बिहार आणि महाराष्ट्र निवडणुकीत 'या' 7 गोष्टींमध्ये साम्य

नितीश कुमार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

बिहार विधानसभा निवडणूक आणि निकलाच्या घडामोडी पाहताना गेल्या वर्षी महाराष्ट्रात जसा राजकीय पेच निर्माण झाला तशी परिस्थिती निर्माण होईल की काय? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये राजकीय समीकरणं बदलतील का हे आत्ता सांगता येणं कठीण आहे.

पण महाराष्ट्र आणि बिहारच्या निवडणुकीत सात असे मुद्दे आहेत ज्यांमध्ये एकदम साम्य आहे. हे कोणते मुद्दे आहेत पाहूयात,

1. बिहार आणि महाराष्ट्रात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला

2014 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती. भाजपला दिल्लीपासून गल्लीपर्यंत यश मिळाले. पण पाच वर्षांनंतरही निवडणुकांमधलं हे यश कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि अमित शाह

महाराष्ट्रानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. बिहारमध्ये भाजप-जेडीयूनं आघाडी केली आहे.

2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही असंच चित्र होतं.

महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं असलं तरी विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागांवर बाजी मारली होती.

2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेनं विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. यात भाजपच्या 105 जागा निवडून आल्या होत्या.

बिहारमध्येही भाजप आणि जेडीयू आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. तर आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची महाआघाडी निवडणुकीच्या मैदानात होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा भाजपच्या बड्या नेत्यांनी बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

2. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय 'वजन' वाढलं

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्यावर्षी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजपचा चेहरा आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून बिहारमध्येही निवडणुकांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीने निवडणूक लढवली. पण मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही मित्र पक्षांमध्ये वाद झाले. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने भाजपला राज्यात सत्ता गमवावी लागली. यासाठी काही प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली होती.

निवडणूक आयोगानं बिहारमधील निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, "मी स्वत: बिहारला जाऊन आलो आहे. बिहारच्या सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड विश्वास आहे. त्यासोबतच नितीश कुमार, सुशीलकुमार मोदी यांच्या सरकारनं गरीब आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम केलं आहे."

गेल्या निवडणुकीत भाजपची जबाबदारी भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आली होती.

महाराष्ट्रात भाजप सत्ताधारी पक्ष नसला तरी सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला हे वास्तव आहे. विरोधक म्हणून काम करत असतानाही राज्यातील सर्वच मुख्य प्रश्नांबाबत देवेंद्र फडणवीस पक्षाची भूमिका मांडत असतात.

नीतीश कुमार, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, नीतीश कुमार, नरेंद्र मोदी

3. बिहार आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात भाजपच्या मित्रपक्षांच्या जागा घटल्या

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती होती त्याप्रमाणेच बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायडेट (जेडीयू) यांची आघाडी आहे. जेडीयू आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबत निवडणूक लढवली. पण दोन्ही पक्षांचे संख्याबळ निकालनंतर घटल्याचं दिसून आलं.

एकेकाळी शिवसेनेकडे भाजपचा मोठा भाऊ म्हणून पाहिले जात होतं. पण 2014 नंतर महाराष्ट्रातलं चित्र बदललं. भाजपच मोठा भाऊ असल्याचं चित्र समोर आलं.

शिवसेना आणि भाजपची तब्बल 30 वर्षांची युती तुटण्यामागे अनेक कारणं होती. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप मित्र पक्ष असला तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी होण्यामागे भाजप जबाबदार आहे अशीही टीका करण्यात येते.

"अनेक राज्यांत स्वतःची काही ताकद नसताना स्थानिक पक्षाची साथ घेऊन भाजपचा विस्तार झाला. जर शिवसेना नसती तर भाजप महाराष्ट्रात इतका मोठा झालाच नसता. पण शेवट स्थानिक पक्षांचीच मुळं खोदण्याचं काम भाजपनं केलंय. हे महाराष्ट्रानेही पाहिलंय. आता तीच परिस्थिती ते नितीश कुमारांची करू इच्छितात. आणि हे जाणण्याची ताकद नितीश कुमारांसारख्या ज्येष्ठ राजकारण्याकडे नक्कीच आहे," असं 'बीबीसी मराठी'च्या चर्चेत कॉंग्रेस नेते भाई जगताप म्हणालेत.

भाजपच्या मित्र पक्षांच्या जागा का घटतात? असा प्रश्न महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही आता उपस्थित केला जात आहे.

अमित शाह, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, AMIT SHAH @TWITTER

4. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही राज्यात निकालानंतर वाद सुरू झाला.

जागा वाटपावरून मित्र पक्षांमध्ये होणारा वाद काही नवीन नाही. पण महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद एवढा ताणला गेला की शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली.

एवढंच नाही तर शिवसेनेने विचारधारेशी तडजोड करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससोबत आघाडी केली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.

बिहारमध्ये भाजप-जेडीयू आघाडीचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील हे भाजपने सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं आहे. पण जनतेचा कौल पाहिल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत तणाव निर्माण होणार नाही ही शक्यताही नाकारता येत नाही.

नितीश कुमार हे गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. त्यामुळे आता भाजपला संधी मिळायला हवी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं मत बिहार भाजपच्या एससी मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, "भाजपचे आकडे दिसत आहेत. त्यामुळे बिहारच्या भविष्यासाठी भाजपचा मुख्यमंत्री असायला हवा."

भाजप आणि जेडीयूला मिळालेल्या संख्याबळात मोठं अंतर आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले तरी भाजपकडे मोठ्या संख्येने आमदारांचे बळ असणार आहे. सहाजिकच निर्णय प्रक्रियेत भाजपचं वर्चस्व राहणार. याचा फटका जेडीयूला स्थानिक पातळीवर सुद्धा बसण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये जेडीयूला जशी भाजपची गरज आहे तशीच भाजपलाही जेडीयूची गरज आहे अशी भूमिका जेडीयूने मांडली आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, The India Today Group

5. दोन्ही राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट कमी

बिहारमध्ये अनेक वर्षं सत्तेची खुर्ची काँग्रेसकडे होती. पण गेल्या तीन दशकांत काँग्रेसने बिहारमध्ये जनाधार गमावला.

बिहारमध्ये काँग्रेसने 70 जागांवर निवडणूक लढवली. पण काँग्रेसच्या हाती फारसं यश आलेलं नाही.

महाराष्ट्र असो वा बिहार केंद्रात सत्ताधारी भाजपचा सर्वांत मोठा विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाचा दोन्ही राज्यात स्ट्राईक रेट कमी झाला.

महाराष्ट्रात काँग्रेसनं दीडशेच्या आसपास जागा लढवून केवळ 44 जागांवर विजय मिळवला. तर बिहारमध्येही तब्बल 70 जागा लढवून केवळ 20 जागा राखता आल्या.

6. प्रादेशिक पक्षांची चांगली कामगिरी

महाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजप हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी सत्तेची चावी प्रादेशिक पक्षांच्याच हाती आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीमुळेच शिवसेना सत्ता स्थापन करू शकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बिहारमध्ये तर निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा ही आरजेडीची झाली. आरजेडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दी चर्चेचा विषय ठरू लागली.

तेजस्वी

फोटो स्रोत, Arun Sharma/Hindustan Times via Getty Images

31 वर्षांच्या तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जेडीयूतील बड्या नेत्यांना काटे की टक्कर दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तेजस्वी यादव यांचं निवडणुकीतील कामगिरीचं कौतुक केलं.

आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीने बिहारमध्ये निवडणूक लढवली. महाआघाडीला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं असलं तरी आरजेडीने लक्षणीय कामगिरी करून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युतीची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी कशी राहणार अशी चर्चा निवडणुकीपूर्वी होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षित कामगिरी करत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकल्या. याचा आपसूकच फायदा आघाडीमधील काँग्रेसलाही झाला.

7. अल्पसंख्याक नेत्यांवर मतं विभागणीचे आरोप

बिहारमध्ये AIMIM पक्षाने डेमोक्रटिक सेक्युलर फ्रंटसोबत 20 जागांवर निवडणूक लढवली. तर लोक जनशक्ती पक्षाने जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले, पण तुलनेने भाजप विरोधात कमी उमेदवार उभे केल्याने हे पक्ष भाजपला मदत करत असल्याचे आरोप करण्यात आले.

यामागे प्रमुख कारण म्हणजे बिहारमध्ये बहुसंख्य मुस्लीम मतदार हा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीसोबत राहिला आहे. त्यामुळे मतदारांसमोर दोन पर्याय उभे राहिले.

मुस्लिम मतदारांची विभागणी झाल्याने भाजपला त्याचा फायदा होईल असं मत राजकीय विश्लेषकांनीही मांडलं.

ओवैसी-आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात असाच आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला गेला.

2019च्या लोकसभा निवडणुकीच वंचित बहुजन आघाडी आणि MIM एकत्र लढल्याने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळपास 11 जागांवर फटका बसला होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांची परंपरागत मतं या दोन्ही पक्षांमुळे विभागली गेली ज्याचा फायदा भाजपला झाला.

विधानसभा निवडणुकीत MIM आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढले असले तरीही अनेक जागांवर मतांची विभागणी झाल्याचं दिसून आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)