बिहार निवडणूक निकाल : 'नितीश कुमार यांचं देशातील मोठ्या नेत्याचं स्थान डळमळीत करण्यात भाजपला यश'

फोटो स्रोत, Hindustan Times
नितीश कुमार यांच्याविरोधात Anti Incumbency एक्झिट पोल्समध्ये दिसून येत होती. तर, आरजेडीच्या तेजस्वी यादवांच्या तरूण नेतृत्वाला लोकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत होता. मग, अचानक सत्तेची समीकरणं का बदलली? पोलस्टरचे अंदाज का चुकले? याच विषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी सिद्धनाथ गानू यांनी चर्चा केली. त्या चर्चेचा हा संपादित अंश.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
एक्झिट पोलमध्ये Anti Incumbency दिसली होती. तिचं काय झालं? तेजस्वींकडून काय कमतरता राहिली?
प्रा. सुहास पळशीकर- एक्झिट पोलमधून आपल्याला ट्रेड कळू शकतो. आपण एक्झिट पोल्स नीट पाहिले तर, त्यात हीच परिस्थिती दाखवण्यात आली होती. त्यांनी महागठबंधन येईल असं म्हटलं होतं. आकडे मागे-पुढे होतील, पण बहुमत काढावरचं मिळेल. असा एक्झिट पोलचा अंदाज होता.
Anti Incumbency ही दोन प्रकारची असते. एक सरकार विरोधात असते. या ठिकाणी जेडीयू म्हणजे नीतीश कुमार असं समीकरण तयार झालं होतं.
दुसरी Anti Incumbency ही आमदारांबद्दल असते. बिहारमध्ये यावेळी जेडीयू आणि भाजपच्या विद्यमान आमदारांबद्दत जास्त नाराजी होती. सरकारवरची नाराजी आमदारांवरील नाराजीत परिवर्तित होते तसं झालं. हे ओळखून भाजपने बऱ्याच जागा बदलल्या. मात्र जेडीयूने बदलल्या नाहीत. त्यामुळे हा निकाल इतका गुंतागुंतीचा पाहायला मिळतोय.
भाजपचं इलेक्शन आहे हे खरं आहे. पण, त्यांची डबल इंजिनची उपमा आठवत असेल. गाडी वेगाने धावली तर दिल्लीतील इंजिन त्यासाठी कारणीभूत असतं. गाडी नीट चालली नाही तर पाटण्यातील इंजिन चांगलं चाललं नाही असं म्हणतात. हा खेळ सगळीकडे चालतो. केंद्र म्हणतं आम्ही पैसे दिले पण राज्याने लोकांपर्यंत पोहोचवले नाहीत. यावेळी त्यांनी असं म्हटलं नाही. कारण, ते त्यांचे पार्टनर होते. पण, अप्रत्यक्ष सूचक हेच होतं.
राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले असले तरी, राज्यातील मोठ्या पक्षाला खच्ची केल्याशिवाय भाजप तिथे वाढू शकत नाही. त्यामुळे भाजप दाखवणार नाही, पण त्यांना ही संधी वाटत असणार. त्यांचा बिहारमध्ये शिरकाव झालाय. आता पक्ष पसरवण्याची संधी आहे.
एनडीएचा विजय झाला असला तरी हा नितीश कुमारांचा पराभव मानायचा का?
प्रा. सुहास पळशीकर - एक मुख्यमंत्री म्हणून, सुशासन बाबू म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्याअर्थाने त्यांच्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? मला असं वाटतं, त्यांनी म्हटलं होतं ही माझी शेवटची निवडणूक आहे. नंतर त्यांनी हे वक्तव्य नाकारलं. पण, लोकांनी त्यांची ही शेवटची निवडणूक असं ठरवलं असणार.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
त्यात चिराग पासवान यांनी विरोधात मोहिम उघडली. त्यामुळे सर्व त्यांच्या विरोधात गेले. आरजेडी त्यांच्या विरोधात जाणार हे स्पष्ट होतं. कारण, पाच वर्षांपूर्वी त्यांनी त्यांना फसवलं. नितीश कुमार कमी झाल्याशिवाय भाजपची ताकद वाढू शकत नाही. त्यात चिराग पासवान यांचा पत्ता. त्यामुळे या निवडणुकीचा पहिला निष्कर्ष म्हणजे, जनता दल नावाच्या पक्षाची मोठ्या प्रमाणावर पिछहाट आणि नितीश कुमार यांचं देशातील मोठे नेते असं स्थान ढासळलं.
नितीश कुमार 2017 साली भाजपसोबत गेले, तेव्हापासूनच माझ्यामते त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आत्मघातकी चाल त्यांची राहिली. ते भाजपसोबत जाऊन पंतप्रधान होणं शक्य नव्हतं. त्यामुळे बिहारच्या काही अडचणींमुळे त्यांना भाजपसोबत जावं लागलं. पण, त्यांचा आता पराभव होतोय अशी परिस्थिती आहे.
यातून डोकं वर काढणं त्यांना वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षासाठी फार कठीण जाणार आहे.
बिहारमध्ये महाराष्ट्रासारखं काही होईल याची शक्यता वाटते?
प्रा. सुहास पळशीकर- नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करून राष्टीय जनता दल अशा तडजोडीला तयार होईल का, हा खरा प्रश्न आहे. तडजोड झालीच तर अशी कल्पना करू, तुम्ही आमच्यासोबत या. तुमच्या पक्षातील नेत्यांना मंत्री करतो, तुम्ही भाजपच्या भाषेत बोलायचं झालं तर सिनिअर सल्लागार मंडळात रहा. ही तडजोड होऊ शकते. मात्र, ही नितीश कुमार यांच्या फायद्याचं नाही. त्यांनी हा रस्ता 2017 साली बंद करून घेतला आहे.
ते म्हणाले होते, भ्रष्टाचारी सहकाऱ्यांसोबत राहायचं नाही. मी राजीनामा देतो. आणि दुसऱ्या दिवशी भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. ही जखम राजकारणात 31 वर्षांचा नेता मान्य करणार नाही. तेजस्वी यांचं राजकारण आता सुरू झालं आहे. तर नितीश कुमार यांचं संपलंय. त्यामुळे ही खूप अवघड गोष्ट आहे.
मोठा भाऊ भाजप नितीश कुमारांना डोईजड होईल?
प्रा. सुहास पळशीकर - आता नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी ते भाजपच्या उपकाराच्या ओझ्याखाली झालेले मुख्यमंत्री असतील. त्यात त्याचं कर्तृत्व शून्य असेल. या दोन्ही पक्षाचं जागावाटप पाहिलं तर लक्षात येतं, या भावा-भावांमधील अंतर निवडणुकीआधीच संपलं होतं.
जागावाटपात फक्त एका जागेचा फरक होता. त्यावेळीच भाजपने जेडीयूला संकेत दिला होता. आम्ही आमच्या हिंमतीवर जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे मुख्यमंत्रिपद घ्यायचं पण सर्व अधिकार भाजपच्या मंत्र्यांकडे असतील हे स्वीकारावं लागेल.
हे सरकार भाजपने चालवलेलं भाजपचं सरकार असेल. त्याला नाव एनडीएच सरकार असं असेल.
या निकालांमुळे देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून बूस्ट मिळेल?
प्रा. सुहास पळशीकर- मुळात देवेंद्र फडणवीसांना बिहारमध्ये का पाठवलं. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे प्रमोशन आहे. राष्ट्रीय राजकारणात जाण्यासाठी एक ट्रायल म्हणून बिहार दिलं. बिहारमध्ये फार काही वेगळं घडलेलं नाही. 70-75 टक्के जागा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही. ते क्लेम करू शकतील मला खूप यश मिळालं आहे.

फोटो स्रोत, @NitishKumar
मग त्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात जायचं असेल किंवा नेलं असेल तर, दुसरी राजकीय सोय म्हणजे महाराष्ट्रात फडणवीस नको असलेले अनेक भाजप नेते आहेत. भाजपची महाराष्ट्रातील अस्वस्थता कमी होते. फडणवीसांसारखा संघटक, अभ्यासू नेता दिल्लीतील राजकारणात गेला तर त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो.
त्यामुळे फडणवीसांना तिथे पाठवलं जाणं, हे एखादा पक्ष कसं काम करतो. आपल्या कार्यकर्त्यांना कमीतकमी दुखवून त्यांची इतरत्र सोय कशी लावतो हे बघण्यासाठी आवश्यक आहे.
हे यश फडणवीसांना मिळालं असं मानायचं का नाही? त्यांना नक्की काय जबाबदारी दिली होती. जेडीयूला कमी करा की आपले वाढवा. याच्यावर पुढील सर्व गोष्टी ठरतील.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार असेल तर पुढचे तीन वर्षं त्यांना गप्प बसावं लागेल. याउलट ते मला केंद्रात मंत्रिपद द्या असं बार्गेन करू शकतील. राज्यात परत यायचं का नाही तर नंतर ठरवतील. त्यामुळे फडणवीसांना त्यांना दिल्लीत किती काळ रहायचं आहे? आणि त्यावेळी भाजपची असलेली परिस्थिती यावरून ते परत महाराष्ट्रात येतील का नाही हे कळेल.
यापुढील निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
प्रा. सुहास पळशीकर- वातावरण म्हणून बिहार आणि बंगालचा एकमेकांवर परिणाम होणार यात काही संशय नाही. बंगालमध्ये असलेले गरीब बिहारी यानंतर कोणाला मत देतील? या अर्थाने बिहार आणि बंगालचा संबंध आहे.
रणनीती म्हणून विचार केला तर बंगालमध्ये अत्यंत आक्रमक अशा ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांची स्पर्धा आहे. अमित शहा यांच्या जाण्याचं कारण म्हणजे, त्यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा आणि जिंकणं अतोनात अवघड मुद्दा आहे. बंगालमध्ये ते मोठा पक्ष म्हणून पुढे येतील. पण, त्यांच्यासोबत जाणारं कोणीच नाही. डावे, तृणमूल आणि कांग्रेस यांच्यातील पाडापाडीचा भाजपला फायदा होईल. पण, पाडापाडी अत्यंत कमी होऊ दिली तर पश्चिम बंगाल भाजपसाठी अवघड राज्य आहे.
डाव्या पक्षांच्या या निवडणुकीतील कामगिरीकडे आपण कसं पाहू शकतो?
प्रा. सुहास पळशीकर- डाव्या पक्षांचं आपापसात जमत नाही. राज्यातील युनिट्सच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे एकत्र येऊन राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने काही करावं याचा विचार करण्यासाठी लागणारं नेतृत्व आता डाव्यापक्षांकडे नाही.
डावे आणि उजवे कम्युनिस्ट यांना एकत्र आणून धोरणात्मक निर्णय घेणारं नेतृत्व आता नाही. नेतृत्व नसल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची. याबाबत माक्सवादी पक्षातच मतभेद आहेत.
त्यात केरळमध्ये त्यांचा काँग्रेसला विरोध आहे. पश्चिमबंगालमध्ये काँग्रेससोबत गेले तरी पंचाईत आहे आणि तृणमूलसोबत जाण्याचा प्रश्नच नाही.
बिहारमधला विजय हा स्थानिक पातळीवर वर्षानुवर्ष संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाचं फळ आहे. यातून देशात डावीशक्ती पुन्हा येईल का? तर माहीत नाही. कारण, यासाठी पंजाब, तामिळनाडू या राज्यातील डाव्यांना एकत्र घ्यावं लागेल.
या निवडणुकीचे महत्त्वाचे हायलाईट्स?
प्रा. सुहास पळशीकर- भाजपशी मुकाबला करण्यासाठी विविध पक्षांना आघाड्यांचं राजकारण करावं लागेल. दुसरीकडे, फक्त जागावाटपाबद्दल हे मर्यादीत न राहता. आपण कोणासोबत नाही, तर कोणाविरोधात आघाडी करतोय याची स्पष्टता गरजेची आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times/ Getty Images
ही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातून दिसत नाही. त्यांचं नेतृत्व अजूनही बिहारपुरता आणि बिहारचा विचार करणारं नेतृत्व आहे. यात चुकीचं काही नाही. जर, त्यांना भारताच्या राजकारणात मोठं व्हायचं असेल तर, बिहारचं उदाहरण घेऊन त्यांना विविध पक्षांशी संपर्क करावा लागेल. इथून मोठं राजकारण झालं तर भारताच्या राजकारणाला कलाटणी देण्याची सूचना या निवडणुकीतून पराभूत झालेल्या आघाडीला मिळू शकते.
तेजस्वी यादव फक्त काहीकाळ उपमुख्यमंत्री राहिले. त्यापेक्षा त्यांनी काही केलेलं नाही. अशा तरूण नेत्याकडे नेतृत्व जाण्याचा फायदा म्हणजे ते वेगळा विचार करू शकतात. जो त्यांच्या वडीलांनी केला नसता. अशा पद्धतीने राजकारणाकडे पाहण्याचा विचार तेजस्वी करू शकतील. आंदोलनाच्या राजकारणातून लोकमत आपल्याकडे कसं राहिल याची काळजी घेता येईल. यादवांचा पक्ष असा शिक्का त्यांना पुसट करता आला तर बिहारच्या राजकारणात त्यांना भविष्य आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








