कोरोनाः रुग्णालयाच्या हवेत सापडला कोरोना व्हायरस

    • Author, मयांक भागवत
    • Role, प्रतिनिधी

कोरोना व्हायरस काही काळ हवेमध्ये जिवंत राहू शकतो. कोव्हिड-19 चा हवेतून प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही धक्कादायक गोष्ट भारतीय शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून समोर आली आहे.

सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायल टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा हवेतून प्रसार होतो का? यावर संशोधन केलं.

  • कोव्हिड-19 हवेतून पसरू शकतो का? हे शोधण्यासाठी संशोधकांनी हैद्राबाद आणि चंदीगडच्या रुग्णालयात अभ्यास केला
  • हवेत असलेले व्हायरस पार्टिकल गोळा करण्यासाठी संशोधकांनी रुग्णालयातील हवेचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली
  • रुग्णालयातून गोळा केलेल्या 64 नमुन्यांपैकी कोव्हिड वॉर्डमधील 4 नमुन्यांमध्ये व्हायरस असल्याचं आढळून आलं.

या संशोधनाबाबत बोलताना 'काऊन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च'चे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, "कोरोना व्हायरस हवेमध्ये कितीकाळ रहातो यावर या संशोधनाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. अशा पद्धतीने शास्त्रीयरित्या करण्यात आलेलं, हे पहिलंच संशोधन आहे. यासाठी रुग्णालयातील हवेचे नमुने गोळा करण्यात आले होते."

कुठे करण्यात आलं संशोधन?

रुग्णालयातील ICU, रुग्णांचा वेटिंग एरिया, रुग्णालयातील खुल्या जागा एवढंच नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातही संशोधन करण्यात आलं.

संशोधनाचे परिणाम

  • काही रुग्णालयातील हवेच्या नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला
  • कोरोना वॉर्डमध्ये हवेच्या नमुन्यात व्हायरस आढळून आला. सामान्य वॉर्डमध्ये व्हायरस आढळून आला नाही. याचा अर्थ कोरोना आणि सामान्य वॉर्ड वेगळे केल्यामुळे फायदा झाला
  • खोलीत जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण असतील तर, हवेत कोरोना व्हायरस असण्याची शक्यता जास्त होती
  • कोरोनाग्रस्त रुग्ण एकाच खोलीत काही तास एकत्र असतील तर, कोरोनाचा विषाणू दोन तासांपेक्षा जास्त काळ हवेत आढळून आला
  • कोरोनाग्रस्त रुग्णांपासून दोन मीटर पेक्षा जास्त अंतरावर कोव्हिड-19 व्हायरस आढळून आला
  • लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या अभ्यासात आढळून आलं की, एसी किंवा फॅनचा फ्लो नसेल तर व्हायरस पसरत नाही
  • कोरोनाग्रस्त रुग्णाशी फार थोडावेळ संपर्क आला तर जास्त धोका नसतो
  • हा व्हायरस हवेत जास्त लांब जाऊ शकत नाही

"हवेतून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो, हे नाकारता येणार नाही. कोव्हिड-19 व्हायरस हवेमध्ये राहू शकतो हे स्पष्ट झालं आहे. ही चिंतेची गोष्ट जरूर आहे, पण लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. काळजी घेतली पाहिजे. संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे, मास्क घातल्याने संसर्ग होण्याची रिस्क 99 टक्के कमी होते," असं CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात.

हे संशोधन MedRxiv या जर्नलमध्ये छापण्यात आलं असून. या संशोधनाचा अजून पिअर रिव्ह्यू करण्यात आलेला नाही. म्हणजेच या संशोधनाचा अभ्यास करून यावर इतर तज्ज्ञांनी अजून त्यांची मतं मांडलेली नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं?

हवेतून विषाणूचा प्रसार होण्याला एअरबॉर्न ट्रान्समिशन असं म्हणतात. ज्या वैद्यकीय शस्त्रक्रियांमध्ये द्रवपदार्थाचे अत्यंत सूक्ष्म कण (Aerosols) हवेत उततात, त्यावेळी कोरोना व्हायरसचा हवेतून प्रसार होण्याची शक्यता असते.

हवेत कोव्हिड-19 चा व्हायरस असू शकतो का, यावर अनेक ठिकाणी संशोधन करण्यात आलं आहे.

लक्षणं असलेल्या कोरोनाग्रस्तांवर ज्या रुग्णालयात उपचार होतात. त्या रुग्णालयातील हवेच्या नमुन्यात कोरोना व्हायरस असल्याचं आढळून आलं असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पण, हवेमध्ये कोव्हिड-19 अत्यंत कमी प्रमाणात असल्याचं आढळून आल्याचं या अभ्यासात म्हटलंय.

बंद खोलीत ज्या ठिकाणी व्हेन्टिलेशन खूप कमी असतं. अशा ठिकाणी हवेतून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता आहे का, याबद्दल अभ्यास सुरू असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मारिया कारकोव्ह एका पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)