IPL 2020: मराठमोळा ऋतुराज आहे चेन्नईचा भावी शिलेदार

महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सलग तीन अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या आयपीएल मोहिमेचा शेवट विजयाने केला. दमदार खेळासह ऋतुराजने तो चेन्नईचा भावी शिलेदार असल्याचं सिद्ध केलं.

पंजाबसाठी करो या मरो असले्या लढतीत चेन्नईने 9 विकेट्सनी विजय मिळवला. ऋतुराजने नाबाद 62 रन्सची खेळी केली.

प्रत्येक हंगामात प्लेऑफ्स गाठणारा संघ अशी ओळख असलेल्या चेन्नईला यंदा प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ऋतुराजची बॅटिंग हा चेन्नईच्या मोहिमेचा आशादायी क्षण होता.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.

तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले.

0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही.

ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.

मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.

इंडिया ए साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या.

गेल्या वर्षीच्या लिलावात चेन्नईने ऋतुराजला संघात समाविष्ट केलं मात्र त्याला अंतिम अकरात संधी मिळू शकली. सुरेश रैनाने माघार घेतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळेल अशी चर्चा होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण करत असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.

मॅचमध्ये काय घडलं?

पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी या मॅचमध्ये जिंकणे क्रमप्राप्त होतं. चेन्नईने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. चेन्नईच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर पंजाबला केवळ 153 रन्सचीच मजल मारता आली.

दीपक हुडाने 62 रन्सची शानदार खेळी केली मात्र त्याला अन्य बॅट्समनकडून साथ मिळाली नाही. चेन्नईतर्फे लुंगी एन्गिडीने तीन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऋतुराज-फॅफ डू प्लेसिस जोडीने दमदार सुरुवात केली. फॅफ आऊट झाल्यानंतर ऋतुराजने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. ऋतुराजने 6चौकार आणि एका षटकारासह 49 बॉलमध्ये 62 रन्सची खेळी केली.

0, 5,0 अशा सुरुवातीनंतर ऋतुराजने 65, 72, 62 अशा दमदार खेळी साकारल्या. ऋतुराजमध्ये विराट कोहलीचा भास होतो असं चेन्नईचा अनुभवी खेळाडू फॅफ डू प्लेसिसने सांगितलं.

कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने मला सकारात्मक राहायला मदत केली. महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, डॅरेन ब्राव्हो, इम्रान ताहीर अशा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायचा अनुभव संस्मरणीय होता असं ऋतुराजने सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)