You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांच्या जागी माईक पेन्स राष्ट्राध्यक्ष होणार?
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची हकालपट्टी करण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना डोनाल्ड ट्रंप यांनी उसकावलं होतं, असं या प्रस्तावात म्हणण्यात आलं आहे.
या प्रस्तावात असं नमुद करण्यात आलं आहे की, उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली पाहिजे.
संविधानाच्या कलम 25 चा वापर करून उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी अयोग्य जाहीर केलं पाहिजे. अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून केली जात आहे. संसदेत डेमोक्रॅटीक पक्षाचं बहुमत आहे.
कलम 25 मधल्या दुरुस्तीनुसार, ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावत नाहीत. त्यावेळी उपराष्ट्राध्यक्षांना राष्ट्राध्यक्ष होण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ, एखाद्या शारीरिक किंवा मानसिक आजाराने राष्ट्राध्यक्ष ग्रस्त असतील तर.
अमेरिकेच्या संसदेत सद्यस्थितीत कलम 25 मधील दुरुस्तीच्या सेक्शन चारवर चर्चा सुरू आहे. या नियमानुसार, उपराष्ट्राध्यक्ष कॅबिनेटच्या बहुमतासोबत राष्ट्राध्यक्षांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी अयोग्य घोषित करू शकतात.
त्यासाठी उपराष्ट्राध्यक्षांना संसद अध्यक्ष आणि सिनेटच्या पीठासीन अधिकाऱ्यांना राष्ट्राध्यक्ष सरकार चालवण्यासाठी योग्य नाहीत किंवा जबाबदारी पार पाडण्यासाठी अयोग्य आहेत, असं पत्र लिहून कळवावं लागेल. असं झाल्यास उपराष्ट्राध्यक्ष तात्काळ राष्ट्राध्यक्ष होतील.
या दरम्यान राष्ट्राध्यक्षांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. राष्ट्राध्यक्षांनी या निर्णयाला आव्हान दिलं तर, संसदेला यावरही निर्णय घ्यावा लागेल.
सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जमध्ये राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर होण्यासाठी दोन-तृतियांश मतांची गरज आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत उपराष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करत रहातील.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याआधी असा हल्ला कधीच झाला नाही - ट्रंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सांगण्यानुसार, सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ज्यापद्धतीने हल्ला करण्यात येत आहे. तसा हल्ला आधी कधीच झाला नव्हता.
टेक्सासमध्ये अमेरिका आणि मॅक्सिको दरम्यान उभारण्यात येणाऱ्या भिंतीची पहाणी करण्यासाठी गेले असता ट्रंप म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. कलम 25 मधल्या दुरुस्तीचा मला काहीच धोका नाही. यामुळे जो बायडेन आणि त्यांच्या सरकारला धोका निर्माण होईल."
"महाभियोग फक्त दाखवण्यासाठी आहे. इतिहासातील सर्वांत मोठ्या विच-हंटचा हा एक भाग आहे. लोकांच्या जखमेवर मलम लावण्याची ही वेळ आहे. शांती आणि स्थिरता कायम राखली पाहिजे," असं ट्रंप पुढे म्हणाले.
'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या अभियानाची सुरूवात कायद्यावर आधारीत आहे, असंही ट्रंप म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)