You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमला हॅरिस यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्ट्स, मीम्स फेसबुकनं हटवले
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याविरोधातील वंशभेदी तसंच महिलाविरोधी आक्षेपार्ह पोस्ट्स, मीम्स आणि कॉमेंट्स फेसबुकनं हटविल्या आहेत.
बीबीसीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर फेसबुकनं हे पाऊल उचललं आहे. तीन गट सातत्यानं आपल्या फेसबुक पेजवरून द्वेष पसरविणाऱ्या गोष्टी पोस्ट करत असल्याचं बीबीसीनं फेसबुकला सांगितलं होतं.
"द्वेष पसरविणाऱ्या 90 टक्के पोस्ट्स या कोणीही तक्रार करणाऱ्यापूर्वीच आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवतो," असं फेसबुकचं म्हणणं आहे.
कमला हॅरिस यांच्यासंदर्भातल्या आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या असल्या तरी अशा प्रकारचा मजकूर पोस्ट करणाऱ्या गटांविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याचंही फेसबुकनं स्पष्ट केलं आहे.
माध्यमांवर निगराणी ठेवणारी संस्था मीडिया मॅटर्सचे अध्यक्ष एंजेलो कॅरुसोन यांनी याबद्दल बोलताना म्हटलं, "मीडियानं तक्रार केल्यानंतर या पोस्ट हटविल्यावरून हेच दिसून येतंय की, फेसबुकचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वं किती पोकळ आहेत. त्यांचं पालन करण्यासाठी फेसबुककडून फारसे प्रयत्न होत नाहीत."
भारताबद्दल कमेंट्स
या फेसबुक पेजेसवर कमला हॅरिस यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. उदाहरणार्थ- त्या अमेरिकन नागरिक नाहीत, कारण त्यांची आई भारतीय होती आणि वडील जमैकन.
त्यांच्या नावाची चेष्टा करणारे मीम्सही पोस्ट करण्यात आले होते. 'त्यांना भारतात डिपोर्ट करायला हवं,' असं काही कमेंट्समध्ये म्हटलं होतं.
एका फेसबुक पेजवर 4 हजार मेंबर्स होते आणि दुसऱ्या एका पेजवर 1200.
या फेसबुक पेजवर काही अश्लील मजकूर तसंच महिलाविरोधी पोस्ट्सही होत्या. त्याही हटविण्यात आल्या आहेत.
फेसबुकवरून द्वेषमूलक मजकूर हटविण्याबाबत पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप वारंवार फेसबुकचे जाहिरातदार आणि नागरी अधिकार समूह करताना पहायला मिळतात. ऑऑग्स
ऑगस्ट महिन्यात अनेक कंपन्यांनी विरोधाचं पाऊल म्हणून फेसबुकवर जाहिराती देणं बंद केलं होतं.
'द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट्स'
कमला हॅरिस यांच्याबद्दल पोस्ट्सच्या प्रकरणाआधीही काही समूहांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "फेसबुकची मॉडरेशन सिस्टम वंशवादी आणि द्वेष पसरविणाऱ्या गोष्टी पकडू शकत नाहीत किंबहुना काही प्रकरणात अशा गोष्टींना प्रोत्साहनच दिलं जातं."
'स्टॉप हेट फॉर प्रॉफिट' नावाच्या गटाचे रिशाद रॉबिन्सन यांनी बीबीसीला सांगितलं होतं, की "फेसबुकनं असं अलगॉरिदम बनवलं आहे जे द्वेष पसरविणाऱ्यांना अधिक प्रलोभित करतं."
फेसबुकनं ऑगस्ट महिन्यात झालेल्या आपल्या ऑडिटमध्ये म्हटलं होतं की, "कंपनीनं द्वेष पसरविणाऱ्या मजकूराबद्दल काही निर्णय घेतले आहेत."
गेल्या आठवड्यात जो बायडन यांच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने फेसबुकवर टीका केली होती. फेसबुकला अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरही हिंसा परविण्यास उत्तेजन देणाऱ्या किंवा चुकीची माहिती पसरविणाऱ्या पोस्ट्सवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं होतं.
जो बायडन यांच्या डेप्युटी प्रेस सचिवांनी म्हटलं होतं- "लोकशाहीला लक्ष्य बनविण्यात येत आहे. आम्हाला उत्तर आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)