You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लाटः लॉकडाऊनचा निर्णय कधी घ्यायला हवा? इंग्लंडच्या अनुभवातून आपण काय शिकायला हवं?
- Author, रिचर्ड कुकसन
- Role, बीबीसी न्यूज
यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीपासून कोरोना व्हायरसने विविध देशांमध्ये पाय पसरायला सुरुवात केली. कोरोनाचा काय परिणाम होऊ शकतो याच्या तज्ज्ञांनी केलेल्या आकलनात त्रुटी असल्याचं बीबीसीच्या डॉक्युमेंटरीत स्पष्ट झालं आहे. युनायटेड किंग्डममध्ये आता यावर चर्चा सुरू झाली आहे. आताही वाढत असलेल्या संख्येमुळे लॉकडाऊन नक्की कधी लावलं पाहिजे यावर मतं व्यक्त केली जात आहेत. अनेक तज्ज्ञांनी काही आडाखेही मांडले आहेत.
"लॉकडाऊन आठवडाभर आधी केलं असतं तर आणखी नागरिकांचे प्राण वाचू शकले असते. फेब्रुवारीत जी स्थिती लक्षात घेता, तुम्ही वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतले असते का? तर मला वाटतं नाही असं उत्तर असेल", हे उद्गार आहेत लिव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक कॅल्युम सेंपल यांचे. कोव्हिड19 संदर्भात युके सरकारला सल्ला देणाऱ्या समितीतील महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत.
युकेत कोरोना व्हायरसबाधित रुग्ण सापडू लागल्यापासून आम्ही शास्त्रोक्त मार्गाने जात आहोत असं युकेमधल्या मंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे. तरीही युकेतला कोरोनाचा मृत्यूदर जगातला सगळ्यात भयंकर असा आहे. कोरोनाने आतापर्यंत युकेत 50,000 लोकांचा जीव घेतला आहे.
तर लॉकडाऊनपूर्वी देण्यात आलेला सल्ला किती परिणामकारक होता?
कोरोनाला पसरण्याची संधी मिळाली का?
23 जानेवारी 2020 रोजी नकळतपणे कोरोना संक्रमित महिला चीनमधल्या वुहानमधून युकेला पोहोचली. विमानतळाहून बाहेर पडताना तिचं कोणत्याही प्रकारे चेकिंग झालं नाही. आठ दिवसांनंतर ती महिला आणि तिचे कुटुंबीय युकेतील पहिले कोरोना रुग्ण ठरले.
या महिलेनंतर केवळ चीनमधून नव्हे तर अन्य देशातून, युरोपातून किती माणसं युकेत संक्रमित स्थितीत आली याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. फेब्रुवारी- मार्च हे महिने असेच निघून गेले.
कोरोना व्हायरसने इटली, स्पेन, फ्रान्स इथे पोहोचला आहे. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत याची आम्हाला जाणीव झाली नाही असं प्राध्यापक सेंपल यांनी सांगितलं. सरकारला सल्ला देणाऱ्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.
या हलगर्जीपणाचा परिणाम म्हणजे या दोन महिन्यात कोरोनाचे 1,500 रुग्ण आढळले. त्यामुळेच ब्रिटनला मोठा फटका बसला.
प्राध्यापक ग्रॅहम मेडले हे सायंटिफिक पॅन्डेमिक इन्फ्ल्युएन्झा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. सेज समितीला माहिती पुरवण्याचं काम हा गट करतो.
"जर मला एक गोष्ट माहिती असती ती म्हणजे युरोपातून युकेत येणाऱ्या माणसांची संख्या. उत्तर इटलीत कोरोनाने थैमान घातलेलं असेल तर युरोपातील अन्य देशात साथ पसरणं साहजिक आहे. मी हा विचार केला नाही".
प्राध्यापक गॅब्रिएल स्कॅली हे सार्वजनिक आरोग्य विषयातले तज्ज्ञ आहेत. मजूर पक्षाचे ते आरोग्यविषयक सल्लागार होते. कोरोना व्हायरस फैलावत असतानाही अन्य देशातून युकेत नियमितपणे माणसं येत होती.
"आम्ही आमच्या सीमा खुल्या ठेवल्या. व्हायरला आत येऊ दिलं. त्यामुळेच युकेत प्रचंड प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढले. सुरुवातीच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली आणि आता जी परिस्थिती दिसते आहे ती आहे".
सुरुवातीची अपुरी माहिती
सुरुवातीला कोरोना व्हायरस, रुग्ण आणि तत्सम माहिती फर्स्ट फ्यू हंड्रेड (FF100) या डेटाबेसमध्ये भरण्यात आली. कोरोना व्हायरस कसा संक्रमित होतो हे जाणून घेण्यासाठी मॉडेलर्सचं या माहितीकडे बारीक लक्ष होतं.
पण तिथे एक समस्या होती. फर्स्ट फ्यू हंड्रेडचा डेटा आमच्या अपेक्षेप्रमाणे सम्यक नव्हता असं डॉ. थिबाऊट जोंबार्ट यांनी सांगितलं. ते लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.
त्या डेटामध्ये काही चुका होत्या. उदाहरणार्थ, मूलभूत माहिती, संसर्गासंदर्भात माहितीचा अभाव होता.
"त्यावेळी मी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून येत होतो. इबोलासंदर्भात उद्भवलेली परिस्थिती कशी हाताळण्यात आली हे समजून घेण्यासाठी मी तिथे सहा महिने होतो. युद्धजन्य परिस्थितीत असा आजार पसरणं खूपच धोकादायक. त्यामुळे अशा परिस्थितीत हाती येणारी आकडेवारीही परिपक्व नसते. काँगोच्या तुलनेत युकेत समोर आलेला डेटा बराच चांगला होता",
मात्र लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसनचे प्राध्यापक मेडले यांनी फर्स्ट फ्यू हंड्रेड प्रणालीने दिलेली माहिती योग्य असल्याचा दावा केला. "मॉडेलर्सना नेहमीच आणखी काहीतरी आणि अधिक माहिती हवी असते. डेटा सर्वसमावेशक असावा असं प्रत्येकाला वाटतं, तो अचूक असावा असंही वाटतं. मात्र आम्ही जो डेटा जमा करून सादर केला तो परिपूर्ण असाच होता असं मेडले यांना वाटतं.
युकेत काय घडू शकतं हे सांगण्याच्या परिस्थितीत आपण आता आहोत असं ते म्हणाले. कोरोना व्हायरस कुठून येतो आहे आणि कोणाला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे हे समजून घेण्यासाठी सर्वंकष डेटा हाताशी असणं आवश्यक आहे".
केअर होम मधल्या त्रुटी
फेब्रुवारीच्या मध्यात, चीनमधील कोरोना संसर्गाचं प्रारुप लक्षात घेतलं तर ज्येष्ठ नागरिकांना या व्हायरसने सर्वाधिक ग्रासलं होतं. वृद्धांची योग्य काळजी घेतली, सेवासुश्रुषा केली तर त्यांना असलेला धोका कमी करता येऊ शकतो.
मात्र एसपीआय-एमचे डॉ. इयन हॉल यांनी केअर होम्स अर्थात वृद्धाश्रम कशा पद्धतीने चालतात हे प्रणालीत योग्य पद्धतीने नोंदवलं गेलं नसल्याची कबुली त्यांनी दिली. केअर होम्स कर्मचाऱ्यांमुळे वृद्धांना कोणता धोका निर्माण होऊ शकतो हे स्पष्ट झालंच नाही.
या मॉडेल्सचं अपयश म्हणजे केअर होम्स समाजाशी कशा पद्धतीने जोडल्या गेले आहेत याचा आम्हाला अंदाजच आला नाही.
मॉडेलर्स म्हणून आम्हाला ते कळलं नाही. धोरणकर्ते तसंच अनेक अभ्यासक, संशोधक त्यांनी आम्हाला हे सांगितलं असतं जर आम्ही त्यांना त्यादृष्टीने विचारलं असतं.
केअर होम्समधल्या 20,000 वृद्धांचा कोरोनाने जीव घेतला.
कोरोनाचा संसर्ग शिगेला
युकेत कोरोनाचा संसर्ग टोकाला कधी जाऊ शकतो याचा मॉडेलर्स अंदाज बांधत आहेत.
मार्चच्या सुरुवातीला एसपीआय-एम यांना असं वाटलेलं की अजून 12 ते 14 आठवडे दूर आहे. कूर्म गतीने फैलावणाऱ्या कोरोनासाठी आम्ही सज्ज होत होतो. त्यादृष्टीने आगामी काळात सोशल डिस्टन्सिंग वाढवायला हवं याची आम्हाला जाणीव झाली असं डॉ. हॉल यांनी सांगितलं.
पण सरकारचं धोरण पूर्णपणे फसलं असल्याचं लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे प्राध्यापक स्टीव्हन रिले यांना वाटतं. यामुळेच हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागांवर प्रचंड ताण पडला.
10 मार्च रोजी अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या 913 दाखवण्यात आली होती. पण तज्ज्ञांच्या मते, तेव्हा 75,000 कोरोना रुग्ण असण्याची शक्यता आहे. तातडीने लॉकडाऊन लागू करण्यात यावं असा प्रबंध त्यांनी सादर केला होता. रिले म्हणतात, "साथीच्या रोगांचं आकलन लक्षात घेऊन मी तातडीने उपाययोजना करण्याचा सल्ला दिला होता. लॉकडाऊन लागू करण्यात यावं, सोशल डिस्टन्सिंग कठोरपणे पाळण्यात यावं असं मी म्हटलं होतं. लॉकडाऊन लागू केलं असतं तर पुढची परिस्थिती कशी हाताळायची हे ठरवण्यासाठी वेळ मिळाला असता".
एसपीआय-एमचे प्राध्यापक मार्क जिट यांना कोरोनाचे खरे आणि नेमके आकडे काय आहेत याचा शोध घेण्यास सांगण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णांची नोंद करण्यात येत नाहीये हे लक्षात आलं असावं. नक्की किती रुग्ण वगळण्यात आले ते समजायला हवं, असं ते सांगतात.
ते म्हणतात, "अतिदक्षता विभागात किती रुग्ण आहेत याचा आम्ही आढावा घेतला. या रुग्णांच्या बरोबरीने असे हजारो रुग्ण असतील ज्यांना कोरोना झाला असेल पण त्याची तीव्रता एवढी नसेल."
त्यांच्या अंदाजानुसार, मार्चच्या मध्यात दररोज 1,00,000 रुग्णांची नोंद झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे खूपच काळजी करायला लावणारी आकडेवारी आहे. 1,00,000 रुग्ण दररोज आढळून येत असतील तर आठवडाभरात रुग्णालयात दररोज 20,000 रुग्ण दाखल होतील. ही माहिती तातडीने सेजला देण्यात यावी जेणेकरून आपल्याला पुढची रणनीती ठरवता येईल.
अन्य मॉडेलर्सना हे कळून चुकलं की एनएचएसच्या ज्या डेटावर आधारित ते गृहितकं मांडत आहेत तो आता कालबाह्य झाला आहे.
युकेतून येणारा डेटा आठवडाभर शिळा असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे कोरोना कसा फैलावतोय याकडे आम्ही आता लक्ष देत नाही. भूतकाळात काय झालं याचा आम्ही अभ्यास करत आहोत असं डॉ. निक डेव्हिस यांनी सांगितलं. तेही एसपीआय-एम आहेत.
तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत.
17 मार्च रोजी युकेत नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. आवश्यकता नसेल तर अन्य कोणाशी असलेला संपर्क कमीत कमी असावा. अनावश्यक प्रवास करू नका. जास्तीतजास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करावं. पब्स, क्लब्स, थिएटर्स यासारख्या सामाजिक ठिकाणी जाणं टाळा, असं ते भाषणात म्हणाले होते.
मँचेस्टर विद्यापीठात एसपीआय-एमचे डॉ. लॉरेन्झो पेलिस इटलीच्या आकडेवारीकडे लक्ष ठेऊन आहेत. ब्रिटनमध्ये अपेक्षेच्या दुप्पट वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे.
लॉकडाऊन खूप उशिराने लागू केला का?
शास्त्रज्ञांना असं वाटतं का की त्यांनी आधीच कार्यवाही करायला हवी होती. युकेत जे काही घडलं ते भयावह आहे. योग्य वेळीच कार्यवाही झाली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं असं डॉ. डेव्हिस यांना वाटतं.
आमच्या मॉडेलनुसार अभ्यास केल्यावर लक्षात आलं की लॉकडाऊन आठवडाभर आधी लागू केला असता तर निम्म्याहून अधिक मृत्यू टाळता आले असते.
मॉडेलिंगवर विसंबून राहिलो, मॉडेलिंग केंद्रस्थानी राहून अख्खी प्रक्रिया आखण्यात आली यातच सगळा घोळ झाला असं प्राध्यापक स्कॅली यांना वाटतं. जागतिक आरोग्य संकटाचा सामना करताना, विशेषत: कोरोनाच्या बाबतीत विज्ञानाचं अपयश हा मुद्दा कायमस्वरुपी कोरला जाईल.
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअरच्या प्रवक्त्या म्हणाल्या, "हा एक नवीन व्हायरस आहे. अभूतपूर्व असं आरोग्य संकट आहे. सुरुवातीपासूनच माणसांचे जीव वाचवणं हेच आमचं प्राधान्य होतं. सेज आणि उपसमितीच्या तज्ज्ञांनी आखून दिलेल्या वाटेवरच आम्ही मार्गक्रमणा केली. एनएचएस कुठल्याही पद्धतीसमोर झुकलेलं नाही".
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)