगळा जामानिमा केल्यावर त्या बाहेर पडतात तेव्हा त्या जागी त्यांचं असणं विनोदी वाटू लागतं. एका आफ्रिकी गावातील प्रेतात्म्यांना हुडकून काढणारे 'घोस्टबस्टर' असल्यासारखे ते दिसतात.
सहा दुर्दैवी उंटांना ते चाचणीसाठी उभं करवून घेतात. यातील प्रत्येक उंट दोन वर्षांहून कमी वयाचं पिल्लू असतं, पण नमुना घेण्यासाठी त्यांना खाली दाबण्याचं काम सुरू झाल्यावर ही पिलंच त्यांच्या मालकांहून उंच असल्याचं दिसून येतं.
"हे महाकाय प्राणी असतात," असं डुब वाटो सांगतात. मर्साबितमधल्या स्थानिक गाब्रा जमातीचे डुब इथेच उंटांच्या सोबतीने लहानाचे मोठे झाले. उंटांना काबूत आणण्यासाठी "ताकद लागते", असं ते सांगतात. आणि ताकद असली तरी "बऱ्याच क्लृप्त्या वापरल्याशिवाय" यश मिळत नाही.
पहिली क्लृप्ती शेपटीपासून सुरू होते. शेपटी पकडली की उंट पळून जाऊ शकत नाही. "दुसऱ्या व्यक्तीने उंटाच्या कानापाशी जायचं. मग त्याचे दोन्ही ओठ धरायचे," असं डबु वाटो सांगतात. आपल्याला पकडणाऱ्यांना लाथ किंवा गुडघा मारायचा प्रयत्न करताना उंट मोठमोठ्याने, गाढवासारखे आवाज करतो. डुब वाटो उंटाच्या नाकातून स्वॅब घेतात, मग त्याच्या गुदाशयातून नमुना घेतात. उंटाच्या जबड्याजवळच्या भागातून रक्त घेण्यासाठी ते सुईचा वापर करतात.
सर्व उंटांचा नमुना घेऊन झाल्यावर माणसांचे नमुने घेतले जातात. एका मागून एक मुलं खुर्च्यांवर बसतात. त्यांच्या नाकातून व घशातून नमुने घेतले जात असताना मुलं कशीनुशी तोंडं करतात. एकदा एका वृद्ध महिलेचा नमुना घेतला जात होता, तेव्हा मिनायोंनी त्या महिलेला वय विचारलं. मग एक खेळीमेळीतला वाद झाला. त्या महिलेच्या जन्मवर्षाची काहीच नोंद नव्हती. एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार ती 90 वर्षांची होती, तर दुसऱ्याच्या मते तिचं वय 100 वर्षांहन अधिक होतं. मग सगळी मुलं हसली. "100 लिहून टाका ना," कोणीतरी म्हणतं. मिनायो त्यानुसार लिहून घेतात.
फिल्ड-वर्क करून झाल्यावर मिनायो व डुब वाटो आपापले संरक्षणात्मक पोशाख काढून ठेवतात आणि मोटरसायकलवरून हे नमुने शहरातील प्रयोगशाळेत नेऊन देतात. तिथे एका अपकेंद्रित्रामध्ये रक्ताचे नमुने ठेवले जातात, मग स्वॅबसह ते सगळं एका भांड्यात भरलं जातं, त्या भांड्यात द्रवरूपातील नायट्रोजन वायू असतं, नैरोबीपर्यंत नेण्यासाठी उणे 80 अंशांच्या तापमान हे नमुने थंड केले जातात, नैरोबीला या नमुन्यांच्या मर्ससंबंधीच्या चाचण्या केल्या जातात.
वैद्यकीय संकटाची संभाव्यता
कोव्हिड-19 येण्याआधीपासूनच क्षयरोग, हेपिटायटिस ई व हवेतून होणारा फ्लू असे 13 विभिन्न प्राणिजन्य रोग 240 कोटी माणसांना आजारी पाडत होते आणि दर वर्षी 22 लाख लोकांचा यात मृत्यू होत होता. यातील अनेक आजार पाळीव प्राण्यांमधून आपल्याकडे आलेले असतात. गरीब देशांमध्ये 27 टक्के पाळीव प्राण्यांमध्ये प्राणिजन्य आजारांची लागण कधीतरी झाल्याच्या खुणा आढळतात. दर वर्षी आठांपैकी एका प्राण्याला असा संसर्ग होतो.
केनियामध्ये अशा धोक्याच्या खुणा सततच दिसून येतात. 2017 साली एका मोबाइल-फोन डेटा संकलन व्यवस्थेने आरोग्याधिकाऱ्यांना गुरांमधील अँथ्रॅक्सच्या प्रादुर्भावासंबंधी सावध केलं. त्यामुळे माणसांना याचा धोका निर्माण होण्यापूर्वीच हा संसर्ग थोपवणं तिथल्या सरकारला शक्य झालं. प्राणिजन्य आजारांचा प्रसार थांबवण्यासाठी तयार झालेल्या एका राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून ही डेटासंकलन व्यवस्था कार्यरत आहे.
दरम्यान, मंदेरा प्रांतात, मे 2020मध्ये किमान 70 उंट अज्ञात आजाराने मरण पावले. 2019मध्ये संसर्ग झालेल्या गायींचं रक्त अथवा अवयवांच्या संपर्कात आल्यामुळे रिफ्ट व्हॅली ताप या प्राणघातक आजाराचा प्रादुर्भाव माणसांमध्ये झाला होता. सुदैवाने यात कोणीही मरण पावलं नाही.
पण नशीब कायम साथ देत नाही. जून 2020मध्ये मार्साबितजवळच्या मेरू प्रांतामध्ये किमान दोन लोकांचा मृत्यू झाला व नऊ जण आजारी पडले, त्याला गुरांमधील आजाराचा संसर्गच कारणीभूत ठरला असावा, अशी शंका डॉक्टरांनी बोलून दाखवली होती.
2014 साली मार्साबितमध्ये 139 लोक ब्रसलॉसिसने मरण पावले. प्रक्रिया न केलेलं दूध किंवा कमी शिजलेलं अन्न यातून सहजपणे संक्रिमत होऊ शकणारा हा अत्यंत संसर्गक्षम जीवाणू असतो. जगातील आठांपैकी एका गायीला ब्रसलॉसिसची लागण होते. पण ब्रसलॉसिस गुरांकडून मानवांकडे कसा संक्रमित होतो, याची माहिती 30 टक्क्यांहून कमी पशुपालकांना व शेतकऱ्यांना असते, असं करिउकी न्जेंगा यांनी केलेल्या अलीकडच्या एका अभ्यासातून समोर आलं. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मदतीने सुरू केलेल्या मार्साबितमधील मर्सविषयीच्या अभ्यासात ते प्रमुख वैज्ञानिक म्हणूनही सक्रिय आहेत. कच्चं दूध पिणं किंवा कच्ची चामडी हाताळणं, यांसारख्या प्रकारांमुळे पशुपालकांना याचा विशेष धोका असतो, असं ते सांगतात.
आत्तापर्यंत मार्साबितमध्ये मर्स माणसांमध्ये आढळलेला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये मिनायो यांच्या चमूने घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोणाही व्यक्तीला हा आजार झाल्याचं दिसलं नाही. पण असं काही झालं किंवा असं जेव्हाकेव्हा होईल तेव्हा ते विध्वंसक ठरण्याची शक्यता आहे.
"माणसांसाठी हा विषाणू अतिशय प्राणघातक ठरू शकतो," असं मिनायो सांगतात. "माणसांमध्ये अंतर्गत संक्रमण सुरू झाल्यावर कोणाला हा संसर्ग होईल हे सांगता येणार नाही. पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता नसलेल्यांना याची लागण होऊ शकते. रोगप्रतिकारक यंत्रणा नुकतीच वाढत असलेल्या मुलांना हा संसर्ग होऊ शकतो."
कोव्हिड-19 प्रमाणेच मर्समुळेही काही श्वसनविकार होतो. नाक चोंदं, खोकला, छातीत दुखणं, किंवा श्वास घेताना अडचण येणं, या लक्षणांनी याची सुरुवात होते. सर्वांत घातक परिस्थितीत या आजारामुळे फुफ्फुसांना कायमच्या जखमा होऊ शकतात. हे प्राणघातक ठरू शकतं. मर्सचा संसर्ग झालेल्या ज्ञात माणसांपैकी एक तृतीयांशांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असं जागतिक आरोग्य संघटना नमूद करते.
एखाद्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील आरोग्यव्यवस्थांची संभ्रमावस्था कशी उघड होते, हे आपण कोव्हिड-19च्या वेळेस पाहिलं आहे. मार्साबितला हा धोका प्रचंड आहे. संपूर्ण मार्साबित प्रांतामध्ये केवळ पाच डॉक्टर असल्याचं 2014ची आकडेवारी सांगते- म्हणजे दर 64 हजार लोकांमागे केवळ एक डॉक्टर! प्रति हजार लोकांमागे एक डॉक्टर असायला हवा, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. त्याच्या 64 पट खालावलेली अवस्था मार्साबितमध्ये आहे.
पण हा धोका मार्साबितच्या पलीकडे जाणारा आहे.
उंट आढळतात अशा जगातील कोणत्याही ठिकाणच्या माणसांना मर्स हा विषाणू धोकादायक आहे, असं काही वैज्ञानिक म्हणतात. केनियापासून ते चीनमधील गोबी वाळवंटात व मंगोलियामध्येही उंटांचा माणसांशी व इतर पाळीव प्राण्यांशी असलेला संपर्क वाढतो आहे, त्यामुळे माणसं मर्सबाबत अधिक असुरक्षित अवस्थेत जातात.
दरम्यान, मोरोक्कोमध्ये उंट पाळणाऱ्यांमध्ये व कत्तलखान्यांत काम करणाऱ्यांमध्ये मर्सची मारकद्रव्यही 2019 साली आढळली, म्हणजे या ठिकाणीही हा आजार माणसांकडे झेपावण्याचा "मोठा धोका" आहे.
प्राण्यांकडून हा आजार माणसांकडे झेपावला, की मर्सचा प्रादुर्भाव वेगाने वाढू शकतो. एकट्या सौदी अरेबियामध्ये डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 या कालावधीत 15 लोकांना याचा संसर्ग झाला- त्यातील तीन जण रुग्णालयातीलच कर्मचारी होते, त्यांना रुग्णांकडून संसर्ग झाला होता. "कोरोना विषाणूंचं उत्परिवर्तन होतं, म्हणजे विशिष्ट विषाणूचं कधी काय होईल ते सांगता येत नाही, अशी या आरएनए विषाणूंची परिस्थिती असते," असं झिमरमन सांगतात.
त्यामुळे पुढची प्रादेशिक किंवा जागतिक साथ निर्माण करू शकणारे प्राणी व आजार शोधण्यासाठी संशोधनाला आर्थिक पुरवठा करणं आवश्यक आहे, असं झिमरमन म्हणतात. "नक्की काय सुरू आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे," असं ते म्हणतात.
केनियामध्ये मर्स आजार उंटांकडून माणसांकडे झेपावला, तर त्यासाठी "कागदोपत्री कोणतीही आकस्मिक आपत्ती निवारण योजना तयार झालेली नाही," असं न्जेंगा म्हणतात.
मार्साबित प्रांतातीर आरोग्यसेवकांना "कोव्हिड-19च्या कार्यपुस्तिकेतीलच उपाय वापरायला सांगितलं गेलेलं आहे: संबंधित व्यक्तीला विलग करा आणि पीपीई किट घाला," किंवा वैयक्तिक संरक्षणात्मक पोशाख करा, जेणेकरून तुम्हाला संसर्ग होऊ नये, असं न्जेंगा सांगतात. वास्तविक आरोग्यसेवकांनी शक्य तितक्या लवकर या संसर्गाच्या संभाव्य संपर्कात आलेल्यांचा शोध घ्यायला हवा. कोव्हिड-19च्या संदर्भात जगभरामध्ये हेच सुरू आहे.
याला पशुपालक पहिल्यांदा बळी जाण्याची शक्यता आहे, असं मिनायो सांगतात. "उंटही शिंकतात व खोकतात. शिंकताना त्यांची थुंकी तुमच्या अंगावर उडू शकते... त्यामुळे उंटांच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही या थेंबांमधून संसर्ग होऊ शकतो," असं त्या म्हणतात.
आणि "उंट काही मास्क घालत नाही," त्या नमूद करतात.
धोकादायक जीवनशैली
मार्साबितमधील करारे जिल्ह्यातल्या आपल्या घरापाशी न्गिरो नीपे त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या प्रत्येक उंटिणीचं हाताने दूध काढत होत्या. आजारामुळे त्यांचे उंट मेले तर त्या काय करतील, असा माझा प्रश्न नीपे यांच्यापर्यंत पोचवण्याची विनंती मी डुब वाटोला गेली. यावर गंमत वाटून त्या हसल्या.
"या म्झुंगूला म्हणावं, आम्ही सम्बुरू आहोत," त्या म्हणाल्या. पशुपालनासाठी प्रसिद्ध असलेल्या 42 जमातींपैकी एक म्हणजे सम्बुरू. "दूधच सर्व काही असतं," असं नीपे म्हणतात. म्झुंगू या स्वाहिली शब्दाचा अर्थ "परदेशीय" असा होतो. "याशिवाय आमच्याकडे काहीही नाही. आम्ही वस्तू विकत घ्यायला पैशांसाठी दुधावर अवलंबून असतो. मी दूध पिते, चहा करते आणि विकते."
मलाही दुधाची चव दाखवण्यासाठी त्या त्यांच्या बुटक्या, शाकारलेल्या झोपडीतून ताज्या दुधाचं भांडं घेऊन येतात, छोटी शेकोटी पेटवतात, आणि उंटाच्या दुधाचा चहा करू लागतात. दुधात चरबी खूप आहे, गायीच्या दुधापेक्षा याची चव गोड आहे. बहुतांश केनियावासीय सकाळच्या चहात बरीच साखर घालतात. पण इथे अनेक जण उंटाचं साधं दूध पितात, त्यावर फेसाचा थरही असतो.
मार्साबितमधील उंट पाळणारे लवकरच नियमितपणे चहाचा आनंद घेऊ शकणार नाहीत. "दर तीन वर्षांतून एकदा दुष्काळ पडतो आहे, त्यात पशुपालकांची सुमारे 50 टक्के जनावरं कमी होण्याची शक्यता असते," असं केनियन सरकारच्या एका अहवालातून समोर आलं.
"अनेक प्रदेशांमध्ये हवामानासंदर्भात टोकाच्या घडामोडी व चंचलता दिसून आलेली आहे, किंबहुना तोच नियम झालेला आहे." पण अजून याहून भयाण परिस्थिती येण्याची शक्यता असल्याचं हवामानविषयक वैज्ञानिक म्हणतात. संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार केनियातील तापमान 2050 सालपर्यंत दोन अंशांनी वाढेल आणि 2100 सालापर्यंत पूर्व आफ्रिकेतील दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ होईल.
आधीच दुष्काळाचा कालावधी वाढल्यामुळे पशुपालांनी त्यांच्या जनावरांना चारा शोधत दूरदूर भटकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे ते दीर्घ काळ त्यांच्या घरांपासून दूर घालवतात, अशा वेळी शेकोटी पेटवायची सोय नसते, असं न्जेंगा म्हणतात.
दर रात्री पशुपाल त्यांच्या घरांपासून दूर असतात, चाऱ्यासाठी गवत शोधत राहतात, त्यामुळे रात्री उब मिळण्यासाठी ते उंटांपाशी झोपतात. दिवसाच्या वेळी ते उंटांचं कच्चं दूध पितात- काही वेळा अनेक दिवस किंवा आठवडे त्यांना उपजीविकेचा हाच एकमेव स्त्रोत उपलब्ध असतो. कधी एखादा उंट वाळवंटात मरण पावला, तर पशुपाल त्याचं कच्चं मांस खातात, आगीसाठी लाकूड सहज उपलब्ध न झाल्याने त्यांना हा मार्ग पत्करावा लागतो.
या सर्व कृती विषाणूप्रसाराबाबत धोकादायक आहेत.
"त्यांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं याबद्दल आम्ही त्यांना सांगतो," असं डुब वाटो सांगतात. "अगदी जवळचा संपर्क येऊ देऊ नका आणि संपर्क आवश्यक असेल तेव्हा मास्क घाला. जवळचा संपर्क येणारं काम करून झालं की हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटाइज करा- आत्ता कोव्हिड-19बाबत करतोय ती काळजी घ्या."
केनियामध्ये उंटाचं बहुतांश दूध कच्चं प्यायलं जातं, त्यातून आजार पसरण्याची शक्यता असते. डुब वाटो यांचे सहकारी पशुपालांना गरम केलेलं दूधच प्यायचा आग्रह करतात. काही पशुपाल त्यांचं म्हणणं ऐकतातही. "तुम्ही लोक सांगायला आलात, त्याआधी आम्हाला दुधातून काही आजार होऊ शकतात हे माहीतच नव्हतं," असं नीपेचा भाऊ, संबरू जमातीचे पशुपाल लेमिलायोन लेकोन्कोई डेबु वाटो यांना सांगतात. "आम्ही नुसतं कच्चं दूध प्यायचो. पण आता तुम्ही माहिती सांगितल्यावर आम्ही गरम केलेलंच दूध पितो."
तरी केवळ वर्तनात बदल करून पुरेसं नाही, असं मार्साबितमधील वैज्ञानिकांना वाटतं. उंटांचा निकट संपर्क यायचं टाळून जगण्याचा कोणताही पर्याय अनेक पशुपालांकडे नाही. बाहेर रानात गेलेलं असताना काही जण अजूनही उंटाचं कच्चं दूध पितात.
उंटाचं हवामान
अमेरिकेतील गायी, युरोपातील डुकरं आणि जगभरात इतर ठिकाणी आपण खातो त्या प्राण्यांप्रमाणे उंटदेखील मानवी भोजनासाठी पळले जातात- दूध व मांस यांच्यासाठी त्यांचं पालनपोषण केलं जातं. "आम्ही हे प्राणी नुसतेच पाळलेले नाहीत, ते आमच्या उपजिविकेचं साधन आहेत," असं मिनायो म्हणतात.
अधिक लोकांची पोटं भरण्यासाठी अधिकाधिक प्राण्यांची वाढ केली जात असल्यामुळे प्राणिजन्य आजारांचा धोकाही वाढण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हवामानबदलामुळे त्यांना नवनवीन प्रदेशांमध्ये जाणं भाग पडतं आहे. हवामानबदलाचा आणखीही एक परिणाम होतो: दुष्काळांची वारंवारता वाढते, अधिकाधिक पशुपालक इतर प्राण्याऐवजी चिवट उंटांचा पर्याय निवडतात. 2014 सालच्या एका अभ्यासासाठी बोराना जमातीच्या 400 कुटुंबांचं सर्वेक्षण करम्यात आलं, त्यातील 41 टक्के लोकांनी सांगितलं की, हवामानबदलामुळे त्यांनी विशिष्ट प्रकारचे प्राणी पाळणं सोडून दिलं, तर उंट पाण्याविना दीर्घ काळ जगू शकतात त्यामुळे आपण त्यांची निवड केल्याचं 71 टक्के लोकांनी सांगितलं.
"मी अगदी अलीकडेच उंट पाळायला सुरुवात केली," असं लेकोन्कोई सांगतात. वारंवार दुष्काळ पडत असल्यामुळे त्यांना तोंड देण्याच्या उंटांच्या क्षमतेमुळे आपण गायींऐवजी उंट पाळायला सुरुवात केली, असं ते सांगतात. यात त्यांना खेद वाटत नाही. "सर्वांनाच आता उंटाचं महत्त्व वाटू लागलं आहे," असं ते म्हणतात.
पण इतर गुरांपेक्षा उंटांपासून माणसांना अधिक धोकाही असू शकतो. विशेषतः उंटांच्या आयुर्मर्यादेमुळे हा धोका उद्भवतो. दुग्धोत्पादनामध्ये सुमारे सहा वर्षांनी गायींची कत्तल केली जाते, म्हणजे ब्रुसलॉसिससारख्या जीवाणूंचा संसर्ग झालेल्या गायीकडून या संसर्गाचं संक्रमण माणसांमध्ये होण्यासाठीचा कालावधी मर्यादित होतो. शेळ्या व मेंढ्या जेमतेम दोन वर्षं जगतात. पण मर्स किंवा इतर आजारांची लागण झालेला उंटदेखील 15 ते 20 वर्षांची आयुर्मर्यादा पूर्ण करू शकतो.
लेकोन्कोई यांना मर्सचं स्थानिक बोलीमधील नाव माहीत आहे- होमा या न्गमिआ (उंटांचा फ्लू). मिनायो व डुबो वाटो यांनी त्यांना याबद्दल सावध केलेलं आहे. आपल्या जवळच्या काही उंटांवर या आजाराचा परिणाम झाल्याचं दिसत होतं, असं ते म्हणतात. "ते खोकत होते- माणसांसारखंच. पण तरीही आम्ही त्यांच्या सोबत जगतो, त्यांचं खोकणं सहन करतो. त्यांच्यापासून आम्ही पळून जाऊ शकत नाही," ते म्हणतात.
मर्सचा प्रसार रोखण्यासाठीच्या लढ्यामधील हा मध्यवर्ती तणाव आहे. मार्साबितमधील पशुपाल जगण्यासाठी त्यांच्या उंटांवर अवलंबून असतात. पण अधिकाधिक दुष्काळ व दुस्तर हवामानामुळे पशुपालांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोकाही वाढेल, असं वैज्ञानिकांना वाटतं.
पुढील जागतिक साथ रोखण्यासाठी वैज्ञानिक खूप प्रयत्न करत आहेत, ते उंटांची व उंटांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची चाचणी घेत आहेत. पण बदलत्या जगामध्ये आजार प्राण्यांकडून माणसांमध्ये जाणं अधिक सोपं झालं आहे. त्यामुळे चाचणी व प्रतिबंध या उपाययोजना पुरेशा आहेत का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)