... आणि नऊ वर्षांच्या चिमुकल्या अनिताच्या स्वप्नांचा शेवट असा झाला

    • Author, जियार गोल
    • Role, बीबीसी फारसी

इराण मधील कुर्द येथे राहणाऱ्या एका लहान मुलीचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असताना एका कुटुंबाने परदेशात एक चांगलं आयुष्य जगण्याचं पाहिलेलं स्वप्न दिसतं.

या व्हीडिओ क्लिपमध्ये असलेली नऊ वर्षांची चिमुकली मुलगी कधी हसताना दिसते तर कधी रडताना. ती सांगते, 'माझं नाव अनिता इरान्झाद आहे. मी सारदश्तची आहे.'

एका शॉर्ट फिल्मसाठी ही स्क्रीन टेस्ट होती. त्यांच्या गावात शूट करण्यात आली. व्हीडिओच्या आवाजात मागून तिचे वडील रसूल इरान्झाद बोलत असतात. ते म्हणतात, 'मला एक अभिनेत्री व्हायचे आहे असे सांग.'

यातून एका वडिलांचा अभिमानच नव्हे तर त्यांच्या अपेक्षाही कळतात. आपल्या मुलीने तिची स्वप्न पूर्ण करावीत असे त्यांना वाटत होते. पण राजकीयदृष्ट्या शोषित आणि मागासलेल्या भागातील एका मुलीसाठी असे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करणं म्हणजे मोठं आव्हान.

हे कुटुंब पश्चिम इराणमधील कुर्दबहुल शहरातील सारदश्त गावाचे रहिवासी आहेत.

हा व्हीडिओ शूट झाल्यानंतर वर्षभराने रसूल, त्यांची पत्नी शिवा पनाही आणि त्यांची तीन मुलं अनिता, सहा वर्षांचा आर्मिन आणि 15 महिन्यांचे बाळ आर्तिन युरोपच्या एका धोकादायक प्रवासासाठी निघाले.

पण एका चांगल्या आयुष्याची स्वप्न पाहिलेल्या या कुटुंबांच्या अपेक्षांचा 27 ऑक्टोबरला इंग्लिश खाडीत अंत झाला.

खराब हवामानामुळे ब्रिटनकडे जाणारे त्यांचे लहान जहाज बुडू लागले. अनितासह तिन्ही मुलं एका छोट्या खोलीत अडकली. त्यांच्याकडे लाईफ जॅकेटही नव्हते.

35 वर्षांच्या रसूल यांनी ऑगस्टमध्ये आपल्या कुटुंबासह इराण सोडले होते. यामागे काय कारण होते हे सांगताना त्यांच्या नातेवाईकांचा थरकाप उडतो. रसूल यांना आपले आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचे होते असे अनेकांना वाटते.

इराणच्या पश्चिमेकडील अझरबैजान प्रांतात सारदश्त नावाचे छोटे गाव आहे. हे गाव इराण सीमेजवळ आहे. इथे जिवंत राहण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. इथे स्वप्न केवळ स्वप्नंच बनून राहतात.

या ठिकाणी कामासाठी मोठे उद्योग किंवा कंपन्या नाहीत. बेरोजगारीची परिस्थिती गंभीर आहे. इथल्या कुर्द लोकांसाठी पुढे जाण्याचे पर्याय मर्यादित आहेत.

अनेक लोकं इराकमधील कुर्दिस्तान येथून मालाची तस्करी करत आहेत. याचा फारसा फायदा होत नाही आणि हे फार सुरक्षितही नाही. पुष्कळ लोक प्रवासात फक्त दहा डॉलर्सपर्यंत कमावतात.

गेल्या काही वर्षांत इराणच्या सीमा सुरक्षा रक्षकांनी शेकडो तस्करांची गोळ्या घालून हत्या केली आहे. अनेक जण दुर्गम डोंगराळ टेकड्यांमधून जाताना खाली कोसळले आहेत, तर काही जण हिवाळ्यात बर्फाखाली गाडले गेले आहेत.

या भागात मोठ्या संख्येने सैन्यबळ तैनात असते. 1979 च्या इराणी क्रांतीनंतर इराणी सुरक्षा दल आणि सशस्त्र कुर्द गट यांच्यात संघर्ष झाला. आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या या कुर्द दलांना परदेशातून मदत मिळते असे इराणला वाटते.

इराणच्या 8.2 कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ 10 टक्के कुर्द आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, देशातील तुरुंगातील निम्म्याहून अधिक राजकीय कैदी कुर्द आहेत.

गेल्या वर्षी इराणमध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर इराणच्या एजन्सीकडून कुर्द जनतेला त्रास दिल्याच्या तक्रारी आहेत.

इराकच्या पश्चिम सीमेजवळील कुर्दबहुल शहरांमध्ये ही निदर्शने सुरू झाली आणि इराणमधील अनेक प्रमुख शहरांपर्यंत पोहोचली.

शिवाच्या एका मैत्रिणीने बीबीसीशी बोलताना सांगितले, रसूल सरकारी एजंसीपासून आपला बचाव करू पाहत होते. तिने दिलेल्या माहितीनुसार शिवाच्या कुटुंबाकडे जे काही होते ते त्यांनी विकले आणि युरोपला जाण्यासाठी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घेऊन तस्करांना दिले होते.

कुर्द प्रवाशांचे आवडीचे ठिकाण असलेल्या ब्रिटनमध्ये त्यांना पोहचायचे होते. त्यांना असा विश्वास होता की ब्रिटन युरोपातील उर्वरित देशांच्या तुलनेत मर्यादित प्रवाशांचाच स्वीकार करतो. त्यामुळे त्यांना तिथे अधिक चांगल्या संधी मिळतील.

या कुटुंबाचा पहिला मुक्काम तुर्की येथे होता. रसूल यांच्या मित्राने बीबीसीला दिलेल्या एका व्हीडिओ क्लिपमध्ये रसूल कुर्द भाषेत गाणं गात आहेत. यावेळी त्यांचे कुटुंब युरोपला नेणाऱ्या तस्करांच्या प्रतीक्षेत होते.

रसूल गात आहेत, "मेरे दिल में दर्द है, गहरा ग़म है.....लेकिन मैं क्या करूं, मुझे अपने कुर्दिस्तान को छोड़ना है और जाना है..." रसूल हे गाणं गात होते तेव्हा त्यांचा मुलगा आर्मिन हसत होता. त्यांची मुलगी आर्तिन त्यांच्या मांडीवर बसते.

कुर्द लोकांमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, 'डोंगरांशिवाय आपला कुणीही मित्र नाही.'

पहिल्या महायुद्धानंतर उस्मानिया सल्तनत संपुष्टात आली. त्यानंतर विजयी पाश्चिमात्य देशांनी कुर्दांना स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिले. पण प्रादेशिक शक्तींनी तो करार कधीच स्वीकारला नाही.

स्वतंत्र राष्ट्राऐवजी कुर्दांची जमीन मध्यपूर्वेतील नव्याने मुक्त झालेल्या देशांमध्ये विभागली गेली. तेव्हापासून जेव्हा कुर्दांनी इराण, तुर्कस्तान, सीरिया किंवा इराकमध्ये स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला तेव्हात्यांचा आवाज दाबण्यात आला.

पूर्वी तुर्कस्तान हे इराणी निर्वासितांचे आवडते ठिकाण होते. पण गेल्या सात वर्षांत वातावरण बदलले आहे. आणि ते आता कुर्द निर्वासितांचे आश्रयस्थान राहिलेले नाही. तुर्की सैन्याने कुर्द निर्वासितांना पोलीस स्टेशनमध्ये त्रास दिल्याच्या किंवा त्यांना इराणला परत पाठवल्याच्या बातम्या आल्या आहेत.

इस्तंबूलमध्ये इराणी वंशाच्या अनेक लोकांची राजकीय हत्या आणि अपहरणाच्या घटना घडल्या आहेत.

या परिस्थितीत रसूल आणि शिवा आपल्या कुटुंबासह तुर्कस्तानहून जाण्यास उत्सुक होते. सप्टेंबर महिन्यात त्यांना एक तस्कर भेटला आणि त्याने त्याला सुमारे 28,000 डॉलर्स दिले. तस्कर त्यांना तुर्कस्तानहून इटलीला आणि नंतर लॉरीने उत्तर फ्रान्सला घेऊन गेले.

डंकर्क या फ्रेंच किनारपट्टीवरील शहरात एका धर्मादाय संस्थेत काम करणारी स्वयंसेवक शार्लट डेकॅन्टरला शिवा कुर्द निर्वासितांच्या छावणीत भेटली. ती तिथे अन्न वाटप करण्यासाठी गेली होती. शार्लट शिवाच्या आनंदी व्यक्तिमत्त्वानं प्रभावित झाली.

ती म्हणाली, 'ती लहानखुरी होती. अतिशय दयाळू आणि गोड होती. मी कुर्द भाषेत काही शब्द बोलले तर ती जोरजोरात हसू लागली. तिला धक्काच बसला.'

फ्रान्समध्ये शिवा आणि रसूल यांच्यासोबत एक अपघात झाला होता. त्यांचे सर्व सामान लूटले होते.

24 ऑक्टोबरला कैले येथे राहणाऱ्या एका मैत्रिणीला शिवाने संदेश पाठवला होता. त्यानुसार त्या सांगत होत्या की, जहाजातून प्रवास करणं धोकादायक आहे. पण लॉरीतून जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.

टेक्ट्स मेसेजमध्ये त्यांनी सांगितले होते, "मला कल्पना आहे की, हे धोकादायक आहे. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही."

आश्रय मिळवण्यासाठी ती किती आतूर होती हे ती सांगते. 'माझ्या मनात हजारो दु:ख आहेत. पण आता मी इराण सोडले आहे. मला माझे जुने आयुष्य विसरायचे आहे.'

रसूल यांच्या कुटुंबासोबत फ्रान्सकडे रवाना झालेला त्यांचा एक मित्र सांगतो की, 26 ऑक्टोबरला डंकर्कमध्ये एका तस्कराने कळवले की दुसऱ्याच दिवशी इंग्लिश खाडी पार केली जाईल. सकाळीच ते तेल डेपोजवळील एका दुर्गम ठिकाणाहून बीचकडे जाण्यासाठी निघाले. ही जागा लून प्लाज बीचवर आहे.

हवामान अत्यंत खराब होते. दीड मीटर उंच लाटा उसळत होत्या. तीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत होता.

रसूलच्या मित्राने हा धोकादायक प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. तो सांगतो, "मी घाबरलो होतो. म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतला. मी रसूलला सांगितले की हा धोकादायक मार्ग आहे. पण तो म्हणाला त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही."

इराणमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या मते, रसूलने तस्करांना सुमारे साडेपाच हजार ब्रिटिश पौंड दिले होते.

सारदास्त येथे राहणारे अभिनेता आणि डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर 47 वर्षांचे इब्राहिम मोहम्मदपूर हे सुद्धा आपला 27 वर्षांचा भाऊ मोहम्मद आणि 17 वर्षीय मुलासोबत त्या जहाजातून प्रवास करत होते.

ही बोट केवळ साडेचार मीटर लांब होती असं इब्राहिम सांगतात. यात आठ प्रवाशांसाठी जागा नव्हती. पण 23 प्रवासी भरले होते. इब्राहिम सांगतात, "प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आम्ही सर्व आंधळे झालो होते. आम्ही या प्रवासात बरेच काही सहन केले होते. हा प्रवास करू नये असा विचार मनात आला. पण नंतर वाटले सर्व त्रासांमधून सूटका होण्यासाठी प्रवास करावा."

16 वर्षीय यासीन जे बोटीत बसले होते ते सांगतात की केवळ त्यांनी आणि आणखी दोन प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले होते. रसूल यांच्या कुटुंबातील कुणीही लाईफ जॅकेटमध्ये नव्हते.

बोटीत बसलेले सर्व 22 प्रवासी सारदश्तचे कुर्द होते, तर खलाशी उत्तर इराणमधून निर्वासित होता. पूर्वी असाच प्रवास केलेले प्रवासी सांगातात, ज्या प्रवाशाने सर्वात कमी पैसे दिले त्याला तस्कर बोट चालवण्यासाठी सांगतात.

शिवा आणि मुलं काचेच्या एका कॅबिनमध्ये गेले. त्यांना ही जागा सुरक्षित आणि ऊब देणारी वाटली असावी. पण हीच जागा जीवघेणी ठरली.

इब्राहिम सांगतात, जवळपास आठ किमी प्रवास केल्यानंतर बोटीत पाणी भरले. "पाणी बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला पण अयशस्वी ठरलो. आम्ही पुन्हा कैले येथे पोहचण्याचाही प्रयत्न केला पण त्यातही आम्हाला यश आले नाही."

त्यांचे भाऊ मोहम्मद सांगतात, बोटीत बसलेले प्रवासी बिथरले होते. बोटीत इकडून तिकडे जात होते आणि अचानक बोट बुडाली. यानंतर नेमके काय झाले हे सांगणं कठीण आहे. कारण वाचलेल्या प्रवाशांची वक्तव्य यासंदर्भात स्पष्ट नाहीत.

सुरुवातीला शिवा आणि मुलं कॅबिनमध्ये अडकलेले दिसले असं सर्वजण सांगतात. इब्राहिम सांगातात, रसूल पाण्यात गेले आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठीही त्यांनी आवाज दिला.

विद्यापीठाचे विद्यार्थी सांगातात की त्यांनी काचेचे कॅबिन तोडण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. चिमुकल्या आर्तिनला त्यांनी पाण्यावर तरंगताना पाहिले.

शिवाचे भाऊ रासो सांगतात की, रसूल यांनी आर्तिन यांना बाहेर काढले आणि मग इतरांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा आत गेले.

हे सर्व सांगताना इब्राहिम यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी अनिताला पाण्यात तरंगताना पाहिले होते. तिचा हात त्यांना पकडता आला. ते सांगतात, "त्या लहान मुलीचा हात मी पकडला. मला वाटलं ती जिवंत आहे. एका हाताने मी बोट पकडली होती आणि दुसऱ्या हाताने आर्तिनचा हात. तिला हलवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती जिवंत आहे हे कळू शकेल पण तिने काहीच हालचाल केली नाही."

ते रडत रडत सांगत होते, "मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही."

इब्राहिम यांचे भाऊ मोहम्मद यांच्यानुसार रसूल रडत रडत पाण्याच्या बाहेर आले होते आणि त्यांनी पुन्हा स्वत:ला लाटांच्या हवाली केले.

फ्रान्सच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता जवळून जाणाऱ्या एका नौकेने आलार्म वाजवला. यानंतर 17 मिनिटांनी सुरक्षा जहाज घटनास्थळी पोहचले. काही प्रवाशांना हार्ट अटॅक आला असताना त्याच परिस्थितीत पाण्यातून बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली नाही.

जिवंत बाहेर आलेल्या प्रवाशांशी आम्ही बोललो. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार रसूल, त्यांची पत्नी शिवा, मुलगी अनिता आणि आर्मिन यांचा मृत्यू झाला होता. 15 प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चिमुकल्या आर्तिनचा अद्याप शोध लागलेला नाही. पण तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आर्तिनला लाटांमध्ये बुडताना पाहिले होते असं यासीन सांगतात.

इराणी नागरिक ज्याला खलाशी मानले जात होते त्याला फ्रान्समध्ये न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्या केल्याचे आरोप आहेत.

शिवाचे भाऊ आणि बहीण युरोपात राहतात. मृतदेहांना पाहण्यासाठी ते डंकर्क येथे पोहचले. इंग्लिश खाडीचा धोकादायक प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

2018 मध्ये छोट्या बोटींमधून 297 प्रवासी ब्रिटनला पोहचले होते. 2019 मध्ये 1860 लोक ब्रिटनमध्ये दाखल झाले.

बीबीसीच्या विश्लेषणानुसार आतापर्यंत जवळपास 8 हजार लोकं हा प्रवास करून ब्रिटनला स्थलांतरित झाले आहेत.

2019 पासून आतापर्यंत कमीतकमी दहा लोकांचा या धोकादायक प्रवासमुळे मृत्यू झाला आहे. यात बहुतांश प्रवासी इराणचे आहेत.

निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनुसार, ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यापूर्वी लोकांना अर्ज करण्याची सुविधा दिली पाहिजे.

या घटनेतून प्राण वाचलेल्या लोकांना वेदनादायी स्वप्न पडत आहेत. तरीही यासीन यांना हा धोकादायक प्रवास पुन्हा करण्याची इच्छा आहे.

'आम्ही सगळे खूप दु:खी होतो. मी खूप घाबरलो होतो. मला एका सुरक्षित जागी पोहचायचे आहे. यासाठी मी पुन्हा प्रयत्न करेन.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)