बिहार निवडणूक : देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन बिहारच्या निकालामुळे वाढेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बिहारच्या रणसंग्रामात नीतीश बाबूंच्या जेडीयू आणि तेजस्वी यादवांच्या राजदला मागे टाकत, भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलाय.
प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत बिहारी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपच्या पारड्यात आपलं झुकतं माप टाकलं आहे. बिहारच्या राजकारणात सद्यस्थितीत भाजप नंबर एकचा पक्ष बनलाय.
बिहारमध्ये छोटा भाऊ भाजप मोठा भाऊ बनला. भाजपला मोठा भाऊ बनवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका होती, हे नाकारून चालणार नाही. गृहमंत्री अमित शहा यांच्या अनुपस्थितीत बिहार निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बिहारचा किल्ला लढवला.
भाजप नंबर एकचा पक्ष
सद्यस्थितीत भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे. तर, 2015 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 53 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 2015 निवडणुकीच्या तुलनेत बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत.
बिहार निवडणुकीचे निकाल पाहता, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय नेता म्हणून आपली पकड मजबूत केलीये? या निकालांनी फडणवीसांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सिद्ध झालंय? दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन वाढण्यास मदत होईल? या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला.
बिहार निवडणूक प्रभावी देवेंद्र फडणवीस
बिहार निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपली असताना. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांची बिहार निवडणूक प्रभावी म्हणून नेमणूक केली. अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी पहिल्यांदाच देवेंद्र यांच्यावर सोपवण्यात आली होती. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक 105 आमदार निवडून आणले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिल्याचं बोललं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
"बिहार निवडणूक प्रक्रिया, उमेदवार निवड याबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांशी चर्चाकरून केंद्रीय नेतृत्वाला माहिती पुरवली. जातीय समीकरणं, स्थानिक मुद्दे समजून घेतले. पक्षातील अंतर्गत गटबाजी योग्य पद्धतीने हाताळली. त्यामुळे निश्चितच दिल्ली दरबारी त्यांचं राजकीय वजन वाढलं आहे," असं वरिष्ठ संपादक गजानन जानभोर बीबीसीशी बोलताना म्हणाले.
भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, "बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून पक्षाने अधिकृत घोषणा करण्याआधीच एक महिन्यापासून देवेंद्र फडणवीस बिहारच्या तयारीला लागले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांना कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याने ते प्रचारापासून दूर राहिले."
गजानन जानभोर पुढे म्हणतात, "देवेंद्र फडणवीस तरुण आणि अभ्यासू नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपकडून या तरून नेतृत्वाला ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढच नाही तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या भूमिकेत देवेंद्र नक्की दिसून येतील."
फडणवीसांचा बिहारमध्ये प्रचार
"बिहार निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस 21 दिवस बिहारमध्येच ठाण मांडून होते. निवडणूक प्रचाराच्या 10 सभा आणि विविध भागात 12 मिटींग संबोधित केल्या. बिहार भाजपच्या संस्थात्मक मुद्द्यांवर त्यांनी जास्त भर दिला होता," अशी माहिती फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार बिहार निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणात आपली छाप निश्चितच निर्माण केली आहे.
नागपूरच्या टाईम्स ऑफ इंडियाचे सहाय्यक संपादक अभिषेक चौधरींच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या तीन प्रमुख जमेच्या बाजू आहेत.
* बिहारसारख्या राज्याचा प्रभारी म्हणून यशस्वीरीत्या परिस्थिती हाताळल्यानंतर, मोठी राज्य सांभाळण्यासाठी ते तयार आहेत हे त्यांनी दाखवून दिलं

फोटो स्रोत, Getty Images
* मराठी विरुद्ध बिहारी हा सांस्कृतिक वाद हाताळताना दाखवलेली परिपक्वता. सुशांत प्रकरणी ठाकरे सरकार आणि पोलिसांविरोधात थेट न बोलता, अप्रत्यक्षरीत्या सहानुभूती मिळवण्यात यशस्वी
* लालूंसारखा बिहारी मातीत मुरलेला मुरब्बी राजकारणी असताना भाजपला राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनवणं
राजकीय विश्लेषक सांगतात, "महाराष्ट्रात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. शिवसेनेने युती तोडल्याने सत्तेची समीकरणं बिघडली. पण, बिहारच्या यशाने त्यांना पुन्हा बळ दिलंय."
फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जातील?
बिहारच्या यशानंतर देवेंद्र राष्ट्रीय राजकारणात जातील? यावर बोलताना अभिषेक चौधरी म्हणतात, "देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन वाढलं हे निश्चित. पण, ते महाराष्ट्र भाजपचा चेहरा आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यांच्या केंद्रात जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण होईल. ती भरून काढणं अडचणीचं ठरेल."
"दिल्लीत मोदी-शहा यांची जोडी मजबूत आहे. त्यामुळे बिहारच्या यशानंतर केंद्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी, फडणवीस यांना तातडीने राष्ट्रीय राजकारणात सामावून घेतले जाणार नाहीत." असंही ते पुढे म्हणाले.
'फडणवीसांना पूर्ण श्रेय देणं योग्य नाही'
बिहारमध्ये भाजपच्या सर्वात जास्त जागा आणण्याचं श्रेय फडणवीसांना देणं योग्य ठरणार नाही, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
"देवेंद्र फडणवीसांनी अखेरच्या टप्प्यात तब्येतीमुळे बिहारमध्ये प्रचार केला नाही. राज्यात पक्षाची रणनीती ठरवण्यामध्ये त्यांचा काही प्रमाणात सहभाग होता. पण, निवडणुक प्रक्रियेत फारसा रोल नव्हता. उत्तरेकडील राज्यात त्यांनी याआधी काम केलेलं नाही. त्यामुळे भाजपच्या जागा वाढण्याचं श्रेय्य त्यांना देण्याची अजिबात गरज नाही." असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलंय.
ते पुढे म्हणतात, "बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी मोठ्या संख्येने सभा घेतल्या. पक्षाचे वरिष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात देवेंद्र फडणवीस एक होते. ते नापास झाले असं बिलकुल नाही. पण, पूर्ण श्रेय त्यांना देणं योग्य ठरणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"बिहार निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच राजकीय भविष्य मोठं आहे. येत्या काळात राष्ट्रीय राजकारणात ते मोठा रोल प्ले करू शकतात," असं देसाई यांच मत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








