You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
न्यूझीलंडच्या पोलीस युनिफॉर्ममध्ये आता हिजाबचाही समावेश
न्यूझीलंडच्या पोलीस खात्याने आपल्या अधिकृत गणवेशात हिजाबचाही समावेश केला आहे.
जास्तीत जास्त मुस्लीम महिलांनी पोलीस खात्यात भरती व्हावं म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
न्यूझीलंडच्या पोलीस खात्यात नव्याने जॉईन झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल झीना अली या अधिकृतरीत्या हिजाब वापरणाऱ्या पहिल्या मुस्लीम पोलीस कर्मचारी ठरतील.
"विविध प्रकारच्या लोकांनी मिळून या देशाचा समाज बनला आहे आणि या देशातलं पोलीस खातं जास्तीत जास्त सर्वसमावेशक असावं," म्हणून हा निर्णय घेतल्याचं पोलीस खात्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
अधिकृत युनिफॉर्ममध्ये हिजाबचा पर्याय देणारी इतर पोलीस खाती म्हणजे लंडनचं मेट्रोपॉलिटन पोलीस खातं आणि स्कॉटलंड पोलीस ही आहेत.
2006 साली मेट्रोपॉलिटन पोलिसांनी हिजाबला अधिकृत युनिफॉर्म म्हणून मान्यता दिली. 2016 मध्ये स्कॉटलंड पोलिसांनी मान्यता दिली. ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया पोलीस दलाच्या सदस्य महा सुक्कर या 2004 मध्ये हिजाब वापरणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
न्यूझीलंड पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी हिजाबचा अधिकृत युनिफॉर्ममध्ये समावेश करण्याची प्रक्रिया 2018 साली सुरू केली. एका माध्यमिक शाळेला भेट दिली असताना कोणीतरी अशी विनंती केली आणि त्या विनंतीला उत्तर म्हणून त्यांनी हिजाबला आपल्या गणवेशात स्थान द्यायचं ठरवलं.
कॉन्स्टेबल अली यांनी हा पहिल्या पोलीस कर्मचारी होती ज्यांनी हिजाब वापरू देण्याची विनंती केली. झीना अली यांचा जन्म फिजीत झाला आणि त्यांच्या लहानपणी त्यांचं कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं.
झीना यांनी स्थानिक पेपर न्यूझीलंड हेराल्डशी बोलताना सांगितलं की त्यांनी ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर पोलीस दलात भरती व्हायचं ठरवलं.
"मला जाणवलं की पोलीस दलात जास्तीत जास्ती मुस्लीम महिला येण्याची गरज आहे कारण अशा पोलीस कर्मचारी लोकांना धीर आणि आधार देऊ शकतील," झीना म्हणतात.
"मी जेव्हा बाहेर जाते आणि न्यूझीलंड पोलिसांच्या युनिफॉर्मचा अधिकृत भाग असलेला हिजाब इतरांना दाखवते तेव्हा मला खूपच छान वाटतं. यामुळे इतर मुस्लीम मुलींना पोलिसात भरती व्हायची प्रेरणा मिळेल असं मला वाटतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)