कोरोना लस : 'अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांनी फायझरची लस घेऊ नये'

    • Author, निक ट्रिगल आणि रेचल शरेअर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी फायझर - बायोएनटेकची कोव्हिडवरची लस घेऊ नये असं युकेमधल्या नियामकांनी म्हटलंय.

NHSच्या दोन कर्मचाऱ्यांना लस घेतल्यानंतर अॅलर्जी उमटल्यानंतर हे सांगण्यात आलंय.

औषधं, अन्नपदार्थ किंवा लशींची अॅलर्जी असणाऱ्यांसाठी औषधं आणि औषधी उत्पादनांसाठीच्या नियामक एजन्सीने हा सल्ला दिलाय.

लस घेतल्यानंतर तिची अॅलर्जी आलेलया या दोन्ही कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता बरी आहे.

या दोघंनाही Anaphylactoid प्रकारची रिअॅक्शन आली. यामध्ये त्वचेवर पुरळ येणं, धाप लागणं किंवा कधी कधी रक्तदाब कमी होणं यासारख्या गोष्टी होतात. पण ही रिअॅक्शन Anaphylaxis प्रकारच्या अॅलर्जी सारखी जीवघेणी नाही.

NHS च्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना यापूर्वीही अॅलर्जीचा गंभीर त्रास झाला होता आणि ते त्यावरचं औषध कायम जवळ बाळगतात.

पण हे दोघेही आता व्यवस्थित असून नवीन लशींच्याबाबत असं कायम घडत असल्याचं NHSचे इंग्लंडमधले वैद्यकीय संचालक प्रोफेसर स्टीफन पॉविस यांनी सांगितलं.

दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या फ्लूच्या लशीमुळेही अशी अॅलर्जी रिअॅक्शन होऊ शकते.

युकेमध्ये लसीकरण मोहिमेला काल (8डिसेंबर) सुरुवात झाली आणि हजारो लोकांना ही लस देण्यात आलेली आहे.

युकेमधल्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना - ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात येईल.

येत्या काही आठवड्यांत देण्यासाठी युके सरकारने फायझर - बायोएनटेककडून सुमारे 8 लाख डोसेस घेतले आहेत. आणि अजून 4 कोटी डोसेसची ऑर्डर देण्यात आलेली आहे.

संपूर्ण रोग प्रतिकारशक्तीसाठी लशीचे 2 डोसेस घेणं गरजेचं असल्याने या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना लस देण्यात येईल.

या एकूण ऑर्डरपैकी या महिनाअखेरपर्यंत 40 लाख डोसेस कंपनीकडून उपलब्ध होतील.

जेम्स गॅलाघर यांचं विश्लेषण

कोणतंही परिणामकारक औषध हे साईड इफेट्क्सशिवाय येत नाही. म्हणूनच आपल्याला धोका आणि फायदा यांच्यातला समतोल साधावा लागतो.

या वर्षी कोरोना व्हायरसमुळे युकेमध्ये दर हजारांमागे एका व्यक्तीचा बळी गेलाय आणि हा आकडा सतत वाढतोय, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं.

काल ज्या हजारो लोकांना ही लस देण्यात आली, त्यापैकी दोघांना याची रिअॅक्शन आली आणि त्यातून ते बरे झाले.

कोणत्याही लशीबद्दल हे घडू शकतं आणि यावर स्टिरॉईड किंवा अॅड्रेनलिन देऊन उपचार केले जाऊ शकतात.

या लशीमुळे हजारात एकाला अॅलर्जी येण्याची शक्यता असल्याचं ट्रायल्सच्या निष्कर्षांमध्ये म्हटलं होतं.

ज्यांना सगळ्यांत जास्त धोका आहे त्यांना MHRAने हा इशारा दिलेला आहे, पण लोकसंख्येतल्या बहुतेकांसाठी यामुळे काहीही बदलणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)