Ind Vs Aus Test : अजिंक्य रहाणेचं दमदार शतक, पहिल्या डावात भारताची 131 धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न येथील कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात 326 धावा केल्या आहेत. यामुळे भारतीय संघ 131 धावांनी आघाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात 195 धावा केल्या होत्या.

रहाणेचं शतक

आव्हानात्मक खेळपट्टी, दर्जेदार बॉलिंग यांचा मुकाबला करत शैलीदार फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ देत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी साकारली.

पहिल्या कसोटीत 36 धावांत उडालेला खुर्दा तसंच कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती यामुळे अजिंक्यवर कर्णधारपद आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी होती. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या भव्य मैदानावर तंत्रशुद्धतेचा प्रत्यय देत अजिंक्यने कसोटी कारकीर्दीतील बारावं, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या शतकाची नोंद केली.

कसोटी कर्णधार म्हणून अजिंक्यचं हे पहिलंच शतक आहे. पॅट कमिन्सच्या बॉलवर खणखणीत चौकार लगावत रहाणेने शतकाला गवसणी घातली.

मेलबर्न कसोटीत, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 195 धावांत गुंडाळलं होतं. 1 बाद 36 वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने शुभमन गिल, भरवशाचा चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी यांना झटपट गमावलं मात्र अजिंक्यने नेहमीच्या शांतपणे खेळ करत डाव सावरला.

चांगल्या चेंडूंना सन्मान देत तर वाईट चेंडूंचा समाचार घेत अजिंक्यने भारतीय संघाला सुस्थितीत नेलं.

आधीच्या सामन्यामुळे दडपण

आधीच्या कसोटीत 36 धावांत खुर्दा उडाल्याने भारतीय फलंदाजांवर दडपण होतं. मात्र या दडपणाने कोशात न जाता अजिंक्यने सुरेख पदलालित्यासह मोलाचं शतक साकारलं.

बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या कसोटीत 36 रन्समध्ये खुर्दा. टीम इंडियासाठी नीचांकी धावसंख्या. अवघ्या तासाभरात भारताच्या महारथींनी गाशा गुंडाळला आणि बघता बघता कसोटी गमावली. कोणाला काही कळायच्या आत नामुष्कीकारक पराभवाची नोंद झाली होती.

ज्या कसोटीचं पारडं भारतीय संघाच्या बाजूने झुकलं होतं त्या कसोटीत न भूतो न भविष्यति अशी पडझड होऊन घात झाला.

या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असल्याने बाळंतपणावेळी तिच्याबरोबर राहण्यासाठी कोहलीने पॅटर्निटी लिव्ह घेतली आहे. दुसरीकडे हातावर बॉल आदळल्याने मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झालं.

शमी उर्वरित मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे दोन बदल अपरिहार्य होते. पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान साहा यांना वगळण्यात आल्याने चार बदल करण्यात आले.

मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, भारतीय संघाने मालिका 2-1 जिंकत इतिहास घडवला होता. भारतीय संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

सहा वर्षांपूर्वी याच मैदानावर झळकावलं होतं शतक

2014 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या 530 धावांसमोर खेळताना टीम इंडियाने 465 धावांची मजल मारली होती.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी शतकी खेळी करताना 262 धावांची भागीदारी केली होती. त्या भागीदारीदरम्यान रहाणे कोहलीपेक्षा अधिक आक्रमकतेने खेळताना दिसला होता. भन्नाट वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या मिचेल जॉन्सनला त्यांनी लगावलेले फटके आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहेत.

जॉन्सन-रायन हॅरिस, जोश हेझलवूड, शेन वॉटसन, नॅथन लॉयन या तगड्या आक्रमणाला सामोरं जात रहाणेने अफलातून शतकी खेळी साकारली होती. रहाणेने 21 चौकारांसह 147 धावांची दमदार खेळी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)