You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : युरोपच्या अनेक देशांमध्ये पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन, धोका वाढला
युरोपच्या कित्येक देशांनी आपल्या इथं कोरोना व्हायरसची नवी आणि जास्त संसर्गजन्य प्रजात आढळून आल्याचं म्हटलं आहे. लंडनमध्ये आढळून आलेली हीच ती नवी प्रजात आहे.
आता स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लँड यांनीही ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून आपल्या देशात नवा स्ट्रेन आढळून आल्याचं सांगितलं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक देशांनी तिथून होणारी विमान वाहतूक बंद केली होती.
स्पेनची राजधानी माद्रीदमध्ये गुरुवारी (24 डिसेंबर) ब्रिटनहून परतलेल्या एका व्यक्तीच्या तीन नातेवाईकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. ही माहिती शहराचे उप-आरोग्य अधिकारी एंटोनिओ जापातेरो यांनी दिली.
संसर्ग झालेल्या रुग्णआंपैकी एक-चतुर्थांश रुग्णांचा संबंध ब्रिटनमधून परतलेल्या व्यक्तींशी आहे. पण कोणताही रुग्ण गंभीर नसून घाबरण्याची गरज नाही, असं जापातेरो म्हणाले.
त्याशिवाय, तीन नवे संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांच्यात नव्या कोरोना प्रजातीचा संसर्ग झालेला असू शकतो. त्यांच्या चाचणीचा अहवाल 29 डिसेंबरपर्यंत मिळू शकतो.
फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्पेन आणि स्वीडनमध्येही सापडले रुग्ण
सर्वप्रथम फ्रान्सने शनिवारी (26 डिसेंबर) आपल्या देशात ब्रिटनहून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या नव्या प्रजातीची लागण झाल्याची बातमी दिली होती. संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसून सध्या त्यांनी स्वतःला घरामध्येच अलगीकरण करून घेतलं आहे.
व्हायरसच्या नव्या प्रजातीचं लागण झाल्याची माहिती मिळताच फ्रान्सने ब्रिटनदरम्यानची वाहतूक बंद केली.
बुधवारी म्हणजेच 23 डिसेंबरला युरोपीय नागरिकांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्यात आल्या. पण प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी आपला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा, अशी अट घालण्यात आली आहे.
स्पेन आणि फ्रान्सशिवाय स्वित्झर्लंडमध्ये नव्या प्रजातीची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले. यामध्ये तीन जण ब्रिटिश नागरिक आहेत, हे दोघे ख्रिसमसच्या सुट्ट्या घालवण्यासाठी स्वित्झर्लंडला गेले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली.
स्वित्झर्लंड या एकमेव देशाने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर परदेशी पर्यटकांसाठी देशाच्या सीमा खुल्या ठेवल्या होत्या. यामुळेच गेल्या काही आठवड्यांमध्ये हजारो ब्रिटिश नागरिक सुट्ट्या घालवण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले होते.
स्वीडनच्या एका पर्यटन कंपनीनेही एका रुग्णाबाबत माहिती दिली. ब्रिटनहून परतलेल्या एका व्यक्तीची तब्येत अत्यंत खराब आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्याशिवाय, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियातही लोकांना कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीची लागण झाल्याचं आढळून येत आहे.
जपानमध्येही ब्रिटनहून परतलेले पाच जपानी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीची ओळख सर्वप्रथम लंडन, दक्षिण-पूर्व ब्रिटन आणि पूर्व ब्रिटनमध्ये झाली.
ब्रिटनच्या सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, "सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी दोन-तृतीयांश रुग्ण नव्या प्रजातीची लागण झालेले असू शकतात. पण हा केवळ अनुमान आहे."
कोरोनाबद्दलच्या या तीन गोष्टीमुळे जगात काळजीचं वातावरण आहे.
- कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीचा प्रसार वेगाने होत चालला आहे.
- व्हायरसमधील मानवी पेशींवर परिणाम करणाऱ्या भागातच बदल झाला आहे. यामध्ये N501Y नामक एक म्यूटेशन आहे. शरीरातील पेशी यामुळे प्रभावित होतात.
- या म्यूटेशनमुळे मानवी पेशींवर संसर्ग करण्याची व्हायरसची क्षमता वाढली असल्याचं प्रयोगशाळेत निष्पन्न झालं आहे.
बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांच्या मते, या सर्व कारणांमुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त वेगाने पसरू शकतो.
पण, सध्याच्या स्थितीत दिलासादायक गोष्ट म्हणजे, जगभरात तयार होत असलेल्या लशी या प्रजातीवरसुद्धा परिणामकारक ठरू शकतात, असं तज्ज्ञांना वाटतं.
अनेक देशांकडून ब्रिटन प्रवासावर निर्बंध
दरम्यान, 40 पेक्षा जास्त देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर निर्बंध लावले आहेत. सौदी अरब, ओमान आणि कुवैत या देशांनी तर या सगळ्यांच्या पलिकडे जात एक आठवडा आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.
तर, शनिवारी (26 डिसेंबर) जपाननेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला. त्यांनी जानेवारी अखेरपर्यंत सर्वच ब्रिटिश नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध लावले आहेत. तोपर्यंत फक्त जपानी नागरिक तसंच जपानमध्ये काम करत असलेल्या लोकांनाच जपानमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल.
ब्रिटनशिवाय दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा एक नवा स्ट्रेन मिळाल्याचं सांगितलं जातं. हा स्ट्रेन ब्रिटनच्या स्ट्रेनपेक्षा थोडा वेगळा आहे.
दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रजातीचा संसर्ग तरुण आणि निरोगी लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)