रशियाने घडवला अझरबैजान-आर्मेनियामध्ये तह, सैन्य संघर्ष होणार समाप्त

फोटो स्रोत, EPA
आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून पेटलेला संघर्ष संपण्याची शक्यता आहे. रशियाच्या हस्तक्षेपानंतर अझरबैजान आणि आर्मेनियाने शांतता करारावर हस्ताक्षर करण्याचं मान्य केलं आहे.
या तिन्ही देशांनी वादग्रस्त भागातला सैनिक संघर्ष संपवण्यासाठी शांतता करारावर सह्या केल्यात.
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांनी या शांतता कराराला 'आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी वेदनादायक' असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे या करारात?
सोमवारी, 9 नोव्हेंबरला रात्री उशिरा झालेल्या या कराराअंतर्गत अझरबैजान आपल्या या संघर्षात ताब्यात घेतलेला प्रदेश स्वतःकडेच ठेवेल असं ठरलं आहे. पुढच्या काही आठवड्यात आर्मेनियाही आसपासच्या काही भागातून मागे हटण्यासाठी तयार झाला आहे.
रशियाने या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता फौज पाठवली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष या कराराबद्दल बोलताना म्हणाले की, "जवळपास दोन हजार रशियन सैनिक या भागात पाठवले आहेत." हे सैनिक आर्मेनियाला स्तेप्नाकियर्तशी जोडणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवतील.
याशिवाय शांतता करारांतर्गत दोन्ही देश युद्धकैद्यांनाही हस्तांतरित करतील. अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव यांनी म्हटलंय की या शांतता प्रक्रियेत तुर्कस्थानही भाग घेईल.
यावर काय प्रतिक्रिया आल्यात?
राष्टाध्यक्ष अलीयेव यांनी म्हटलंय की हा शांतता करार 'ऐतिहासिक' आहे ज्यावर आर्मिनियाने 'इच्छेविरूद्ध सही केली आहे.'
तर दुसरीकडे आर्मेनियाचे पंतप्रधान पाशिन्यान यांनी म्हटलंय की परिस्थिती पाहून तसंच या भागातल्या जाणकारांशी बोलून 'गहन विचार करून' हा करार करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी म्हटलं, "हा नक्कीच विजय नाहीये, पण जर तुम्ही स्वतःला पराभूत समजत नसाल तर हा पराभवही नाहीये." आर्मेनियाची राजधानी येरेवानमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन या कराराचा विरोध करत आहेत.

फोटो स्रोत, Barcroft media
अझरबैजानच्या राष्ट्रपतींनी म्हटलंय की नागोर्नो-काराबाख भागातल्या एका महत्त्वाच्या शहराला त्यांच्या सैन्याने ताब्यात घेतलं आहे. रविवार, 8नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या एका टेलिव्हिजन संदेशात अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव यांनी म्हटलं की त्यांनी शुशा नावाच्या शहराला ताब्यात घेतलं आहे.
नागोर्नो-काराबाख1700 चौरस मैलांचा डोंगराळ भाग आहे जो सोव्हियत संघाचं विघटन व्हायच्या आधीच स्वायत्त झाला होता आणि अझरबैजानचा भाग झाला.
पारंपरिकदृष्ट्या इथं ख्रिश्चन आर्मेनियाई आणि तुर्क मुसलमान राहातात. या भागावरून आर्मीनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांत तीस वर्षांआधीही संघर्ष झालेला आहे.
हाच भाग आर्मेनिया-अजरबैजान या देशांमधला वादग्रस्त भाग ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा भाग अझरबैजानचा हिस्सा समजला जातो. पण 1994 पासून हा भाग स्थानिक आर्मेनियन लोकांच्या हातात आहे.
सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये पुन्हा भडका पेटला आणि हिंसा सुरू झाली.दोन्ही देशांनी या हिंसेचं कारण म्हणून एकमेकांकडे बोट दाखवलं आहे.
सध्याची परिस्थिती काय?
नागोर्नो-काराबाखची राजधानी स्तेप्नाकियर्त(जिला अझरबैजानमध्ये खानकेन्दी या नावाने ओळखलं जातं)च्या वरच्या बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर शुशा शहर वसलेलं आहे. स्तेप्नाकियर्तहून आर्मीनियाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हे शहर वसलं आहे. जर हे शहर अझरबैजानच्या ताब्यात गेलं तर अझेरी सेनेला स्तेप्नाकियर्तवर हल्ला करणं अधिकच सोपं होईल.

फोटो स्रोत, Reuters
शुशा शहराचं महत्त्व
अझरबैजान आणि आर्मेनिया दोन्ही देशांसाठी शुशा शहराचं वेगवेगळं सांस्कृतिक महत्त्व आहे. 1980च्या शेवटी आणि 1990च्या सुरूवातीला दोन्ही देशांमध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्या आधीपर्यंत या भागात मुख्यकरून अझेरी लोकांची वस्ती होती. पण युद्धामुळे हजारो लोकांना आपलं घर सोडून परागंदा व्हावं लागलं.
आर्मेनियासाठी या शहरात पवित्र समजलं जाणार ऐतिहासिक गजानचेत्सोत्स चर्च आहे. हे आर्मेनियातल्या सगळ्यांत जुन्या आणि मोठ्या असणाऱ्या चर्चपैकी एक आहे. मागच्या महिन्यात आर्मेनियाने अझरबैजानवर या चर्चवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. अर्थात दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे की ते सामान्य नागरिकांवर हल्ला करत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








